*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*माझा आवडता प्रवास*
आवडता प्रवास म्हटलं की मन एकदम गतकाळातील बालपणात गेलं..फ्राॅक,खिसे,लांब वेण्या रिबिनी परकर पोलकं,अहाहा…
तेव्हा पर्यटन म्हणजे आजोळी आणि गावी…वडील सरकारी डाॅक्टर, गावोगावी बदल्या होत. बाबांचं मूळ गाव एक लहानसं खेडं पण समृध्दीने नटलेलं .…हिरवीगार शेतं, आमराई, गायीगुरं,मोठमोठे वाडे व तितकीच दिलदार त्यातील माणसंही….दिवाळी , उन्हाळ्यात सुटी लागली की दोन तीन ठिकाणी एस.टी बदलत आम्ही तालुक्यात येत असू.छोटी भावंडं व सामान सांभाळत आई सर्वत्र लक्ष देई.पत्र्याची पेटी,व होल्डाॅल एखादी मोठी पिशवी, सोबत असे. ,पाण्याचा पितळी तांब्याही. खेड्यावर फक्त आजोबा असायचे,आजी लवकर देवाघरी गेली…पण आजोबा शेती, व्यवसाय,घर उत्तम सांभाळत असत. आई घरुनच सगळं जास्तीचं सामान,चादरी,पांघरूणं,आमचे कपडे,साधे, सणसमारंभाचे, काही भांडी असं महिनाभराचं सोबतच घेत असे. आमचं खेडं तालुक्यापासून १२कि.मीटर होतं.तेव्हा रस्ते फक्त बैलगाडीचेच. आधी पत्रापत्री झाल्याप्रमाणे घरून दमणी आलेली असायची.
आता कोणाला माहिती पण नसेल ..दमणी ही बैलगाडी माणसांनी प्रवास करायला असायची,त्याच्या दोन्ही बाजूंना पुढेमागे पडदे असत. दोन्हीकडे टेकून बसायला मोठ्या उशा असत. बैलांना घुंगरमाळा व झुला घालत.गाडीत आधी बैलांची वैरण टाकून वर जाड गादी घालून बैठक करत. म्हणजे नीट बसता येई.
हा प्रवास आता जवळपास एक दोन तासांचा...बैल जुंपले गाडीला की गाडीत एकेकाने बसायचं आणि चालू लागताच बाहेरची मजा बघण्यात खूप उत्साह असायचा.
गाव संपून दमणी बैलगाडी च्या वाटेवर लागायची..ती चाकोरी ठरलेली असे. आजूबाजू हिरवाई ने नटलेली दूरवर पसरलेली शेतं…आमरायातील मोठमोठी आंब्याची हे झाडं… निरनिराळे पक्षी बघण्यात मज्जा यायची. मधेच वरखाली रस्ता आला की बैलांना गडी आवरायचा तरी आम्ही एकमेकांच्या अंगावर पडायचो…. बैलांच्या पायांनी उडणारा धुरळा आतही अंगावर बसायचा..केस कपडे धुळीने माखत. एखादा ओढा, बारीकशी नदी लागायची. बैल पाणी प्यायला थांबत. आम्हीही वाकून नदीत मासोळ्या हे दिसतात का बघत असू. तेव्हा पाणी नितळ,आतील वाळू स्वच्छ दिसेल असं असायचं.
दोन अजून छोटी खेडी लागायची.
तिथे एका घरी आम्ही पाणी पित असू. उतरण्याचा,चहा घेण्याचा आग्रह व्हायचा पण आम्ही पुढे निघायचो. दोन तास बाहेरचा निसर्ग,वृक्षांचा फुलोरा,बाभळीची पिवळी फुलं व शेंगा लक्ष वेधून घ्यायच्या. मधेच शेळ्या मेंढ्याचे कळप, लागत. खूप छान वाटायचं सर्व बघतांना. वेगवेगळे रंगीत पक्षी
त्यांचे आवाज कानाला गोड वाटायचं. गाव जवळ आलं की बैल जोरात धावू लागत. आवरणं कठीण होई. आमचं खेड्यातील घर बघता बघता काही वाडे गेले की दिसू लागायचं. जरा उंचावर असलेलं आणि तिथूनच नदीचा उतार सुरू व्हायचा….आपलं घर…आपली नदी म्हणून सगळे बघून खूप आनंदीत व्हायचे अखेरीस घर यायचं. गाडीवान आम्ही उतरताच धु-यावर बांधलेली पेटी,होल्डाल सोडून ये घरात न्यायचा. विहिरीच्या थंडगार पाण्याने हातपाय धुवून आम्ही सगळे आजोबांजवळ बसायचो. नातवंड आल्याचा आनंद त्यांचाओसंडून वहायचा अगदी….
त्यानंतर वीज रस्ते होईपर्यंत असेच बैलगाडी नेच जाणेयेणे केले…..जीप मग बस नंतर कार असा तेथील प्रवास सुकर होत गेला. आता तर अवघ्या दहा मिनिटात पोचतो खेड्यावर.
कार, ट्रेन,विमान अगदी हेलिकॉप्टरमधून सुध्दा नंतर सगळीकडे भ्रमंती झाली. पण हा बालपणीचा बैलगाडीचा प्रवास
मनात घट्ट रूतलेला आहे…..!
*✍️अरुणा दुद्दलवार*✍️

