बांदेश्वर मंदिराचा २५ रोजी कलशारोहण वर्धापन दिन*
बांदा
येथील श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. गणपतीपूजन, देवतांस नारळ-विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे, सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र, अभिषेक, अनुष्ठान, श्री देवी भूमिका मंदिरात. श्री सूक्त आवृत्ती अनुष्ठान, गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवृत्ती जपअनुष्ठान, दुपारी १.३० वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ वाजता स्थानिक मंडळाची भजने, रात्री ७ ते ९ वा. युवा कीर्तनकार ह.भ.प. विनीत महाराज म्हात्रे, डोंबिवली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना गायक कृष्णा पाटील व पखवाज साथ विकास कोकतरे करणार आहेत. रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत पालखी सोहळा होणार आहे. ज्या भक्तगणांना महाप्रसादासाठी वस्तुरूप देणगी द्यायची असेल, त्यांनी मंदिराच्या कार्यालयात आणून द्यावी. तसेच, शुक्रवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रम असल्याने यादिवशी इतर कोणतीही वैयक्तिक स्वरूपाचे धार्मिक विधी केले जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर-भूमिका देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
