You are currently viewing रामकथा माणसाला माणूस बनवते – साध्वी वैष्णवी दीदी

रामकथा माणसाला माणूस बनवते – साध्वी वैष्णवी दीदी

रामकथा माणसाला माणूस बनवते – साध्वी वैष्णवी दीदी*

संभाजीनगर :

“रामकथा ही आरशासारखी असून आपण कोण आहोत, आपण कशासाठी जगले पाहिजे अशा प्रश्नांची उत्तरे रामायणातुन आपल्याला मिळतात. अन्याय, अधर्म, अनीती यावर मात करत संस्कार आणि संस्कृतीचे धडे देत मानवतेच्या धर्माची पुनर्स्थापना करण्याचे सामर्थ्य प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात आहे. कौटुंबिक नात्यांमधील समन्वय साधत रामायण समाजामध्ये जागृती निर्माण करते. आजच्या काळात माणसातील अवगुणांना दूर करत त्याला माणूस बनवण्यासाठी रामायण महत्वाचे आहे.” असे प्रतिपादन ह.भ.प. साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती यांनी केले आहे.

बलभीम बिराजदार मित्र परिवार व स्वा. सावरकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राम नवमी ते हनुमान जयंती असा रामकथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तापोनिधी पंचायती दशनामी आनंद आखाड्याच्या ह. भ. प. वैष्णवी दीदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजे संभाजीनगर चिंचवड येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात सादर केलेल्या कथेला हजारोंच्या संख्येने प्रतिसाद मिळाला.

वैष्णवी दीदी यांनी गोस्वामी तुलसीदास रचित “रामचरितमानस” या ग्रंथाचा आणि संत साहित्याचा आधार घेत रामायणातील अनेक प्रसंग सांगितले. प्रत्येक दिवशी जिवंत देखावे (झाकी) सुद्धा सादर करण्यात आले. वैष्णवी दीदी पुढे म्हणाल्या की , “मर्यादा पुरुषोत्तम राम हे एकपत्नी, एकवचनी होते. त्यांच्या आचरणातून नैतिकता शिकता येते. रघुकुळाच्या मर्यादा पाळून त्यांनी सत्याला कवटाळले. रामायणातून बंधुप्रेम, पुत्रप्रेम, स्वामीनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, मातृपितृभक्ती आदी गोष्टी शिकता येतात. लोभ हेच पापाचे मूळ आहे. षड्रिपूंच्या वर मात करता आली पाहिजे. समाजातील खलप्रवृत्तीचे निर्दालन करून सत्प्रवृत्तीचे रक्षण करण्यासाठी रामायण दिशादर्शक आहे.”
ह.भ.प. अशोक महाराज इदगे यांच्या काल्याच्या किर्तनाने रामकथा महायज्ञाची सांगता झाली.
स्वा. सावरकर प्रतिष्ठान, सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ, सिद्धीविनायक महिला मंडळ , बलभीम बिराजदार मित्र परिवार यांनी संयोजनात महत्वाची भूमिका बजावली.
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खा. श्रीरंगअप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, मंगला कदम, तुषार हिंगे, योगेश बाबर, केशव घोळवे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून रामकथा महायज्ञाचे कौतुक केले.
शेवटच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात नव्याने बांधण्यात आलेल्या समाजोपयोगी बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा