You are currently viewing वैभवाडी महाविद्यालयात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी

वैभवाडी महाविद्यालयात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी

*वैभवाडी महाविद्यालयात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी, कार्यालय अधीक्षक श्री.संजय रावराणे, प्रमुख मार्गदर्शक इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन. पाटील, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एन.आर.हेदूळकर, आय‌.क्यु.ए.सी समन्वयक डॉ.डी.एम. शिरसट व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी.एस.बेटकर उपस्थित होते. आपण आपल्या महामानवांच्या जयंत्या या त्यांचे विचार व कार्याचा आपल्या भावी पिढ्यांमध्ये योग्य प्रचार करून साजऱ्या केल्या पाहिजेत. महामानवांनी समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे विचार व कार्य आपल्या डोक्यामध्ये घेऊन आपण आपला, समाजाचा व आपल्या देशाचा विकास करावा. त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्या जयंत्या साजऱ्या करीत आहोत हे सिद्ध होईल, असे अध्यक्षीय भाषणात डॉ .एन.व्ही. गवळी यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा वारसा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होऊन तो पुढे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना त्यांच्या विविधांगी सुधारणा व त्याचे वेगळेपण प्रा.एस.एन.पाटील यांनी विशद केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांचे शिक्षण, विविध क्षेत्रांमधील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान, देशाच्या जडणघडणीमध्ये बाबासाहेबांनी बजावलेले आपले कर्तव्य यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती डॉ.एन.आर. हेदूळकर यांनी दिली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व काही पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी. एस. बेटकर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा