You are currently viewing महामानव

महामानव

*कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य कवी विजयकुमार शिंदे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*महामानव*

 

दीनदलितांच्या पंखांमध्ये तू दिधले बळ

आणि तयांच्या डोळ्यांमधले तू पुसले जळ

तूच तयांना दिली गती, केलीस उन्नती

नेत्री तयांच्या घातलेस ज्ञानाचे काजळ

 

शिकवण दिधली तू बुद्धाची अनुयायांना

तुझ्यामध्ये जणू दिसू लागला बुद्ध तयांना

बौद्ध धर्मही स्वीकारला तुजसवे तयांनी

आणिक झाल्या ताठ सदा झुकलेल्या माना

 

अमूल्य दिधले ‘संविधान’ तू या देशाला

सर्व जगाने तुला वाहिल्या स्तुतीसुम माला

निरपेक्ष तू या देशाची केलीस सेवा

देशच सारा जणू तुझा ऋणाईत झाला

 

‘बोधिवृक्ष’ तू दीनदलितांना दिलीस छाया

‘महामानव’ तू महानता तुझी वर्णाया

शब्दच नाहीत माझ्यापाशी, पामर मी रे

महान असशी तुझ्याइतुका तू भीमराया

 

— विजयकुमार शिंदे,

कणकवली

प्रतिक्रिया व्यक्त करा