You are currently viewing मुंबईने केली दिल्ली काबिज

मुंबईने केली दिल्ली काबिज

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सलग चार विजयांची दिल्ली कॅपिटल्सची विजयी मालिका अखेर खंडित झाली. मुंबई इंडियन्सने त्यांना दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात १२ धावांनी पराभव केला. शेवटी, दिल्लीचे तीन फलंदाज धावबाद झाले आणि सामना गमावला.

मुंबईच्या २०६ धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९ व्या षटकात १९३ धावांवर बाद झाला. १९ व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूत तीन फलंदाज धावबाद झाले आणि दिल्लीने सामना १२ धावांनी गमावला. दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली आणि दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर जॅकला बाद करून मुंबईला पहिला गडी बाद करून दिला.

तथापि, तीन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या करुण नायरने ४० चेंडूत ८९ धावांची जलद खेळी करत सामना दिल्लीच्या बाजूने केला, परंतु सँटनरने नायरची विकेट घेतली आणि कर्ण शर्माने केएल राहुल आणि अभिषेक पोरेलचे विकेट घेत सामना मुंबईच्या बाजूने वळवला. नंतर, अभिषेक शर्मा धावबाद झाल्यानंतर दिल्लीच्या आशा धुळीस मिळाल्या. कर्णने तीन आणि सँटनरने दोन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी फक्त ५ षटकांत ४७ धावा जोडल्या.

तथापि, दोन्ही फलंदाज लागोपाठ तंबूमध्ये परतले. यानंतर, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि अर्धशतकी भागीदारी केली. सूर्याचे अर्धशतक हुकले, पण तिलकने ५९ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. याशिवाय, नमनने उपयुक्त ३८ धावाही जोडल्या. निर्धारित २० षटकांत मुंबई इंडियन्सने ५ गडी गमावून २०५ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने १२ चेंडूत १८ धावा केल्या आणि पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विप्रज निगमने त्याला बाद केले. त्याच्या कामगिरीने चाहते पुन्हा एकदा निराश झाले. रोहित बाद होताच मैदानात शांतता पसरली.

वेगवान गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली. विप्रज निगम आणि कुलदीप यादव यांच्या शानदार गोलंदाजीने मुंबईच्या मधल्या फळीचा कणा मोडला आणि धावगतीवर नियंत्रण मिळवले. मिचेल स्टार्क आणि मुकेश कुमार यांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली नाही परंतु कर्णधार अक्षर पटेलच्या हुशार नियोजनामुळे संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. कुलदीप आणि विप्रज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा