You are currently viewing शिवछत्रपतींचे अलौकिकत्व

शिवछत्रपतींचे अलौकिकत्व

*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

*शिवछत्रपतींचे अलौकिकत्व*

भारताच्या इतिहासातील तेजाळणारे आणि लखलखते पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य. अशा या शिवछत्रपतींचे मला उमगलेले अलौकिकत्व मांडावे म्हणून हा लेख प्रपंच.
भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असे म्हणतात. “छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या आमच्या उंबरठ्यापर्यंत आल्या असत्या”. शिवकालीन महान हिंदी कवी भूषण असे लिहितात “शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी”
भारतभूमीत राहणाऱ्या, स्वतःला खऱ्या अर्थाने हिंदवी म्हणवणाऱ्या सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी शिवछत्रपती हे प्रेरणास्त्रोतच आहेत. शिवरायांनी अठरापगड जाती जमातीच्या समाज बांधवांना स्वराज्याची आणि स्वाभिमानाची हाक दिली. परकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्ततेचे आवाहन केले. शिवरायांनी जुलूम, अन्याय, अत्याचार व गुलामगिरीची राजवट संपवून, लोक कल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण केले, स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणारे राज्य निर्माण केले. महाराजांनी दिलेलं सर्वात मोठ देणं म्हणजे आत्मसन्मान, स्वाभिमान ती एक भावना जी शिवपूर्व कालखंडात मराठी माणसांमध्ये कित्येक वर्षांपासून संपली होती. शिवरायांच्या प्रेरणेने हा हा म्हणता मावळखोऱ्यात स्वराज्याचे वारे वाहू लागले. आणि मग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो हिंदवी स्वराज्याच्या देदीप्यमान इतिहासाचा घटनाक्रम. मग त्यात बाल शिवबांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळालेली रयतेच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा, आपल्या बाल सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात परकीयांची गुलामगिरी झुगारून देऊन रयतेच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेची घेतलेली प्रतिज्ञा, प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्याचा घास गिळण्यासाठी आलेल्या आदिलशहाचा मातब्बर सरदार अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचा प्रसंग, सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपले महाराज यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी स्वतः महाराज बनून स्वतःचे प्राण देणारे शिवा काशिद व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत गाजापूरची खिंड पावन करणारे बाजीप्रभू देशपांडेंचे बलिदान, शाहिस्तेखानाच्या लाल महालात शिरून त्याची बोटे छाटल्याचा प्रसंग, दिलेरखानाच्या पुरंदर वरील हल्ल्यात स्वतःच्या प्राणांची बाजी लावणारे मुरारबाजी देशपांडे, मिर्झाराजे जयसिंगाशी 23 किल्ले आणि चार लक्ष होनांचा मुलुख देऊन केलेला तह, बादशहाने महाराजांना आग्रा येथे कैद केल्याची घटना, आग्र्याहून महाराजांच्या सुटकेसाठी जीवावर उदार होणाऱ्या मदारी मेहतर व हिरोजी फर्जंद यांची, मुलाचे लग्न सोडून कोंढाण्यावर गेलेल्या तानाजी मालुसरेंच्या प्राणार्पणाची, तर आपल्या केवळ सहा साथीदारांसह बहलोलखानाच्या प्रचंड सैन्यावर तुटून पडणाऱ्या सेनापती प्रतापराव गुजर यांची, रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा, दक्षिण दिग्विजय मोहीम अशा असंख्य घटनांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. समस्त वीरांच्या समर्पणाने, त्यागाने हिंदवी स्वराज्य उभे राहिले. महाराजांच्या एकूण जीवन प्रवासाचा अभ्यास केला तर आपल्या सहजच लक्षात येते संकटेच आपल्याला शक्ती देतात, साहस देतात, ताकद देतात, ऊर्जा देतात, जिद्द देतात, तुमची उंची वाढवतात, तुमचे सामर्थ्य वाढवतात.
स्वतः आलमगीर बादशहाला या रयतेच्या राज्याची भीती वाटत होती कारण हे राज्य कोणा बादशहा किंवा सुलतानाचे नव्हते तर ते रयतेचे राज्य होते. प्रत्येकाला हिंदवी स्वराज्य आपलेच वाटत होते, जणू प्रत्येकजण शिवरायंच झाला होता. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन शक ही कालगणना सुरू केली. म्हणजे महाराज शककर्ते झाले. स्वराज्यात महाराजांनी दोन नाणी काढली एक ‘शिवराई’ आणि दुसरे ‘होन’. फारसी भाषेतला राज्यकारभार स्वभाषेत व्हावा म्हणून महाराजांनी ‘रघुनाथपंत हणमंते’ यांच्याकडून राज्यव्यवहार कोषाची निर्मिती केली. तत्पूर्वी परकीय सत्ता असल्याकारणाने राजभाषा ही फारसी होती. हा राज्यव्यवहार कोश तयार करताना महाराजांनी विजयनगर साम्राज्यातील राज्यव्यवहार कोश चा आधार घेतला होता. विजयनगरच्या सत्ताधीशांनी राज्यव्यवहार कोश तयार करताना वेद, उपनिषदांचा आधार घेतला होता. हे जागतिक दर्जाचे इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.
हे हिंदवी स्वराज्य केवळ महाराजांचे नव्हते तर ते येथील रयतेचेही होते. जसा एखादा सिंह मेंढरांच्या कळपात राहिल्याने आपले सिंहत्व विसरून जातो. अगदी तसेच हिंदूंचे झाले होते. महाराजांचे वेगळेपण हेच आहे की त्यांनी त्या सिंहाला पुन्हा जाणीव करून दिली. की तूच राजा आहेस. एकदा हे सिंहाला समजल्यावर तो जशी डरकाळी फोडत गुरगुरतो, अगदी तसेच रयतेचे झाले. त्यांच्या नुसत्या गुरगुरण्याने ही शत्रूला घाम फुटू लागला. महाराजांनी त्यांच्या या अंत:शक्तीवरच शिक्कामोर्तब केले. महाराजांनी या रयतेच्या मनात स्वतःबद्दल एक आगळावेगळा विश्वास निर्माण केला होता. स्वराज्या प्रति निर्माण झालेला हा विश्वास म्हणजे आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो, आपण आपले राज्य निर्माण करू शकतो. म्हणजेच आधी मरेपर्यंत लढणाऱ्या मराठ्यांना जिंकेपर्यंत लढण्याची प्रेरणा दिली. खरंतर शिवराय म्हणजे शतकानूशतकांच्या अंधार कोठडीतून बाहेर निघालेला तो एक तळपता, देदीप्यमान प्रकाशाचा सूर्य होता. सातव्या आठव्या शतकापासून जी इस्लामी आक्रमणे सुरू झाली. त्यांनी अखंड भारतावर कब्जा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनापूर्वी सुमारे शंभर वर्ष संपूर्ण भारताचे क्षात्रतेज लयास गेले होते. भारतीय संस्कृती व परंपरांना उतरती कळा लागली होती. यावेळेस या सर्वांवर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले ते आगमन विलक्षण ओजस्वी व तेजस्वी ठरले. निराशेच्या घनदाट अंधारात स्वच्छ प्रकाशाची वाट चोखाळणारी माणसे फार थोडी असतात. अशी माणसे निर्माण करण्यात महाराज यशस्वी झाले होते. येथील प्रत्येक व्यक्ती स्वतः राजा असल्याप्रमाणे आपल्या राज्याचा रक्षक होता. तो तिथे चाकर नव्हताच. त्याला कोणाच्या आदेशाची गरजच नव्हती. ही भावना आपल्या रयतेच्या मनात स्वराज्याविषयी निर्माण करण्यात महाराज यशस्वी झाले. ही एक मोठी लोकक्रांतीच होती. खरेतर त्याचीच औरंगजेबाला भीती वाटत होती. म्हणूनच स्वतःचं एवढं मोठं देशभर आणि देशाबाहेरही पसरलेले साम्राज्य असताना त्याच्या शंभर पट लहान असलेल्या स्वराज्याचा घास घेण्यासाठी तो सतत धडपडत होता. महाराजांच्या मृत्यूनंतर तर तो स्वतः २७ वर्ष आपलं लाखोंचं सैन्य व अब्जावधी संपत्ती घेऊन महाराष्ट्रात ठाण मांडून बसला. पण त्यात त्याला यश आलेच नाही. याउलट त्याचा शेवटही याच भूमीत झाला.
महाराजांचे सर्वात मोठे यश म्हणजे ते आजही तुम्हां आम्हां सर्वांना प्रेरणा देत राहतात. हेच महाराजांचे वैशिष्ट्य आहे. राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. कितीही मोठी संकटे येऊ द्या, राजांनी ध्येयाचे विस्मरण कधीही होऊ दिले नाही.
खऱ्या अर्थाने आज शिवछत्रपतींचे स्मरण करण्याचे कारण म्हणजे आपल्या देशामध्ये शिवरायांपूर्वी आणि शिवरायांनंतर जे राजे होऊन गेले त्यापैकी अनेकांना परकीय आक्रमकांच्या आक्रमणामागील मूळ उद्दिष्टांचे आकलन झाले नाही. परकीय आक्रमणा मागील उद्देश हा केवळ साम्राज्यविस्तार किंवा धन-संपत्ती मिळवणे एवढाच नव्हता. त्यासोबत आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हा सुद्धा होता. ही गोष्ट कदाचित छत्रपती शिवाजी महाराज सोडून इतर अनेक भारतीय सत्ताधीशांच्या लक्षातच आलेली नाही. त्यामुळे या आक्रमकां संदर्भात आपण नेमकी काय भूमिका घ्यावी हे त्यांना कळलेच नाही. याउलट त्यांनी आपापसातील संघर्ष करताना सुद्धा त्यांची मदत घेतली. उदा. राजा जयचंदाने राजा पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करण्यासाठी मोहम्मद घुरीला आमंत्रित केले तर नानासाहेब पेशव्यांनी आग्र्यांचे बलशाली आरमार बुडवण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली. मराठ्यांची सत्ता अटकेपार पोहचवणारे श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी सुद्धा पेशवे पद मिळविण्यासाठी इंग्रजांची मदत मागितली. अशी अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात दिसतात. यासोबतच हा देश आपला आहे, इथे आपलीच सत्ता असली पाहिजे. परकीयांनी येथे सत्ता स्थापन करता कामा नये. त्यांना इथे राहायचे असेल तर त्यांनी आपल्या अटी शर्ती मान्य केल्या पाहिजेत. ही परकीय आक्रमकांबद्दलची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांच्या आधीच्या व त्यांच्या नंतरच्या अनेक सत्ताधीशांच्या लक्षात आली नाही. नाहीतर मराठे १७०७ नंतर लगेचच दिल्लीपती झाले असते. कारण त्यांनी महाराजांच्या मृत्यूनंतर सतत २७ वर्ष औरंगजेबाच्या अवाढव्य सैन्याशी संघर्ष करून त्याला जेरीस आणले होते. मुघलांची सत्ता खिळखिळी होण्यास सुरुवात झाली होती. आपण महाराजांची विचारधारा विसरलो म्हणूनच परत पारतंत्र्यात गेलो.
महाराजांनी वतनदारी पद्धत थांबवली आणि आपल्या सैनिकांना व सरदारांना ते निश्चित स्वरूपाचे वेतन देत. अशा वेतन घेणाऱ्या सैन्याची निर्मिती महाराजांनी केली. त्यामुळे राजांकडे स्वतःचे खडे सैन्य असे. त्यावेळच्या इतर सत्ताधाऱ्यांप्रमाणे त्यांना सैन्यासाठी सरदारांवर किंवा वतनदारांवर अवलंबून राहावे लागत नसे.
खरंतर आज शिवछत्रपतींची जयंती का साजरी करायची हा अनेकांना पडलेला एक मोठाच प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उद्देशाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती तो उद्देश आजही पूर्ण झाला असे म्हणता येत नाही. महाराजांना दीर्घायुष्य न लाभल्याने त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. माझ्या मते ते स्वप्न पूर्ण केले जावे असे ज्यांना ज्यांना वाटते त्या सर्वांनी शिवजयंती साजरी करणे आवश्यक आहे. छत्रपतींचे नेमके उद्दिष्ट काय? ह्या आपल्या धर्मनिरपेक्ष देशात अनेक तर्क वितर्कांचा मुद्दा होऊ शकतो. याबद्दल अनेक संशोधनेही नोंदविली जातात. स्वराज्याचा विस्तार कुठपर्यंत करायचा या आपले सरदार रावजी सोमनाथ यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज असं म्हणाले की “सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर ‘श्रीं’ ची इच्छा”.
आज तुम्हीं आम्हीं सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मानाचा मुजरा असेल. त्या माध्यमातून देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या आत्मनिर्भर होऊन जगात विश्वगुरु होईल यात शंकाच नाही. एक भारतमातेचा पुत्र म्हणून, एक शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी *’शिवछत्रपतींचे अलौकिकत्व’* मांडण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुढील अनेक पिढ्यांना असेच संघर्षरत राहून यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतील.
मित्रांनो या लेखात मला समजलेले शिवछत्रपतींचे अलौकिकत्व आजच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
धन्यवाद.

लेखक
प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे
के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली. prashantshirude1674@gmail.com
9967817876

प्रतिक्रिया व्यक्त करा