You are currently viewing आय . ए . एस . मिशन अमरावतीचा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार 

आय . ए . एस . मिशन अमरावतीचा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार 

राज्यस्तरीय पुरस्कारानिमित्याने प्रा. भारसाकळेंचा कार्यस्थळी गौरव

गोरक्षण हे शेतकरी जीवन उन्नतीचे संशोधन कार्यस्थळ – डॉ कमलताई गवई

दर्यापूर : गोसेवा ही अत्यंत महत्वपूर्ण तथा प्रभावी सेवा असून शेतकरी जीवनाला कायमस्वरूपी उन्नतीकडे नेणारा हा मार्ग ठरतो असे उद्बोधक प्रतिपादन लेडी गव्हर्नर प्राचार्या डॉ कमलताई गवई यांनी दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्था स्थळावर केले.

डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथि दिनाचे औचित्य साधून आय. ए. एस. मिशन अमरावती द्वारा पहिला डॉ पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे मानकरी ठरलेले दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माहुली (धांडे) येथील गोरक्षण संस्थेचे संस्थापक विश्वस्त प्रा गजानन रामकृष्ण भारसाकळे यांचा डॉ कमलताई गवई व आय. ए. एस. मिशनचे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी प्रा भारसाकळे यांचे संशोधन कार्यक्षेत्र असलेल्या गोरक्षण स्थळावर जाऊन यथोचित सत्कार केला. या समाज उपयोगी कार्याचा अधिक गौरव करतांना डॉ कमलताई गवई यांनी या परिसरात वृक्षारोपणही केले.

शिक्षणमहर्षि तथा कृषीरत्न डॉ भाऊसाहेब देशमुख यांच्या कृषी व शिक्षण प्रणालिवर आधारित प्रा गजानन भारसाकळे यांचे पर्यावरण, समाजसेवा व संशोधन कार्य असल्याने ते डॉ भाऊसाहेबांच्या संस्थेचे प्रथम विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक म्हणून शोभून दिसतात असे भावपूर्ण प्रतिपादन करीत डॉ कमलताई यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी प्रा भारसाकळे यांच्या कार्याचा आदर्श बाळगावा असे आवाहनही केले.

औषधी, शेणाची गोवरी व कॉम्पोस्ट खत या विषयांवर प्रा भारसाकळे यांचे केंद्र शासन कार्यालयात पेंटेट मिळण्यासाठी अर्ज सादर असून ही कार्य पूर्तता निश्चितच अभिनव कार्य सिद्ध करणारी ठरणार आहे. एकवीस हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह व सन्मान पत्र हे या पहिल्या पुरस्काराचे स्वरूप असून आय. ए. एस. मिशन द्वारे येत्या ११ मे ते १६ मे दरम्यान संपन्न होणाऱ्या स्पर्धा परीक्षा शिबिरात या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मान्यवरांच्या शुभहस्ते वितरण होणार आहे. या प्रसंगी गाडगेबाबा मंडळ, गाडगेबाबा गोरक्षण संस्था माहुली (धांडे), ग्रामपंचायत बेलोरा तथा माजी विद्यार्थी संघटना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगांव, अकोला या प्रा गजानन भारसाकळे यांच्याशी संबंधित संस्था – संघटना यांच्या कार्यकारिणी तथा सभासदांना आमंत्रित करणार असल्याची माहिती शिबीर आयोजक संस्थेचे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी दिली आहे. भारत देशाच्या सर्वोच्य न्यायालयाच्या न्यायाधिशाची आई असणाऱ्या डॉ कमलताई यांनी त्यांच्या एका लहान कर्तृत्व असणाऱ्या दुसऱ्या मूलाचा आज मोठा गौरव केल्याची प्रतिक्रिया प्रा गजानन भारसाकळे यांनी या प्रसंगी दिली. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवसाची भोजन व्यवस्था करण्याची जबाबदारी अकोला जिह्यातील निंबा येथील स्व. श्रीधरराव देशमुख उपाख्य मालक प्रतिष्ठान निंबा यांनी स्विकारली आहे. ही बाबही नोंद घेणारी ठरणार आहे. गोरक्षण स्थळी संपन्न या सत्कार सोहळ्या प्रसंगी प्रा अक्षय सुधाकरराव काळमेघ, रिपाई तालुकाध्यक्ष अनिलभाऊ गवई, बाळासाहेब नामदेवराव भारसाकळे, गोरक्षण संस्था सहसचिव उमेश इंगळे, सुभाष घूरडे, गजानन नाखले, दैनंदिन गोसेवक श्रीकृष्ण पोटे व संतोष गवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा