You are currently viewing साक्ष

साक्ष

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते यांच्या काव्याचे सौ.गौरी काळे यांनी केलेले रसग्रहण*

 

*साक्ष*

⚛🕉⚛

मी एक जीर्ण जुनाट वृक्ष..

भूगर्भात खोल रुतलेला..

झुकलेल्या , पारंब्या रुक्ष..

तरीही वाळवंटी रमलेला..।।..१

 

साथ अखंड जलाशयाची..

बिलगतो भावगंधला वारा..

झुळझुळ नाद मंद प्रवाही..

फुटते , पालवीच रुक्षतेला..।।..२

 

किती पाहिले,अन साहिले..

सुख दुःखांचे नित्य सोहळे..

मनभावनांचे सारेच उमाळे..

साक्षी ! सरीता वाळवंटाला..।।..३

 

ऋतू रंगती ! पंचमहाभूतांचे..

कधी उध्वस्त ,कधी कृपाळू..

जीवनी प्रारब्धाचे दान सारे..

अंती ! उमजते मनामनाला..।।..४

 

पाप क्षालनार्थ , गंगायमुना..

किनारी उभा काशीविश्वेश्वर..

पारावरी , निवृत्ती , ज्ञानेश्वर..

मोक्ष ! मुक्ती सोपान एकला..।।. ५

⚜⚛🕉⚛⚜⚛🕉⚛⚜

*रचना:- ©वि.ग.सातपुते.(भावकवी)*

*दिनांक :- १३ – ९ – २०१९ .*

 

मानव जीवनाचे मर्म सांगणारी आदरणीय वि. ग. सातपुते अप्पांची *साक्ष* एक सुंदर भावकविता आहे.

जशी जशी जीवनाची संध्याकाळ जवळ येऊ लागते मनुष्य आत्मचिंतन करायला लागतो.गतकाळातील आठवणी साद घालत असताना मनाला उपरती होते कि आपल्या प्रारब्धा प्रमाणे आपले संचित आहे.आता यापुढे फक्त मोक्षपद मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी अनेक परिक्षांमधून जायचे आहे.

स्वतःला केंद्रस्थानी ठेवून श्री.वि.ग. सातपुते आप्पा म्हणतात

*मी एक जीर्ण जुनाट वृक्ष* आहे.मी आता वृद्ध झालो असलो तरी माझी मुळे या मातीत खोलवर रुजलेली आहेत.अजून ही सर्व संस्कार व रीती भाती मी विसरलेलो नाही.अजून मी माझ्या मनाशी प्रामाणिक आहे.वार्धक्यामुळे आता शरीर झुकले तरी मनाने तरुण व अनुभवांनी समृद्ध आहे.काहीसे रुक्ष जीवन आहे तरीही मी जीवनरुपी *वाळवंटी* रमलेला आहे.

इथे जीर्ण जुनाट वृक्ष या रुपकाचा कविवर्यांनी किती सुंदर वापर केला आहे.माणसाला वृद्धत्व आले कि तो परिपक्व होत जातो व विनम्र होतो *झुकलेल्या पारंब्या* जणू .पत्नी मुले सुना नातवंडे अशा भरल्या गोकुळात तो रमलेला असतो.

पुढे ते म्हणतात मला जलाशयाची साथ नेहमी अखंड लाभली आहे आणी त्यातून उमटणारे भावगंध मला स्पर्शून जातात.इथे *जलाशय* शब्द वेगळे अर्थ सूचित करतो.या कवितेत भवसागराला जलाशयाची उपमा दिली आहे तसाच तो साहित्य सागर ही आहे.या अथांग भवसागराच्या ऐलतीरावरुन प्रवास सुरु आहे.तसेच साहित्य सागरात विहार करताना मन गाभार्‍यात भाव भावनांचे मंथन सुरु आहे.हे भावगंध कित्येक रचनांना जन्म देतात.

याचा *झुळझुळ नाद मंद प्रवाही* मनाला उल्हासित करतो अन् रुक्ष मनाला कवितेची पालवी फुटते.अनेक भाव स्पंदने जन्म घेऊन कितीतरी जणांशी अनुबंध जुळतात.

तसे पाहिल्यास जीवनाचा प्रवाह आपल्या गतीने सुरु असतो.

पुढे आप्पा म्हणतात आयुष्यात नेहमीच सुख दुःखांची आवर्तने पाहिली.अनेक सुखद क्षणांचा अनुभव घेतला तसेच कितीतरी दुःखे सहन केली.कधी परके दुःख ही आपले मानले.हास्य,रुदन ,चिंता,

क्लेश ,राग लोभ सर्व भावना मनात वेळोवेळी उचंबळून आल्या…हे सारे उमाळे साक्षी ठरले कवितेच्या जन्माचे.काव्याची एक अविरत खळखळणारी सरिता या मोहमयी वाळवंटात वाहू लागली.

 

*ऋतू रंगती! पंचमहाभूतांचे*..

*कधी उध्वस्त, कधी कृपाळू*

किती सुंदर शब्द योजना केली आहे या दोन ओळींत.सृष्टीत जशी पंचमहाभूते आकाश जल वायु पृथ्वी अग्नि तिची चालक व पालक आहेत तसेच आपले शरीर ही पंचमहाभूतांनी निर्माण झाले आहे.

त्यापासून शरीरात वात ,पित्त कफ दोष निर्माण होतात.काही असंतुलन झाले कि अनेक विकार व रोग जन्म घेतात.हे ऋतू रंगताना कधी मनुष्य कठीण परीक्षेतून जातो उध्वस्त होतो तर कधी दैवी कृपेने सारे प्रश्न आपोआप सुटतात.

आपले प्रारब्ध व पूर्व संचिताप्रमाणेच मानवाला त्याचे कर्म फल प्राप्त होते.स्वतःला मिळालेले आयुष्याचे दान ही आपल्या प्रारब्धामुळे मिळाले आहे हे उतारवयात आल्यावरच समजते.

 

*पाप क्षालनार्थ, गंगायमुना*..

*किनारी उभा काशीविश्वेश्वर*

*पारावरी,निवृती, ज्ञानेश्वर*

*मोक्ष ! मुक्ती सोपान एकला*॥

 

ह्या चार ओळीत श्री. वि.ग.सातपुते अप्पांनी भावकवितेचा परमोच्च बिंदू गाठला आहे.मानव जीवनाचे अंतिम सत्य तसेच अध्यात्म यातून कविवर्यांनी विशद केले आहे.

आता या क्षणाला पैलतीर दिसू लागला आहे.तिथे जाताना आधी आपली सर्व पापे गंगायमुनेत विसर्जित करुन मन निर्मळ करायचे.या *गंगायमुना* म्हणजे दोन डोळ्यांतील अश्रुपात.आपले पाप क्षालन करण्यासाठी काशीविश्वेश्वरासमोर नतमस्तक व्हायचे.याचा गूढार्थ असा कि पैलतीरी ‘शिव’ स्थित आहे व जीव शिवाची भेट होण्यासाठी आता काही क्षण उरले आहेत.

माझ्या पारावरी अर्थात हृदय मंदिरी निवृत्ती व ज्ञानेश्वरांचा वास आहे.वृत्तींची निवृत्ती झाली व गुह्य ज्ञान झाले आहे.आता मोक्षपदाची आस लागली…आता सर्व पाशातून मी अलगद मुक्त होईन.एक एक सोपान अर्थात एक एक पायरी चढून आता तो क्षण आला आहे.आता हा प्रवास एकट्याचा आहे.या मुक्ती सोपानावर मी अर्थात जीव एकला आहे.

 

*©️सौ. गौरी चिंतामणी काळे*

*11 /एप्रिल / 2025*

प्रतिक्रिया व्यक्त करा