*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, को.म.सा.प.चे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित कविवर्य डॉ वसंत सावंत जयंतीनिमित्त विशेष लेख*
*कविवर्य डॉ.वसंत सावंत:- निसर्गवेडे कवी*
“झाडाच्या पानांवर कविता लिहिली जाते आणि वडाच्या पारंब्या सारखी विस्तारते”
असे आपले निसर्गवेड शब्दात रेखाटत अंतर्मुख होऊन निसर्गामध्ये रमणारे, निसर्गावर प्रेम करणारे..कोकणातील निसर्गावर भरभरून लिहिणारे…निसर्ग शब्दाशब्दात जगवणारे, त्यांच्या शब्दरूपी बाणाने दगडाला सुद्धा पाझर फुटावा अशी काव्यप्रतिभा असलेले, कवी म्हणजे कविवर्य डॉ.वसंत सावंत..!
११ एप्रिल १९३५ रोजी कणकवली तालुक्यातील सांगुळवाडी येथे जन्मलेले वसंत सावंत फोंडा येथे प्राथमिक शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत गेले. सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकत असतानाच प्रा.रमेश तेंडुलकर, प्रा.अनंत काणेकर, प्रा. डॉ.मालशे अशी काव्यप्रतिभा असलेली मंडळी त्यांना गुरुस्थानी भेटली. मुंबईत रेल्वेत ही त्यांनी नोकरी केली. परंतु सावंतवाडी संस्थानचे राजे हीज हायनेस शिवरामराजे भोसले यांनी १९६३ मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना केली आणि राजसाहेबांनी स्वतःच कवी वसंत सावंतांना प्राध्यापक म्हणून सावंतवाडीत बोलावून घेतले. १९६३ पासून सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून सावंतवाडीत नोकरी केली.
*”प्रवासवर्णन एक वाङ्मयप्रकार”* या विषयात त्यांनी *पीएचडी* प्राप्त केली होती.
कोकणातील विशेषतः सावंतवाडीच्या सृष्टीसौंदर्याने ते भारावून गेले. निसर्गावर अतोनात प्रेम करणाऱ्या कवी वसंत सावंत यांची काव्यप्रतिभा सावंतवाडीत बहरत गेली ती एवढी की त्यांची तुलना प्रसिद्ध निसर्गकवी वर्डस्वर्थ यांच्यासोबत केली जाऊ लागली.
सावंतवाडीच्या मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या केशवसुत कट्ट्याकडे जाणाऱ्या वाटेला “कविवर्य डॉ.वसंत सावंत पादचारी मार्ग” असे नाव देऊन सावंतवाडी नगरपालिकेने त्यांच्या स्मृती चिरंतर जपल्या आहेत. ज्या तलावकाठच्या आम्रवृक्षाखाली कविवर्य केशवसुतांनी “संध्याकाळ” ही कविता लिहिली तिथेच आम्ही महाविद्यालयात शिकत असताना कवी डॉ.वसंत सावंत अनेकदा दिसायचे.. काळे पांढरे केस, प्रसन्न चेहरा आणि डोळ्यांवर चष्मा.. परंतु त्यावेळी त्यांना जाणण्या एवढी आमची उंची नव्हती.. आज त्याच केशवसुत कट्ट्यावर मार्बलच्या दगडावर कोरलेल्या कविवर्य डॉ.वसंत सावंतांच्या कविता पहिल्या की त्यांची खरी ओळख होते.. त्यांच्या या कविता केवळ त्यांची आठवण जपत नाहीत तर अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. आद्यकवी केशवसुतांनी सावंतवाडीत केलेल्या वास्तव्याची आठवण जपणारी कवी डॉ.वसंत सावंत यांनी केशवसुतांवर लिहिलेली कविता…
*”तुझी उदासी मजला ग्रासी मी भ्रमतो माझ्याशी*
*तुझ्यापरी मन करी झपुर्झा पागल रंग नभाशी*
*जळावरी जळ करिते झुळझुळ तरंग सरके काठा*
*वाटेवरती झाड लागते जिथे थांबती वाटा*
*लोक सांगती इथे बसून तू लिहिली संध्याकाळ”*
आजही कविवर्य केशवसुत काव्य रचताहेत असा भास करत चबुतऱ्यावर तुतारी संगे उभी आहे…
“हे गाव म्हणजे परमेश्वराला पहाटे पडलेलं अधुरे स्वप्न”…
असे सावंतवाडी म्हणजे पूर्वीच्या सुंदरवाडीचे अलौकिक वर्णन करणारी *”सुंदरवाडी” (उर्फ सावंतवाडी)*
ही कविता देखील तिथे ऊन पावसात कवी वसंत सावंतांच्या सावंतवाडीवर असलेल्या प्रेमाची साक्ष देत त्यांच्या स्मृती जपते आहे…
बैल:
पिढ्यानपिढ्याचा पोशिंदा माझ्या शक्तीचा सम्राट….
माझ्या रक्तामधून, शब्दांमधून उसळत राहते एक अनाम शक्तीची लाट…
“बैल” या कवितेतून त्यांनी मानव स्वभावाचे प्रतीक म्हणून बैलाला संबोधून भाष्य केलं आहे..निसर्गातील प्रतिके त्यांच्या काव्यातून सहजपणे दिसून येतात..त्यांची ही कविता बारावीच्या अभ्यासक्रमात देखील समाविष्ट करण्यात आली होती…
*”पक्षी उडून जातात दिशा पार आणि झाडच गात बसते*
*पक्ष्यांचे पंख धरावेत तर झाड मागे खेचते”*
असे निसर्गवर्णन करणारी…
“जेव्हा झाडच गात बसते…”
आणि…
आंबोलीच्या सौंदर्यावर फिदा होऊन लिहिलेली *”आनंदगौरी”*
अहाहा….काय ते वर्णन अद्वितीय, अद्भुत…
*”जेव्हा आंबोली गर्द धुक्यात बुडालेली असते*
तेव्हा माझा आत्मा ढग होऊन तरंगत असतो”*
निसर्गावर प्रेम असावं तर असं..!
अशा निसर्गावर भरभरून लिहिलेल्या कविता आज कविवर्य डॉ.वसंत सावंतांच्या निसर्ग वेडाची साक्ष देत सावंतवाडीसह कोकणच्या अलौकिक सौंदर्याची थोरवी गात आहेत.
कविवर्य डॉ वसंत सावंत यांचे साहित्य भांडार देखील मोठे आहे…
“स्वस्तिक” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह.. त्यानंतर “उगवाई”, “देवराई”, “माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड” “सागरेश्वर”, असे कवितासंग्रह प्रसिद्ध झालेत आणि शेवटचा ओवी स्वरूपात असलेला दीर्घ काव्यसंग्रह म्हणजे “वसा”…
त्यांना पुरस्कार देखील बरेच मिळाले…त्यात महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार(१९७४), गोखले पुरस्कार, श्री संत नामदेव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा कोकणभूषण पुरस्कार आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.
कविवर्य डॉ वसंत सावंत यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित “एकटा जीव सदाशिव”, “सोंगाड्या…” असे चित्रपट देखील आलेत..
“चिल्लरखुर्दा”, “भारुड”, “मिरवणूक”, “पंगत”, “आमची मेली पुरुषांची जात” हे त्यांचे लेखसंग्रह देखील आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषद त्यांच्या स्मृती चिरंतर जपून आजही उत्कृष्ट काव्यसंग्रहाला कवी डॉ.वसंत सावंत यांच्या नावे पुरस्कार देते हे कौतुकास्पद..!
१९७२ साली त्यांनी दक्षिण रत्नागिरी साहित्य संघाची स्थापना केली आणि कोकणातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले. या संस्थेतर्फे कोजागिरी साहित्य संमेलन घेण्यास त्यांनी सुरुवात केली. ज्यामध्ये महाराष्ट्रातील नावाजलेल्या अनेक साहित्यिकांनी सहभाग घेतला होता. आजही त्यांच्या स्मृती जपत सावंतवाडीत कोजागिरी साहित्य संमेलन सुरू आहे हे नक्कीच वाखाणण्याजोगे..!
*अशा लाल मातीत जन्मास यावे*
*जिचा रंग रक्तास दे चेतना*
*इथे नांदते संस्कृती भारताची*
*घरातून दारात वृंदावना…*
कोकणच्या लाल मातीच्या सौंदर्यावर अतोनात प्रेम करणारा हा कवी आज आपल्यात नाही… परंतु त्यांच्या कवितांमधून वाचल्या की ते आजही केशवसुत कट्ट्यावर लिहित बसले असावेत असेच वाटते..
ज्याच्याबद्दल बोलताना पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांनी म्हटले आहे की, “एखादा पैलू न पडलेला हिरा देखील भरपूर चमकतो”……
असा हा अमूल्य हिरा २३ डिसेंबर १९९६ रोजी निसर्गाच्या नियमाप्रमाणेच धरणी मातेच्या कुशीत नकळत विसावला.. तो कायमचाच..!
©कवी दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६