You are currently viewing ‘स्व’ ची ओळख

‘स्व’ ची ओळख

*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा.प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*’स्व’ ची ओळख*

 

मनुष्याला ‘स्व’ ची ओळख जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्याला त्याच्या जीवनाची दिशा दिसेल. ‘स्व’ ची ओळख म्हणजे आपल्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे हे ओळखणे. त्यातून आपल्या करिअरची दिशा ठरवणे सोपे होते. ‘स्व’ ची ओळख कशी ठरवावी? असा प्रश्न आपल्या मनाला पडला, तर त्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. असं काय आहे? की जे काम किंवा ज्या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला थकवा, कंटाळा, आळस येत नाही? याउलट आपला आनंद, उत्साह वाढतो. दहा-दहा, बारा-बारा, पंधरा-अठरा तास काम केलं तरी थकवा येत नाही. असं क्षेत्र म्हणजे आपलं क्षेत्र. त्यात व्यक्ती यशस्वी होण्याची शंभर टक्के खात्री असते. हे ओळखणे इतके सोपं आहे. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या चिकित्सक प्रयोगाची किंवा ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. ‘स्व’ ची ओळख करताना आपल्या स्वतःकडे असलेल्या सर्व क्षमतांचा मग त्यात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आर्थिक स्थिती चा पुरेपूर विचार करावा. आपल्याकडे उपजत असलेल्या क्षमतांच्या माध्यमातून आपल्याला सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट काय करता येईल यावर विचार मंथन अपेक्षित असते. ही ओळख जितक्या लवकर आपल्याला होईल तितक्या लवकर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशी अनेक उदाहरणे आपल्याला घेता येते की ज्यांना अगदी बालवयातच आपल्या जीवनाची दिशा, त्याचे ध्येय आणि उद्दिष्ट समजले होते. त्यामुळेच ही माणसे आपल्या जीवनातच स्वतःला सर्वोत्तम स्थानी विराजमान करण्यात यशस्वी ठरलेली दिसतात. ही ‘स्व’ ची ओळख जितक्या उशिरा आपल्याला होते, तितके आपण उच्चतम ध्येय गाठण्यात कमी पडतो. अर्थात अनेकांना ही ओळख आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत सुद्धा होत नाही हेही तितकेच सत्य आहे. तेव्हा आपण आपल्या क्षमतांचा सर्वतोपरी वापर करत आपल्या ‘स्व’ च्या क्षेत्रात कार्य करत रहावे. आपल्याकडे जे नाही, किंवा जे आपण कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करू शकत नाहीत, अशा गोष्टींवर आधारित आपली इच्छा, ध्येय अथवा उद्दिष्ट असता कामा नये. नाहीतर मग निराशा पदरी पडण्याची दाट शक्यता असते.

ज्याप्रमाणे निसर्गातील नदी किंवा झरा नियमितपणे आपल्या उद्दिष्टाकडे न थकता, न कंटाळता अविरतपणे वाटचाल करीत असतात व आपले ध्येय किंवा उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतरच विसावा घेतात. अगदी त्याप्रमाणेच आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करताना आपल्याला अनुभव येतो. कमी अधिक प्रमाणात ‘स्व’ म्हणजे आपले करिअर ते जर चुकीचे निवडले तर त्यात आपण रमत नाही. नाईलाज म्हणून काम करावे लागते. ते जर लोकविघातक असेल तर आपला प्रवास हा चुकीच्या दिशेने होतो. त्यात प्रामाणिकपणाचा अभाव असतो. आपल्या कामाचा, कार्याचा ना आपल्या स्वतःला आणि ना आपल्या आप्त स्वकीयांना अभिमान राहत नाही. म्हणून ‘स्व’ ची निवड करताना या सर्वच गोष्टींचा पुरेपूर विचार करावा.

वर्तमान कालखंडात समाजातील खूप मोठा तरुणांचा वर्ग स्वतःच्या क्षमता व मर्यादा याची जाण नसलेला दिसून येतो. अशी ही पिढी कर्तव्याला न जागता प्रलोभनाला मात्र बळी पडताना दिसते. या सर्वांचा परिणाम समाज सुस्तावतो. सर्व काही सहज मिळत असल्याने व हे सर्व काही आणून देणारा सध्याचा पालक आपल्या पाल्याला अनुभवातून शिकण्याचे चटके बसू देत नाही. त्यामुळे ही पिढी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या क्षमता, मर्यादांची जाणीव न होताच जीवन जगताना दिसते. खरंतर सुस्तावलेली ही पिढी सर्व काही सहज मिळत असल्याने संघर्ष करून, कष्ट करून मिळवणे विसरून गेलेली असते. स्वतःच्या क्षमताही माहित नसल्याने त्यांचा पुरेपूर वापर करीत यश मिळवणे हे ही माहित नसते. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधाणूकरणामुळे स्वतःच्या संस्कृती विषयी कमीपणाची भावना वाढीस लागलेली दिसून येते. एकमेकांच्या सहकार्याने सांघिक यश मिळवण्याकडेही या वर्गाच्या उत्साह नसतो. तेव्हा स्वतःच्या उच्चतम विकासासाठी किंवा सर्वोत्कृष्ट विकासासाठी आधी स्वतःला ओळखा म्हणजे आपले या भूतलावर का आगमन झाले याचे उत्तर आपल्यालाच मिळेल व आपण ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट करण्यास आपण सिद्ध होऊ.

धन्यवाद.

 

लेखक

प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे

के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली

prashantshirude1674@gmail.com

9967817876

प्रतिक्रिया व्यक्त करा