*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम लेख*
*”देहबुद्धी क्षीण व्हायला हवी”*
“देहबुद्धी क्षीण व्हायला हवी”
हे म्हणतो वाचतो, ऐकतो,त्या दृष्टीने होणारी वाटचाल म्हणजे नक्की काय?
हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य लोकांना पडतो. व त्याचा मार्गही खडतर आहे हे जाणवते.संसारात राहून देहबुद्धी वगैरे विचारांकडे लक्षही जात नाही कारण आपण या मायाजालात जास्तीत जास्त अडकलेलो असतो.उदाहरणार्थ चिक्कूतल्या बी सारखे फळातून अलग न होता, आंब्याच्या कोयी प्रमाणे विषयरसात गुरफटले जातो.कुणी सांगितले तर ?नंतर करू, अजुन आयुष्य पडलंय असे म्हणता म्हणता मरण दाराशी येऊन ठेपते.तीही वेळ माहीत नसते.गात्रे थकतात, असमर्थता येते.तेंव्हा परमेश्वराची आठवण येते. पण खुप उशिर झालेला असतो.काळ घाला घालतो व मनुष्य संचित कर्माच्या बंधनाने जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो.या कर्मातून कायमची सुटका म्हणजे मोक्ष. पण तो कसा मिळवायचा?
मनुष्य जन्माला आल्या पासून देहसुखाला चटावलेला असतो.इंद्रियापासून मिळणाऱ्या सुखात रममाण होतो.देहाला सुख देणाऱ्या वस्तु पैशाने मिळतात.त्याचा जास्तीत जास्त उपभोग कसा मिळवावा ह्याचा विचार करुन माणूस पैशाच्या मागे लागतो.म्हणजेच प्रपंच पसारा देहबुद्धीला वाढवतो.पण गरज व आवश्यक यातील सुक्ष्म फरक लक्षात घेऊन जर उपभोग्य वस्तु घेतली असेल तर मनाला समाधान लाभते . व दुसऱ्याचा हेवा, असुया ह्याला थारा मिळत नाही.हेच हाव क्षीण होण्याचे लक्षण आहे.
देहाला परमावधीचे महत्व दिल्याने देहाला विसरता येत नाही .त्या प्रवासात त्याला, देहदु:ख, विवंचना, संचित कर्मानुसार बरे वाईट परीणाम, अवहेलना,हे मरेपर्यंत भोगावे लागतात.त्यामुळे तो अर्धमेला झालेलाच असतो.कारण भुतकाळाचे चिंतन शोक निर्माण करतात, वर्तमानात प्रत्यक्ष घडते त्याचे दु:ख व्यर्थच जाते, तर भविष्य काळजी निर्माण करतात. संचित , प्रारब्ध हे माहित नसते.थोडक्यात, आयुष्य नियतीच्या हातातील कठपुतळीसारखे बाहुले बनलेले असते.
तसेच मनुष्य स्वभावानुसार, नित्य व्यवहारातील गोष्टीतील’अहं ‘सगळ्यात वरचढ असतो. अपेक्षा वाढल्या त्या पुर्ण झाल्या नाहीत किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे इतर वागले नाही तरी राग येतो.पण त्याच्या जागी आपण आहोत असा विचार करून त्याची भुमिका समजावून घेतली तरी रागावर नियंत्रण येते.
“आपुले अवगुण जाणवेना काही केल्या.”
ह्या समर्थांच्या उक्तीनुसार माणसाला यश मिळाले नाही तर त्याचे खापर दूसऱ्यावर फोडतो .पण स्वतः:तील उणीवा लक्षात घेऊन त्या सुधाराव्यात हे समजत नाही.
मग ,’मलाच ही दु:खे का?’ ह्यांचे दु:ख करत बसतो.कींवा कर्म माझे म्हणून रडत तरी बसतो व दोष दैवाला देतो .नाही तर हे कर्मभोग भोगले व ते भोग ह्याच जन्मात संपले ,तर पुढील जन्म तरी मिळणार नाही म्हणून सोसत राहतो. ही सर्व दु:खे देहबुद्धीने ,मीपणाने व स्वार्थाने निर्माण झालेली असतात.म्हणून परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच आपल्याला देह स्वभावाला मुरड घालणे.अशा स्वभावाने लोक आपलेसे होतात.मन शांत राहते.
ह्यावर समर्थ रामदास स्वामी, देहबुद्धीने जगताना,
“पेरिले ते उगवते! बोलण्यासारखे उत्तर येते”. तसेच
“जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सुत्र”.
असे उपाय सुचवतात.म्हणून सारासार विवेकाचा अभ्यास करून वर्तन केले म्हणजे ते आपल्या कृतीतून इतरांपर्यंत पोचते.म्हणजेच “देहभान ज्ञान शास्त्रे खुडावे “यांचे प्रत्यंतर येते.
प्रपंचाचा पसारा देहबुद्धीला वाढवतो.पण शरीर आहे तोवर क्रमप्राप्त व्यवहार करणे आवश्यकच असते.पण ते व्यवहार, निष्काम बुद्धीने, समतोल राखुन व आसक्ती रहित केले तर विकार उत्पन्न होत नाहीत.म्हणजे करुन अकर्ता व भोगून अभोक्ता ,अशी स्थिती प्राप्त होते.
सर्व कार्यात प्रवृती होऊनही कर्मापासून जिवात्मा मुक्त राहतो. ते कर्मबंधनकारक होत नाही. संसारात निरिच्छ बुद्धी ने राहून,इतरांच्या कामात विचारल्या शिवाय लुडबुड केली नाही तर आपण आपोआप च निवृत्तीच्या मार्गावर वाटचाल करतोय असे मनोबुध्दीला जाणवते ,आपणही अंतर्मुख होतो.आपसुकच रिकामा वेळ आपल्या आवडत्या छंदात, साधनेत, चिंतनात घालवता येतो.व गीतेत सांगितल्याप्रमाणे
“सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो!”
अशी अवस्था यायला मदत होते.
जसे सोने चिखलात पडले तरी त्याला मातीचा संपर्क होऊ शकत नाही.तसे निर्मल मनाचा देहाशी संबंध नसतो.त्यामुळे हळूहळू अलिप्तता वाढत जाते.माझ्या वाचून अडेल, माझ्याशिवाय काही होणारच नाही हा भ्रम ही दूर होतो.व आपण गेलो तरी “जनपळभर म्हणतील हाय हाय” हे जागतिक सत्य समोर येते.”अशा जगास्तव काय कुढावे मोही कुणाच्या का गूंतावे” ह्या भा.रा.तांबे
यांच्याच शेवटच्या ओळीकडे मनाची धारणा होते.मग मात्र आता आपण फक्त आपल्या मोक्षाच्या द्दष्टीने विचार करावा हा स्वार्थ बळावतो.हीच देहबुद्धी वरची सर्वात मोठी मात आहे व खरे स्वसुख कशात आहे हे समजण्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीला मिळालेली कलाटणी आहे.
कारण आतापर्यंत देहाची उपाधी म्हणजे’ मी.’ म्हणजेच अहंभाव .यातच आपण गुरफटलेले असतो.
हा अहंभावच दु:खाच्या मुळाशी असतो.त्याला केलेला ज्ञानोपदेशही वाया जातो.ह्या मी मुळेच भेद निर्माण होतो. भेदातून आपपरभाव,स्वार्थ,नितिभ्रष्टता,
विवंचना,भय, काळजी,दु:ख, असे भाव चढत्या क्रमाने वाढत जातात.म्हणून ‘मी’ असलेली देहबुद्धी कमी करावी.हा अहंभाव क्षणभंगुर असतो.उदा–
माणुस अनितीने वागला व समाजात पैशाच्या जोरावर चांगला म्हणून मिरवला,वरकरणी हा अहंभाव जोपासला तरी मनाला फसवू शकत नाही.ती टोचणी आयुष्य भर त्याला कुरतडत राहते.त्यामुळे आत्महित साधू शकत नाही.कारण अशा दुटप्पी लोकांमुळेच सज्जनांना त्रास सहन करावा लागलेला असतो.म्हणून हा अहं कमी झालाकि, बाकीची शस्त्रे बोथट होतात.
द्दश्य जग म्हणजे अहं जोपासलेले, तात्पुरते,पण पंचमहाभूतांपासून बनलेले अदृश्य जग आत्मसाक्षात्काराचे आत्मस्वरूप असते.म्हणून देहापासून मिळणाऱ्या सुखाची आसक्ती कमी करावी व भगवंताचे प्रेम वाढवावे.
सर्वाभूती परमेश्वर मानून दुसऱ्यासाठी झिजावे.त्यामुळे दुसऱ्याचे कार्य होते व मरणानंतरही आपली आठवण काढली जाते.निस्वार्थी व परोपकारी भक्तांमुळे समाज निरोगी राहतो. म्हणून” देहेदु:ख ते सुख मानीत जावे.विवेके सदा स्वरुपी भरावे.”नित्य व अनित्य जाणून आपले अंतरंग भगवंताचे ठायी लावावे.त्याचे स्मरण म्हणजे आहे पणाचा अभ्यास व देहाची नावड,देहाचे विस्मरण करून त्याचे प्रेम कमी करणे म्हणजे नाहीपणाचा अभ्यास.देहाचे विस्मरण घडविण्यासाठी ‘नाही’ कला आत्मसात करावी.माणसाला नको असलेली दु:खे जीवनात भोगावी लागतातच.पण पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की,तो त्रास कमी वाटतो.ते होण्याने देहाचे प्रेम कमी होत गेल्याचा आनंद मिळतो.वस्तुरुप झालेले मन भगव्दरूप होते.
आत्मज्ञानी मनुष्याला सर्व सुखे दु:खरुपच वाटतात.कारण हे सुख कल्पांती नष्ट होणारे आहे हे त्यांना माहीत असते म्हणून
त्यांना कशाचा मोह नसतो.कोणतीही गोष्ट चित्ता ला आकर्षित करत नाही.राजस व तामसी वासना (लालसा, क्रोध,लोभ)नष्ट झाल्यामुळे, सुखदुःखाचा कर्ता मीच आहे
हा समभाव निर्माण होऊन भोगेच्छा नष्ट होते.कारण जसे आपण अग्नी पासून सावध असतो.तसे त्यांनी इंद्रियांच्या भोगापासुन सावध राहिल्याने वासना रहीत होतात व मोक्ष मिळवतात.
या साठी समर्थ रामदास स्वामी सांगतात.
विवेके देहेबुध्दी सोडून द्यावी.
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी !
इतका सरळ सोपा पण, जीवनाचे सार सुक्ष्म अर्थाने भरलेला उपदेश करतात, व मोक्षाचा मार्ग दाखवितात.
मन देहाच्या विषयात रममाण होते त्याला निग्रहाने दूर करावे.भगवंताच्या अनुसंधाच्या आड जे देहविकार येतात त्याला अभ्यास पुर्वक बाजुला सारणे ही मनाची शक्ती.म्हणून अभ्यासे प्रगट व्हावे.
कारण देह व मन स्थूल रूप आहे तर आत्मा सुक्ष्मरुप आहे हे समजण्यासाठी अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे.
मी देह नाही आत्माच आहे.हा निश्चय करावा.
देहाची उपाधी देह भोगतोय.तो भोगून झाला कि, मोक्षाच्या आनंद मिळेल.जसे कर्जाचा हप्ता देताना काटकसरीला तोंड देऊन मनावर निर्बंध घालायचे दु:ख पचवावे लागते पण कर्जमुक्त होऊ हा आनंदाचा विचार ते दु:ख हलके करतो.
देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे.
देहेबुध्दी रे ज्ञानबोधे तजावी.
विदेही पणा म्हणजे देहाचे भान. व्यवहार चालवण्यापुरते आवश्यक आहे.येणारी सुखदुःखे देह भोगत असतो.त्यात आपण बदल करू शकत नाही.त्यावर काळाची सत्ता चालते.म्हणजे देह स्वरूप व्यक्त करतो , पण काळ त्याला घेऊन जातो म्हणून देहाची काळजी व्यर्थ आहे ती निरर्थक ठरते.म्हणून जीवनातील सुखदुःखाना धीराने तोंड द्यावे.
पण,हा’पणच’ अहंतेच्या रुपाने मधे येतो.व
“कळेना, कळेना,वळेना,वळेना
गळेना गळेना अहंता गळेना ”
अशी अवस्था होते.म्हणून अहंभाव सोडावा.
महाबलाढ्य, सर्वगुणसंपन्न,शिवकृपा असलेला विद्वान रावण , सीतेच्या अपहरणाचा कलंक लागल्याने रसातळाला गेला. मग सामान्य माणसाची काय कथा?दुष्ट वासना माणसाला उन्मत बनवते.आपण फार मोठे असल्याचा भ्रम निर्माण होऊन तो दुष्कृत्ये करायला प्रवृत्त होतो.अंतकाळी इथेच सर्व सोडावे लागते वैभव,ऐश्वर्य बरोबर येत नाही.कमाल स्वार्थ व किमान परमार्थ अशा अवस्थेत माणूस देह सोडतो पण वासनामय कोशात मन अडकते व पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकला जातो.
भोग –हे पुर्व कर्मानुसार व अकल्पितपणे घडतात त्यांची सुरुवात गर्भावस्थेपासुन होते.
चलनवलन–जिवंतपण व पिंडपोषण जीवनशक्तीच्या पुरवठ्यावर,
मानसिक शक्ती–जीवनातील सुखदुःखावर व मनोबलावर,
आध्यात्मिक व ईश्वरीय शक्ती– जन्ममरणाच्या भोगावर .
म्हणजेच सर्व शक्ती नियतीवर अवलंबून असतात.म्हणून शांत मनाने त्याकडे पहावे.
गुण रहित अशा निर्गुण स्वरुपाचे स्मरण ठेवले कि, देहेबुध्दीचे विस्मरण होते.
थोडक्यात ह्या ‘शरीराच्या विकाराकडे ‘इदंम न मम्’ अशा वृत्तीने पहावे.शंकराचार्यांचे ‘मरणाष्टक ‘तर त्या द्दष्टीने अभ्यासण्या जोगेच आहे.त्यांनी मन, बुद्धी, अहंकार, शरीरातील,पंचप्राण, बरोबर सर्व इंद्रिये ,मन,धर्म,अर्थ काम,नातलग,हे सर्व विकार मला काही करू शकत नाहीत.कारण ‘मीच’ सत् चित् आनंद स्वरुप शिव आहे.त्यामुळे कोणतेच विकार,व्याधी,मला स्पर्श करू शकत नाहीत.इतक्या उच्च कोटीत ह्या शरीराची जाणीव करून दिली आहे .
समर्थांची व शंकराचार्यांची शिकवणच आपल्याला कशाप्रकारे ‘अभ्यासे प्रगटावे’ ह्याची जाणीव करून देते.व देहबुध्दीचा लय कसा करावा याचे योग्य मार्गदर्शन मिळते.
“प्रपंच करावा नेटका ,मग परमार्थ साधावा” हे प्रपंच व परमार्थ यांचा मेळ घालून जीवनातील खाच खळगे कसे पार करावेत ह्याचा सोप्या भाषेत उहापोह समर्थ दासबोधात अतिशय उत्तम प्रकारे करतात.परमार्थासाठी प्रपंच सोडा असे न सांगता मात कशी करावी याचे मार्गदर्शन करतात. जसे सागरातील दिपस्तंभ, समुद्रातील वादळ थांबवू शकत नाही पण लक्ष्य (कसे जायचे) गाठण्यासाठी दिशा दाखवते.
प्रतिभा फणसळकर.