ओरोस
जिल्ह्यातील लक्ष्मण नरसिंगराव पवार व कृष्णाजी रामचंद्र दळवी या दोन ग्रामसेवकाना राज्यस्तरीय पुरस्कार मिळण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. तसेच कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबार्डे येथील श्री वेतोबा महिला स्वयंसहाय्यता समूह बचतगटाने राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच उत्कृष्ट पत्रकारीतेचा जिल्हास्तर प्रथम क्रमांक पुरस्कार दै सकाळ ओरोस प्रतिनिधी विनोद गोविंद दळवी यानी मिळाला असून त्यांची निवड कोकण विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार शिफारस व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार २९२०-२१ जिल्हास्तरिय निकाल जाहिर करण्यासाठी अध्यक्षा सौ नाईक यानी आपल्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, प्रभारी प्रकल्प संचालक तथा ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, विस्तार अधिकारी एम आय शिंगाडे, ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्षा सौ नाईक यानी, जिल्हा परिषदेला राज्य स्तरीय आदर्श ग्राम सेवक पुरस्कारासाठी चार प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील विरडी ग्रामसेवक लक्ष्मण पवार, मालवण तालुक्यातील बुधवळे-कुडोपी व आडवली-मालडी ग्रामसेवक कृष्णाजी दळवी, मालवण तालुक्यातील चौके ग्रामसेवक अशोक पाटील, कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामसेवक श्रीकांत तांबे यांचा समावेश होता. यातील लक्ष्मण पवार व कृष्णाजी दळवी यांना ४०० पैकी सर्वाधिक ३२२ गुण मिळाले आहेत. त्यामुळे या दोघांची निवड राज्यस्तरीय पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे सांगितले.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात सर्वोत्तम काम करणाऱ्या तीन बचतगटांची निवड जिल्ह्यात करण्यात आली आहेत. यासाठी तालुकास्तरावर प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक काढून एकूण २४ प्रस्ताव जिल्हास्तरासाठी प्राप्त झाले होते. यातील तीन बचतगटांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली असून हे बचतगत कोकण विभागीय मूल्यमापनसाठी पात्र ठरले आहेत. हे तिन्ही बचतगट कुडाळ तालुक्यातील आहेत. प्रथम क्रमांक वेताळ बांबार्डे गावातील श्री वेतोबा महिला स्वयंसहाय्यता समूह, द्वितीय क्रमांक अणाव हुमरमळा येथील श्री चव्हाटा प्रसन्न महिला स्वयंसहाय्यता समूह आणि तृतीय क्रमांक याच गावातील महापुरुष महिला स्वयंसहाय्यता समूह यांना मिळाला असल्याचे यावेळी अध्यक्षा सौ नाईक यानी सांगितले.