*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*हनुमान जयंती उत्सव*
( चैत्रशुद्ध पौर्णिमा )
********************
*मनोजवं मारुतीतुल्यवेगं*
*जितेंद्रियम बुद्धिमतांवरिष्ठम*
असे प्रभूरामचंद्र यांचा भक्त वीर हनुमंत याचे वर्णन प.पू. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या *भीमरुपी* या मारुतीस्तोत्रामध्ये अत्यन्त प्रासादिक शब्दात केलेले आहे.
*चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा ” चैत्रशुद्ध नवमी म्हणजे रामनवमी* तर *चैत्रशुद्ध पौर्णिमा* म्हणजे *हनुमान जयंती* रामनवमी नंतर बरोबर 15 दिवसांनी रामभक्त *हनुमंत* यांचा जन्म झाला असून तो सर्वत्र अत्यन्त उत्साहाने साजरा केला जातो.
*हनुमंत ( मारुती)* ही *बुद्धी आणी शक्तीची* देवता मानली जाते. भारतीय धर्मग्रँथामध्ये रामायण महाभारत या हिंदूंच्या धर्मग्रंथात याचे व त्या कालावधीचे वर्णन केलेले आहे.
पौराणिक कथेत उल्लेखील्या प्रमाणे
*चक्रवर्ती राजा दशरथाने पुत्रप्राप्ती प्रित्यर्थ पूत्रकामेष्ठी यज्ञ केला होता त्या प्रसंगी त्या पवित्र यज्ञातुन प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाले होते व त्यांनी राजा दशरथाच्या तिन्ही म्हणजे कौसल्या , सुमित्रा , कैकयी या महाराण्यासाठी पायस ( खिरीचा प्रसाद ) दिला होता. त्या प्रसादामुळे राजा दशरथाच्या सर्व राण्यांना पुत्रप्राप्ती झाली आणी प्रभूरामचंद्र , लक्ष्मण , भरत , शत्रुघन यांचा जन्म झाला . पण तोच प्रसाद योगायोगाने आकाशात भ्रमण करत असलेल्या एका घारीच्या मार्फत एका वनामध्ये एक वानरस्त्री ध्यानस्थ बसली होती तिच्या ओंजळीत पडला त्या वानरीने तो प्रसाद श्रद्धेने ग्रहण केला आणि त्यातून तिच्या पोटी *हनुमंत ( मारुतीराय )* जन्माला आले ही आख्यायिका आहे. या बाबतचे सर्व दृष्टांत हे पौराणिक ब्रह्मान्ड पुराणात आढळतात.
*एकनाथी भागवत ग्रंथात देखील हनुमंताच्या जन्माची कथा वर्णन केली आहे.
मारुतीरायाचा जन्म हा अंजनेरी पर्वतावर अंजनीच्या पोटी झाला म्हणून हनुमंताचा उल्लेख *अंजनीसुत* म्हणून केला जातो . हनुमंताच्या वडिलांना *वानरराज केसरी* म्हणत असत. हनुमंताला जन्मताच अनेक सिध्दी प्राप्त होत्या. हनुमंत बलाढय , तेजस्वी ,पराक्रमी होता. स्वर्गाधी देव देखील त्याच्या पराक्रमाने भयभीत झाले होते. या पराक्रमी हनुमंताच्या अनेक कथा पुरणात ऐकण्यास मिळतात.
पुढे रामायणात *प्रभुरामचंद्र वनवासात असताना हनुमंताची व रामसीतालक्ष्मण यांची भेट झाली.
पुढील सर्व इतिहास सर्वश्रुत आहे.
आजही हनुमंत *चिरंजीव* आहे. जिथे जिथे रामनाम घेतले जाते, रामस्तुती केली जाते तिथे तिथे प्रत्यक्ष *रामभक्त हनुमंत उपस्थित असतात अशी श्रद्धावान लोकांची श्रद्धा आहे.*
(वैयक्तिक मलाही त्याची प्रचिती आहे.)
हनुमंताला मारुती ,, बजरंगबली , अंजनीसूत , महावीर , पवनपुत्र , केशरीनंदन अशा अनेक नावांनी संबोधले जाते. गदा हे त्याचे शस्त्र आहे. त्याला शंकराचा अवतारही मानले जाते. या कलियुगातील *संकट हरण करणारी शक्तीदेवता* म्हणजे हनुमंत असे मानले जाते.
हनुमान जयंतीचे महत्व हिंदूधर्मात सर्वत्र असून *हनुमंत ही बलोपासनेची* देवता मानली जाते. म्हणून संकटे , साडेसाती , दुष्टचक्र , असणाऱ्या व्यक्तींनी हनुमंताची आराधना ( भक्ती ) करावी असे म्हटले आहे. आणि रामभक्त हनुमंत हा चिरंजीव असल्यामुळे तो सदैव आपल्या सोबत अस्तित्वात आहे अशी भक्तांची मनधारणा आहे.हिंदूधर्मात हनुमंताला *शक्ती ,स्फूर्ती , ऊर्जा* यांचे प्रतीक मानले आहे.
*हनुमंत म्हणजे परमरामभक्त* आणि पृथ्वीतलावरील *अक्षयी दास्यभक्तीचे* अत्यन्त उत्तम उदाहरण आहे.
याची प्रचिती आपण *रामायणातील कथा* वाचताना येते. अगदी महाभारतात देखील *कुरूक्षेत्रावर* राम हा कृष्णावतार असल्यामुळे युद्धकाळात रामभक्त हनुमंत हा अर्जुनाच्या रथावर आरूढ झालेला आहे हे दिसून येते.
समर्थ रामदास स्वामींना साक्षात प्रभुरामचंद्र यांनी गुरूमंत्रोपदेश दिला होता आणि प्रत्यक्षात आपल्या परमभक्त मारुतीरायाच्या स्वाधीन केले होते. असे म्हणतात…
म्हणूनच
*”आमचे कुळी हनुमंत ।*
*हनुमंत आमुचे मुख्य दैवत ।*
*त्याविण आमुचा परमार्थ ।*
*सिद्धीते न पवे सर्वथा ।*
म्हणूनच समर्थांना धर्मस्थापना करायची होती. त्यासाठी प्रजेमध्ये *ज्ञान , भक्ती , आणि शक्ती* आवश्यक असल्यामुळे मारुतीरायामध्ये या तिन्ही सत्वगुणांचा संगम होता. मारुतीराय हे सर्वगुण संपन्न होते. त्यामुळे रामदास स्वामींनी या बालब्रह्मचारी वज्र्यदेही हनुमंताची उपासना करून हे सर्व गुण स्वतः आत्मसात करून घेतले होते. आणी समाज बलशाली , निर्भय व्हावा म्हणून सामर्थ्यशाली हनुमंताची उपासना , म्हणजे *बलोपासना* समर्थानी रूढ केली.
हे सारे लिहिताना या वयात बालपण आठवते. सातारला आमच्या पेठेत अनेक मंदिरे होती. सारे वातावरण संस्कारक्षम होते. बलोपासनेला प्राधान्य होते. श्रद्धा , भक्ती , अनुसंधान , चारित्र्य यांची पदोपदी शिकवण होती. सांगण्यासारख्या अनेक घटना आहेत. त्यापैकी एक म्हणजे *आमच्याच पेठेतील प्रतापमारुती मंदिर* आज त्या मंदिराचा ट्रस्ट आहे अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ट्रस्ट तर्फे होत असतात. पण मला आठवीते ते अगदी छोटेसे मारुती मंदिर आणी सातत्याने रोज भक्तिभावाने पूजा करणारे *कै. अनंतराव बोधे* अत्यन्त सालस व्यक्तिमत्व आणि प्रत्येक वर्षी स्वतः *पहाटे उठून *हनुमान जयंतीचा उत्सव* *करणारे आणि आम्हा सर्वांना* *त्या उत्सवात सामील करून कीर्तन प्रवचन करणारे अगदी निस्वार्थी असे व्यक्तिमत्त्व..!
*त्यांची आवर्जून आठवण मात्र येते*…..असो..
*प.पू. रामदास स्वामी म्हणतात की*
*”सर्वात अत्यन्त वेगवान मन हे आहे आणी अशा प्रचंड वेगवान मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ रामभक्त हा हनुमंतातच आहे.*
अशा रामभक्त हनुमतांची जयंती सर्वत्र *चैत्रशुद्ध पौर्णिमा ( हनुमान जयंती )
भक्तीपूर्ण भावनेने केली जाते.
*ईती लेखन सीमा*
************************
*@वि.ग.सातपुते.( साहित्यिक )*
*संस्थापक अध्यक्ष:-*
*महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे* ( महाराष्ट्र )
*📞( 9766544908 )*