*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*’दुःख म्हणजे काय’*
*(प्रत्येकाच्या आयुष्यातील सत्य एकदा वाचून तर बघा)*
***********************
दुःख म्हणजे नेमके काय असतं आजपर्यंत कुणाला कळलय का? दुःखांचा विस्तार खूप मोठा आहे.दु:ख जेव्हढं कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हढ ते पसरत जात म्हणून आली या भोगासी असावे साधन या म्हणी प्रमाणे माणसाला आयुष्य जगावं लागतं.म्हणजे आयुष्याच्या कशिद्यावर दुःखाच्या झालरीला एक हलकीशी सुखाची किनार लागलेली असते म्हणून कधी कधी न कळत काही क्षण सुखाचे येतात.तेव्हढाच आंनदाचा विरंगुळा मनावर भुरळ घालतो.कारण पुर्णतः सुख कुणाच्याही वाटेला येत नाही किंबहुना सुख विकतही मिळत नाही.दु:ख कधीही केंव्हाही न सांगता कुणाच्याही वाटेला येतं,येवू शकतं.अर्थात दुःख सांगुन येत नसलं तरी त्या दुःखाच्या वेदनांनी मनं हळवं होत हे मात्र निश्चित.तसेच सुख ही सहजपणे कुणाच्या वाटेला उभं रहात नाही.सुखासाठी अपार प्रयत्न करावे लागतात.कष्टाशिवाय सुख मिळत नाही.सुखाला कष्ट,मेहनतीची गोडी असते म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय पाय टाकायला सुखाच्या पायघड्या मिळत नसतात.पण दुःखाच्या बाबतीत जरा काही वेगळे आहे.प्रत्येकाच्या वाटेला आलेले अनुभव वेगळे असतात.खरतर दुःख पचवायला अवघड असलं तरी दुःख बरंच काही शिकवत असते. आजुबाजूच्या परिस्थितीच निरीक्षण करायला लावतं.माणस कशी वागतात याचं परिक्षण करण्याची क्षमता दुःखातून येत असते.दुखातच माणसाच्या खरेपनाची ओळख होते कोण किती आपले यांचा अंदाज दुःख आल्यावर कळते.अर्थात असं म्हणतात की काय होतास तू आणि काय झालास तू म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हाल अपेष्टा भोगून दुःखातून
मार्ग काढीत गरिबीचा सामना करून, प्रतिकूल परिस्थितीतून सुखासुखी जगण्यासाठी परिवर्तन होते त्यार्थी काय होतास तू काय झालास तू अस म्हटल जातं.म्हणजे अचानक झोपडीचा बंगला होतो आणि मग बघणारे वेगळा विचार करायला लागतात पण त्या मागे किती वेदना यातना दुःख भोगलेले असतात,अपार कष्ट असतात मेहेनत परिश्रम असतात याचा विचार कोणी करत नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुखासाठी किती झगडावं लागतं पावलोपावली येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांचा,प्रसंगाचा सामना करत त्यातून मार्ग काढताना खूप कसरत करावी लागते अशावेळी आपले नाते संबधी सुध्दा आपल्याला मदत करत नाही सहकार्य करत नाही.पडतीच्या काळात सारेच लांबून गंमत बघतील.नुस्ती विचारपूस करण्याचं सौजन्य ही त्यावेळी आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये नसते कदाचीत दुसऱ्यांच्या दुःखाच्या आगीत उगाच आपण होरपळून जावू या भितीपोटी दुरून डोंगर साजरे करून घेतात.खरतर पडतिच्या
काळात.प्रतिकूल परिस्थितीत
दुःखाच्या जखमेवर एक जाणिवेची मृदू फुंकर हवी असते,सहानुभूतीचा हात पाठीवर हवा असतो. दुःखाच्या गर्तेतून बाहेर पडायला किंबहुना एक पाऊल पुढे टाकायला आधाराचा हात हवा असतो.पण अशा परिस्थितीत आपलीच जवळची माणसं दुःखावर फुंकर घालण्यावजी आनंद साजरा करतात.कोणीही असूदे परिस्थिती जास्त काळ एकाच ठिकाणी राहत नाही.वेळ काळानंतर ती बदल असते.पण त्या वेळेची हालाखीची, गरीबीची,दुःखाची,परिस्थिती माणसं ओळखायला शिकवते हे मात्र निश्चित.
अशी कितीतरी माणसं आहेत की ते दुःखात,प्रतिकूल परिस्थितीत राहुन काहीना काही कामं करून सुख मिळवण्याच्या प्रयत्नात असतात ते कधीच दुःख दाखवत नाही,सांगत ही नाही मनावर असंख्य घाव असुनही त्यांच्या चेहऱ्यावर हास्याच्या असंख्य लकीरा असतात. समाधानाच तेज त्यांच्या चेहऱ्यावर चकाकत असतं. जन्माला आलोय ना मग सुख काय दुःख काय हार नाही मानायची जो हार मानत नाही त्यांच्यातच परिस्थिती बदलवण्याची ताकद असते
जो दुःख घोळून निपळू गिळून घेतो तोच परिस्थिती बदलवू शकतो. माणसाने आपले मागचे गेलेले दिवस, आपली गरीबी,आपली हालाखीची परिस्थिती,कधीच विसरायचं नाही कारण आपले दुःखाचे हालाखीचे दिवसच पुढच्या प्रगतीसाठी बळ देत असतात.त्यामुळे जगायला उर्जा मिळते मागच्या दिवसांमूळेच पुढे पळायला प्रेरणा मिळते.म्हणून माणसाने आपली गरीबी कधीच विसरायची नाही.
काहीही असो माणूस किती गरीब, श्रीमंत असला आनंदीत असला तरी कुठे ना कुठे तरी वेदनांची,दुःखाची कळ त्यांच्या काळजात घर करून रहाते.सर्वच सुखात राहिले म्हटल्यावर दुःखाला ही कुठेतरी जागा हवी ना सुख तर आपण आनंदाच्या भरात सांगून टाकतो.दु:ख सहजासहजी सांगत नाही दुःख मोकळं करायला कुठेतरी जागा शोधावी लागते दुःख हलकं करायला कोणीतरी हक्काचा असावा लागतो.सुखासाठी संघर्ष करावा लागतो,प्रयत्न करावा लागतो, आहे त्या परिस्थितीचा सामना करून परिस्थितीशी लढताना मार्ग काढावा लागतो तेव्हा कुठे तरी दुःख ओसरते आणि मग सुख वाटेला येतं.आपल्या अवतीभोवती पाहीले तर प्रत्येकाच्या संवेदना सारख्याच असतात काही माणसं दाखवतात काही दाखवत नाही.काही सांगुन मोकळे होतात तर काही स्वतःजवळ राहू देतात. प्रत्येकजण नैराश्यात गुरफटलेला आहे तरीही माणूस जगण्यासाठी धडपड असतो.प्रत्येकाला जगायचं असतं मगं कितीही नैराश्य येवू दे दुःख येवू दे घाबरायच नाही.लढायचं जो लढतो तो कसल्याच परिणामा़ंचा विचार करत नाही.संघर्षाच्या लढाईत जगण्याची जी मजा आहे ती कशातच नाही कारणं जो संघर्ष करताना संकटावर मात करून विजयी होतो तो आयुष्यात कधीच पराभव होत नाही. तेव्हा दुःख,नैराश्य आले म्हणून हार न मानता लढायला शिकले पाहिजे. काहींना नैराश्य सहन होत नाही म्हणून आत्महत्या स्विकारतात पण मरण हा पर्याय नाही.दु:खातच त्या वेळची परिस्थिती एक संधी देते त्या संधीच ज्याला सोनं करता आलं तोच खऱ्याअर्थाने सुखाने जगतो.*दु:ख तर येत असतं जात असतं त्याला धरून ठेवायचं नसतं सुखाचे दिवस एकना एक दिवस येणारच असतात आपण मात्र आपलं जगणं आणि हसणं सोडायचं नसतं*.म्हणून या जगात आपणच एकटे दुःखात आहोत असं नाही आपल्या सारखे कितीतरी कैक लोक आहेत की ते अतिशय हालाखित जगतात पण हार मानत नाही.कारण दुःखच सुखाची वाट मोकळी करून देत असतं.म्हणून माणसाने जगलं पाहिजे.या जगात करण्यासारखं खूप काही आहे.एकच रडगाणे गात बसलो तर आपल्या हातून बरंच काही निसटून जाते.म्हणून सुख असो अथवा दुःख असो.कसलाच विचार न करता आयुष्य जगायचं.एक मात्र निश्चित सर्वं काही करून ही पदरात काहीच पडत नाही.प्रयत्नांचीपराकाष्टा करूनही माणूस जेव्हा थांबतो तेव्हा परमेश्वर त्याच्या मदतीला धावून येतो. कारणं परमेश्वराशिवाय काहीच नसते तेव्हा देवावर विश्वास ठेवून जो संकटावर मात करून दुःखांचा सामना करत पुढे जाण्याची हिंमत ठेवतो परमेश्वर त्याला पुन्हा मागे वळून बघण्याची वेळ येवून देतं नाही.एव्हढ मात्र निश्चित.
*(संजय धनगव्हाळ*)
*(अर्थात कुसुमाई*)
९५७९११३५४७
९४२२८९२६१८