*वेंगुर्ल्यात उत्साहात पार पडले भव्य प्रकाशझोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन*
*खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजन*
वेंगुर्ला
भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग व जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य प्रकाशझोतातील खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन वेंगुर्ल्यातील कॅम्प मैदानावर उत्साहात पार पडले. हे आयोजन माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री ,विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ” क्रीडा महाकुंभ ” अंतर्गत करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी व भाजप जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना मनीष दळवी यांनी नमूद केले की, “नारायणराव राणे यांनी विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व केले असून, ही बाब त्यांच्या अनुभवसंपन्न व अभ्यासू नेतृत्वाची साक्ष आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा जिल्ह्याला नेहमीच फायदा झाला आहे.”
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही राणे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले, “नारायणराव राणे यांनी राजकारणात विकासाचा अजेंडा कायम अग्रस्थानी ठेवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांनी नेहमीच प्रभावी पाठपुरावा केला आहे. जिल्ह्याच्या रस्त्यांची कामं, शिक्षण संस्था, औद्योगिक संधी यासाठी त्यांनी दिलेला लढा आणि त्यातून झालेले सकारात्मक बदल जनतेच्या डोळ्यादेखत आहेत.”
या गौरवपर भाषणांनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रकाशझोतात पार पडणारी ही स्पर्धा केवळ खेळाचा उत्सव नसून, जिल्ह्यातील युवकांसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नामांकित संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. विविध संघांमधील रंगतदार सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
प्रेक्षकांचा उत्साह, खेळाडूंची उमेद, मैदानावरील जल्लोष, प्रकाशझोतांखाली खेळले जाणारे सामने – हे सारे वातावरण खऱ्या अर्थाने खेळाचा उत्सव घडवत होते. आयोजकांच्या सुयोग्य नियोजनामुळे स्पर्धेची सुरुवात अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी झाली.
कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष राजन गिरप,जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , ता.सरचिटणीस पपू परब , मच्छिमार नेते दादा केळुसकर , जयंत मोंडकर , बीट्टु गावडे , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे व नितीन चव्हाण , तुषार साळगांवकर , हेमंत गावडे , भुषण सारंग , भुषण आंगचेकर , शरद मेस्त्री , प्रमोद वेर्णेकर , भानु मांजरेकर , खर्डेकर महाविद्यालयाचे जे.वाय.नाईक सर, शंकर घारे , विनय गोरे , विजय बागकर , प्रकाश रेगे साहेब , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , विलास दळवी , संजय पाटील , जय मानसीश्वर मित्रमंडळाचे सॅमसन फर्नांडिस , विनायक मांजरेकर तसेच बहुसंख्य खेळाडू , कार्यकर्ते, नागरिक आणि खेळप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडासंस्कृतीला चालना मिळेल, आणि नवोदित खेळाडूंना भविष्यकाळात मोठ्या संधी मिळतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले.