*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक “भोवतालकार” ज्येष्ठ मालवणी साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट-८*
*टुर्लामेंटी*
शिमगा संपला होता. चैत्राचे देखील दहा दिवस संपले होते. तेवढ्यात एक संकासुराचे सोंग दारात आले. मला आश्चर्य वाटले. तो माणूस रुपड्यातूनच ओरडला, “शबय,शबय. जो शबय घालीत, तेच्ये जमनी वाचतीत; नाय घालीत तेची पोरा टुर्लामेंटी खेळतीत.” माझ्या लगेच लक्ष्यात आले, हा काकल्याच. मी त्याला त्याचा मुखवटा काढून बसायला सांगितलं. त्याला चहा दिला. मग म्हटलं, “हे नवीन उद्योग कसले?” तर म्हणतो, “ह्या माझा समाजकार्य आसा. अरे, पुरी पिढी टुर्लामेंटीत अडाकला. काय खरा नाय. बरा जय खेळतत, तो सातबारा दुसर्यागेर चल्लोहा. कोनाकच काय पडलला नाय. म्हटला आपणतरी लोकांक सावध करया. ह्या न्हिबरात पोर रगात ओकतीत रे, अशी परस्तिती हा. बरा दिवसा टुर्लामेंटी, रातच्ये पार्टे आणि जोडयेक जुगार असो त्रिवेणी संगम आसा, अशे लोक बोलतत.”
मी म्हणालो, “अरे, त्यांना खेळू नका असं सांगून काही होणार नाही. त्यांना पर्यायी काहीतरी काम द्यायला पाहिजे. काय नको, हे सांगण्यापेक्षा काय हवं ते सांगायला पाहिजे. एका ग्रामपंचायतीने ‘येथे थुंकू नका’ असं लिहिण्या ऐवजी रस्त्याच्या कडेला दोन-दोनशे मीटरवर बेसिन बांधून ‘येथे थुंका’ असं लिहिलं. असं काहीतरी करायला हवं.”
काकल्या म्हणाला, “येक म्हंजे, कामा नाय असा नाय, कामा हत. पून आमी जी कामा केली, ती हे काय करुचे नाय. माडार चडना, बावडेत उतारना, लाकडा फोडना ह्या आता गेला रे. हेंका होये नोकरे. चीन-जपान सारखे वाड्यावाड्यात न्हान न्हान उद्योग सुरू होवक् होये. हयल्या मालार हयच प्रयोग होवक् होये. ह्या कठीण आसात, पण अशक्य नाय.”
काकल्या थोडं थांबून पुन्हा म्हणाला, “तसाच तेंका तिनसाना खेळाची सोय करून दिवक् हयी. ह्या आमच्या पिढयेन करूक होया. दिवसाच्ये टुर्लामेंटी मात्र बिलकुल बंद जावक् होये. बरा, तुझो झील खय या म्हायत हा?”
मी म्हणालो,”नाही”
“माझ्या झीलाक घेवन् तळावड्याक खेळाक गेलाहा. ह्या बग. आग न्हेसणा पर्यंत इलीहा, आता तरी हातपाय मार”, माझं डोकं सुन्न करुन न काकल्या चालू पडला.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802