*मोबाईल मुळे घरातील सुसंवाद हरपला*
*पालकांनी मुलांना वेळ देणे गरजेचे*
*पिंगुळी येथे पालक व मुलांसाठी परिसंवाद*
कुडाळ :
अलीकडे मोबाईलच्या अनाठायी वापरामुळे घराघरातील सुसंवाद हरपला आहे. मुलं तासनतास मोबाईलवर विविध पद्धतीचे रिल्स बघतात. यातून त्यांच्यात विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. पालकही आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून मुलांसाठी वेळ द्यायला तयार नाहीत. अशावेळी ‘मोबाईल हाच आपला मित्र’ असा गैरसमज मुलांच्या मनात निर्माण होऊन मोबाईल स्क्रीन टाईम वाढत आहे. यातून अनेक गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील. त्यामुळे सजग पालकत्व पत्करून प्रत्येक पालकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य स्वीकारून आपल्या मुलांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. मोबाईलमुळे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ग्रंथालये ओस पडली आहेत, असे विचार पिंगुळी येथे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले.
पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ या उपक्रमाच्या पहिल्या पुष्पाचा शुभारंभ भव्य ग्रंथ दिंडी व पालक व मुलांसाठी आयोजित केलेल्या परिसंवादातून करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ हा अभिनव उपक्रम एप्रिल 2025 ते 31मार्च 2026 या कालावधीत विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ सोमवाती भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीने झाला. या दिंडीचा शुभारंभ सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रंथ दिंडी मिरवणूक शुभारंभ ढोल ताशांच्या गजरात व वाजत गाजत लेझीम पथकाने ग्रामपंचायत पिंगुळी ते प. पू. सदगुरू संत राऊळ महाराज मठापर्यंत काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीत जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, तहसीलदार वीरसिंग वसावे, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, दशरथ राऊळ, संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, ज्येष्ठ साहित्यिक भरत गावडे, सौ. जयश्री चिलवंत, विकास कुडाळकर, वर्षा कुडाळकर, सागर रणसिंग, मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, आर्या बांदेकर, शशांक पिंगुळकर, केशव पिंगुळकर, सौ. ममता राऊळ, सौ. अश्विनी गंगावणे, सौ. अंकिता जाधव, नूतन गावडे, ग्रामसेवक राजेश निवतकर, राजन पांचाळ, प्रसाद दळवी, आप्पा सावंत, गोविंद चव्हाण, सदाशिव गावडे, अश्विनी सावंत, स्वरा काळसेकर, ईशा सातार्डेकर, विनायक केरकर, सतीश माडये, वैभव धुरी, बाबली पिंगुळकर, सुभाष सावंत, श्रीमती योगिता, श्रीमती राणे, प्रिया पांचाळ, साधना माडये, रामदास सावंत, अरुण सावंत, मेघना सावंत, प्रिया आमडोसकर, नितीन पिंगुळकर, सागर वालावलकर, संदेश गावडे, बाळकृष्ण सडवेलकर, प्रवीण राऊळ, वैशाली राऊळ, मंडळ अधिकारी श्री. गुरव, साधना माडये, संपदा धुरी, माधवी मसके, मोहन पिंगुळकर तसेच परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, प. पू .विनायक अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, गावातील ग्रामस्थ, पालक वर्ग, गावातील सर्व ग्रंथाचे अध्यक्ष, प्रतिनिधी, महिला बचत गट यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान शालेय मुले व पालक यांच्यासाठी ‘मोबाईल, आजची मुले व पुस्तक’, ‘मुलांचे हरवलेले बालपण’ याविषयी मार्गदर्शन परिसंवाद झाला. यात ‘मोबाईलमुळे बालपणाची निखळता आणि निरागसता हरवली आहे का?’ या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी मार्गदर्शन केले. तर ‘पालकांचे पालकत्व गेले कुठे?’ या विषयावर प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांनी ‘मोबाईलमुळे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होतोय का?’ या विषययावर तर ज्येष्ठ मराठी भाषा तज्ज्ञ भरत गावडे यांनी
‘मोबाईलमुळे बाल गुन्हेगारी वाढून बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय का ?’ यावर भाष्य केले.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे होत्या.
दरम्यान परिसंवादात जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत म्हणाले की, आज मोबाईलमुळे मुले तासनतास मोबाईलवरचं खेळ खेळतात. त्यामुळे क्रीडांगणे ओस पडली आहेत. मुलांची शारीरिक क्षमता कमजोर झाली आहे. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना मैदानावर खेळण्यासाठी प्रवृत्त करावे. जेणेकरून त्यांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण होईल.
प्रा. रुपेश पाटील म्हणाले, आज पालकांनी सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी शिवबा घडविले. कारण त्यांनी बालवयातच शिवबांवर विविध महापुरुषांचे संस्कार बिंबवले. पण आजची आधुनिक मम्मी स्वतः मोबाईलच्या आहारी जाताना दिसत आहे. परिणामी आम्ही मुलांना काय देत आहोत?, याचे चिंतन करण्याची गरज आहे. मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी स्वतःचा वेळ देणे आणि आपापसातील सुसंवाद घडवून आणणे गरजेचे आहे, असेही प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी म्हणाल्या, आज विद्यार्थी दशेतील अमूल्य जीवन हे मोबाईलमुळे वाया जाताना दिसते. ग्रंथालयातील पुस्तकं वाचून ज्ञान संपन्न होणे गरजेचे असताना विद्यार्थी मात्र मोबाईलच्या नादी लागून आपल्या वाचन संस्कृतीचा ऱ्हास करताना दिसत आहेत, हे अत्यंत चिंताजनक आहे. भरत गावडे म्हणाले की, बाल वयातचं मुलांच्या हाती मोबाईल दिल्यामुळे अनेक प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि विकार बालकांमध्ये वाढताना दिसत आहेत. अशा वेळी आमच्या मुलांचे करियर वाया जाण्याची भीती वाटते.
परिसंवादाच्या अध्यक्षा डॉ. स्मिता सुरवसे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मनोगतातून मोबाईलमुळे आपला अमूल्य वेळ कसा वाया जातो आहे?, हे विशद केले. तसेच त्यांनी मोबाईलमुळे आपले शरीर आणि मनाचे किती प्रकारचे विकार निर्माण होऊ शकतात?, हे सांगून विद्यार्थी व पालकांना उपयुक्त टिप्स दिल्या.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन सौ. जयश्री चिलवंत यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वरा केळूसकर यांनी केले शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.