*प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण तक्रार निवारण कक्ष स्थापन करा*…
सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांची मागणी.
सरकारी असो वा खाजगी प्रत्येक रुग्णाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. सरकारी आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजलेले असताना आपला जीव वाचवण्यासाठी आर्थिक ताकद नसतानाही अनेकदा रुग्ण खाजगी सेवेकडे वळतात. एखादा गंभीर रुग्ण असेल तर भांबावलेले रूग्ण अशावेळी नेमके काय करायला पाहिजे हे सुचत नाही. एखादा रुग्ण दगावला तर त्याची शहानिशा न करता नातेवाईक संबंधित डॉक्टरवर वा त्या हाॅस्पिटलवर हल्ला करतात म्हणून शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला. असे प्रकार वाढत राहिल्याने आता तर सरकारी हाॅस्पिटलमध्येही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले.
शारिरीक आरोग्यबरोबर सेवा देणारे कर्मचारी आणि रूग्ण व नातेवाईक यांचे सुध्दा मानसिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे. या दोन्ही घटकामध्ये जर सुसंवाद नसेल तर असे प्रकार घडतच राहाणार.
दोन दिवसांपूर्वी पुण्यात प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये जो प्रकार घडला त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी असो वा खाजगी आरोग्यसेवे बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मुळात आधी उपचार की आधी अनामत भरणे याबाबत कायदेशीर तरतूद नाही. मात्र सामाजिक हेतूने विचार करता रूग्ण गंभीर असेल तर तातडीने उपचार सुरू केले पाहिजेत. खाजगी रुग्णालयानां शासनाने निर्धारित केलेले दरपत्रक ठळकपणे लावणे बंधनकारक केलेले आहे. पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होते का ❓ प्रसारित केलेल्या दरानुसारच शुल्क आकारले जाते का ❓याची फेरतपासणी करणारी कोणत्याही प्रकारची यंञणा नाही.
माझ्या माहितीनुसार मा. सर्वोच्च न्यायालयाने सुचविल्या नुसार केद्र सरकारने क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्टसाठी हालचाली केल्या पण तो अजून मंजूर झालेला नाही. तो तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी झाल्यास काही प्रमाणात रुग्णाना दिलासा मिळू शकतो.
मोठ्या शहरात काही सामाजिक संस्थानी अशावेळी रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन सुरू केलेल्या आहेत. जिल्हा स्तरावर अशी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच रुग्णांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी रुग्ण तक्रार निवारण केंद्राची स्थापना होणे गरजेचे आहे. मात्र तक्रार करण्यासाठी व्यासपीठ मिळाले म्हणून रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी दुरूपयोग न करता अशा माध्यमातून सेवा देणारे व सेवा घेणारे या दोन्ही घटकांनी समन्वयाने काम केले पाहिजे.