कणकवली तालुका पत्रकार संघाचा १३ एप्रिल रोजी पुरस्कार वितरण सोहळा
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण
कणकवली :
कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण आणि कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा रविवारी १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत येथील भगवती मंगल कार्यालय येथे साजरा केला जाणार आहे. कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे घोषित करण्यात आलेल्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योजक पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. गुरूवारी झालेल्या तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सा.बां. विभाग कणकवलीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत हे उपस्थित राहणार आहेत.
कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त राजन कदम, शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त मिलिंद पारकर, अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त अस्मिता गिडाळे, पत्रकार सन्मान पुरस्कार प्राप्त संजय पेटकर, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त तानाजी रासम तसेच यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त कळसुली (मुंबई) येथील उद्योजक हनुमंत सावंत यांना पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच याच कार्यक्रमात पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने सत्कार केला जाणार आहे. तर दुपार नंतरच्या सत्रात कणकवली तालुक्यातील पत्रकारांच्या कुटुंबियांचा स्नेहसंमेलन सोहळा विविध सांस्कृतिक आणि गुणदर्शन कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
या पुरस्कार वितरण व कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळ्याला कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे तसेच सर्व कार्यकारिणी व सदस्यांच्यावतीने करण्यात आले आहे.