फोंडाघाट स्थानकावरून वळविलेल्या अथवा बंद केलेल्या एसटी पूर्ववत सुरू कराव्यात अन्यथा प्रवासी संघटनेचा आंदोलनाचा इशारा !
फोंडाघाट
फोंडाघाट स्थानकावरून येऊन, पुढे जाणाऱ्या एसटी बसेस, वाहकाकडील मशीनमध्ये रूट इन्स्टॉल केला नसल्याने, काही गाड्या कणकवली वरून परस्पर तरळा मार्गे वैभववाडी वरून पुढे कोल्हापूरला जात आहेत. यामुळे फोंडा स्टॅन्ड वरील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातही फोंडाघाट मार्ग दाजीपूर रस्ता, दहा मार्चपासून बंद असल्याने, उरफाटा फटका प्रवाशांना बसत आहे.
ज्यावेळी बावडा – वैभववाडी घाट मार्ग रस्ता बंद होता, त्यावेळी सुमारे सहा महिने सर्व गाड्या फोंडा – घाट मार्गे जात होत्या.सदर घाट बंद होताच एका रात्रीत सर्व गाड्यांच्या वाहकाकडील मशीन मधील रूट बदलले गेले. मात्र फोंडा घाट रस्ता बंद होऊन आज सुमारे २२ दिवस लोटले, तरी वाहकांच्या मशीन मधील रूट का बदलत नाही ? याचा संताप प्रवाशामधून व्यक्त होत आहे. कदाचित तरळा मार्गे बावडा घाट रस्त्यावरील एसटी अधिकाऱ्यांचा यामध्ये हलगर्जी पणा नाही ना ? असा संशय निर्माण झाला आहे…
फोंडा घाट मार्गे स्थानकावरून येऊन, सुटणाऱ्या पणजी – सोलापूर, पणजी- तासगाव, गाड्या पूर्ववत कराव्यात आणि बांदा – कोल्हापूर,कुडाळ- पुणे, देवगड- सांगली या गेले कित्येक महिने बंद असलेल्या गाड्या त्वरित सुरू करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक, कणकवली आगार व्यवस्थापक या एसटी अधिकाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी फोंडाघाट प्रवासी संघटनेने केली आहे. आठ दिवसात वरील सर्व गाड्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.