You are currently viewing दैनंदिनी

दैनंदिनी

*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवलीचे प्रा. प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*दैनंदिनी*

 

‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ असे समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवले आहे. मग आपण किमान दैनंदिनी लिहायला काय हरकत आहे? आपण दिवसभर काय केले. याचा लेखाजोखा लिहिण्याची सवय म्हणजे दैनंदिनी. यालाच रोजनिशी असेही म्हणतात. शक्यतो दैनंदिनी ही रात्री झोपण्यापूर्वी लिहावी. दिवसभरात आपल्या हातून कोणत्या गोष्टी चांगल्या झाल्या किंवा कोणत्या गोष्टी चुकीच्या झाल्या याची उजळणी या निमित्ताने होते. आजच्या कामाचं नियोजन काय होतं आणि त्यातली किती कामे आपण केलीत याचा उहापोह यानिमित्ताने होतो. याशिवाय दैनंदिनी मध्ये आज आपण नवीन काय शिकलो याचीही नोंद ठेवली जाते. उद्या आपल्याला काय करायचे याचेही नियोजन करता येते. जर काही दिवसभरात आपल्या हातून चुकीचं घडलं असेल तर किमान आपण आपल्या स्वतःला सांगू शकतो की यापुढे मी अशी चूक करणार नाही. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे दैनंदिनी लिहिल्यामुळे आपण कधीही ती उघडून बघितल्यास आपण कधी काय काम केले हे आपल्याला निश्चित स्वरूपात आठवते. बऱ्याच वेळेला आपण केलेल्या चांगल्या गोष्टींचे आपल्याला समाधानही वाटते आणि घडलेल्या चुकीच्या गोष्टी पुन्हा घडणार नाही याची आपण काळजीही घेतो. दैनंदिनी लिहिल्यामुळे आपली रोजची कामे रोज वेळेत पूर्ण होतात. राहून गेलेल्या गोष्टी सुद्धा आपण वेळेत पूर्ण करतो. साहित्यात सुद्धा दैनंदिनी लेखन म्हणजे डायरी लेखन ही एक स्वतंत्र विधा आहे. पूर्वी ज्या अनेक लोकांना अशी दैनंदिनी लिहिण्याची सवय होती, आज त्यांनी लिहिलेली ती दैनंदिनी इतिहास लेखणाचे साधन म्हणून किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरत आहे. आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व जीवनाच्या यशस्वीतेसाठी दैनंदिनी लिहिणे फार महत्त्वाचे आहे. इतिहासात आपल्याला जी अनेक मोठी माणसे बघावयास मिळतात त्यातील अनेकांना दैनंदिनी लिखाणाची सवय असल्याचे दिसून येते किंवा आपण काल काय केले व आज काय करायचे यावर ते नियमितपणे आपल्या कुटुंबात किंवा सहकाऱ्यांसोबत चर्चा करताना दिसून येतात. थोडक्यात जीवनात यशस्वी होण्यासाठी दैनंदिनी लिखाणाच्या सवयीचे खूप मोठे व महत्त्वाचे स्थान आहेच.

रोजनिशी किंवा दैनंदिनी लिहिल्यामुळे जसे कधी काय केले हे लक्षात राहते तसेच याच सवयीमुळे कधी काय करायचे तेही कळते. काम करताना एखाद्याला दिलेली वेळ, घेतलेली वेळ या सर्व नोंदी दैनंदिनी मध्ये आपण ठेवत असतो. त्यामुळे कामे वेळच्या वेळी पूर्ण होतात. एकदा एका कामासाठी ठरवलेली वेळ ही आपण दुसऱ्या कामासाठी देत नाही हा दैनंदिनी लिहिण्याचा खूप मोठा फायदा आहे. म्हणजेच एका वेळी आपल्याला एकच काम करावे लागते. एकदम चार कामे समोर उभी राहत नाहीत. दैनंदिनी मुळे आपलाच वक्तशीरपणा वाढतो. त्याचा आपल्या सभोवतालच्या माणसांवर सुद्धा चांगला परिणाम होतो. वेळच्या वेळी काम करणारी व्यक्ती, दिलेली वेळ पाळणारी व्यक्ती म्हणून लोक आपल्याला ओळखायला लागतात.

आधुनिक कालखंडामध्ये मॅनेजमेंटचा अभ्यास करताना दैनंदिनी हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तो अभ्यासक्रमाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. माणसाची आळस, कंटाळा यापासून सुटका होते.

दैनंदिनी लिखाणाच्या सवयीमुळे जर आपल्यासमोर अनेक कामे एका वेळी करण्याची वेळ आली तर आपण त्या कामांचे दैनंदिनी वेळापत्रकानुसार नियोजन करून घेतो. मोठ्या पदावरचे सन्माननीय अधिकारी हे आपल्या कामाचे असेच नियोजन करून ठेवतात. बऱ्याच वेळेला त्यांनी या गोष्टींची नोंद करण्यासाठी स्वतंत्र सेक्रेटरीची नेमणूक केलेली असते. थोडक्यात दैनंदिनीच्या लिखाणामुळे आपलेच जीवन सुखकर होते.

धन्यवाद.

लेखक,

प्रा. श्री. प्रशांत पुंडलिक शिरुडे

के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली

9967817876

prashantshirude1674@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा