You are currently viewing ज्येष्ठ कथा लेखिका आणि अनुवादक वनिता सावंत…: मराठी साहित्यातील नंदादीप

ज्येष्ठ कथा लेखिका आणि अनुवादक वनिता सावंत…: मराठी साहित्यातील नंदादीप

ज्येष्ठ कथा लेखिका आणि अनुवादक वनिता सावंत (८१) यांचे काल रात्री निधन झाले. गेल्याच महिन्यात मालवण मध्ये आमच्या “आणखी एक मोहेंजोदारो” फिल्मचं स्क्रीनिंग होतं तेव्हा निघताना वनिता ताईंना भेटायचं ठरवलं होतं. निघताना खूप घाई झाली आणि ती भेट राहून गेली. आता ही भेट कायमचीच राहिली याची रुखरुख. नितीन वाळकेच्या पोस्टवरून त्या काल रात्री गेल्याचं कळलं. “मराठी साहित्यामध्ये नंदादीपाप्रमाणे मंदपणे तेवणारं व्यक्तिमत्व” नितीनने केलेला हा शब्दप्रयोग अगदी सार्थ आहे वनिताताईंच्या बाबतीत. अगदी सहजसुंदर भावानुवाद करणाऱ्या वनिताताई. विजयदान देथांच्या कथांचा त्यांनी केलेला अनुवाद “द्वंद्व” वाचून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. वनिता ताईंना भावपूर्ण आदरांजली 🙏 २०१३ मध्ये वनिता सावंत यांच्याशी माझी पहिली भेट झाली तेव्हा लिहिलेली पोस्ट 👇

मालवणात मुलांच्या नाट्यपरिचय शिबीराचा पहिला दिवस आटोपल्यावर मी नितीन वाळकेला सांगतो.. मला यांना भेटायचंय.. अनेक वर्षे झाली, मला त्यांना भेटायची इच्छा आहे… इतकी वर्षं झाली मला सावंतवाडीत राहून, पण त्या मालवणातल्या किंवा मालवणात राहतात हे मला माहिती नव्हतं, याची मलाच लाज वाटते. त्यातच नितीन पुढे सांगतो… अरे, ती आमच्या अगदी जवळच्या नात्यातली… मग तर मी अधिकच उत्सुक… मग शिबीर आटोपल्यानंतर – म्हणजे सहाव्या दिवशी नितीन त्यांना फोन करतो.. मला भेटायचंय म्हणून सांगतो.. खरं तर तीन-चार (किंवा चार-पाच) वर्षं झाली असतील त्यांच्याशी बोलल्याला… तेसुध्दा फोनवरुन… आणि आज मी प्रत्त्यक्ष भेटणार… खूप उत्सुकता होती या भेटीची… मग नितीन आपल्या मुलीला – सायलीला सांगतो, अगं, श्रीनिवासला तिच्याकडे घेऊन जा… स्कूटीने आम्ही पाच-सात मिनिटांच्या अंतरावर जातो. एका लाल चिरेबंद एक मजली घरासमोर सायली स्कूटी लावते.. इथेच जायचंय आपल्याला…

माझी उत्सुकता अजून वाढते… पहिली भेट… कधीही न पाहीलेला चेहरा… फक्त लिखाण वाचलेले… प्रचंड आवडलेले… आणि त्यानंतर भेटेल त्याला त्यांच्याबद्दल आवर्जून सांगत आलोय मी… त्यांच्या लेखनाबद्दल… अनुवादाच्या शैलीबद्दल… मूळ लेखनाबद्दल…

सायली घरात कोणाला तरी हाक मारत आत जाते.. आणि एक-दोन मिनिटांनी मी तिच्यासोबत आत जातो.. व्हरांडा, मधली खोली, मागली खोली पार करुन मागल्या अंगणात येतो… समोर चार पावलांवर आणखी एक छोटंसं घर… मंगलोरी कौलांचं… सायली दार वाजवते आणि त्या दार उघडतात… प्रौढ… बारीकशी देहयष्टी… वयाच्या मानाने आवाज बराच ऐकत राहण्याजोगा… बोलण्यात खूप छान लय… प्रचंड नम्रपणा… कोणताही आव नाही… अभिनिवेश नाही… परियच प्रपंच होतो आणि त्या सांगतात, नितीनचा फोन ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तुमचं नाव… येणारा अनोळखी कॉल – त्याचे नाव लिहून ठेवते मी… आणि त्यानंतर जवळजवळ तासभर आम्ही बोलत असतो… एकूणच त्यांच्या लेखनाबद्दल… त्यांच्या लेखनप्रवासाबद्दल… मग मध्येच थोडंसं माझ्याबद्दल… मग त्यांच्या नव्या लेखनाबद्दल… वनिता सावंत…

मी हे बोलतोय वनिता सावंतांबद्दल…

स्वतंत्र कथालेखन बरंच केलेल्या, पण प्रसिध्दीपातळीवर मोजकंच म्हणजे अवघी तीन पुस्तकं अनुवादित केलेल्या वनिता सावंत हे तसं अनुवाद क्षेत्रातलं उजवं नाव आहे… पण अनेकांना ते माहिती नाहीय… त्यामुळे खुद्द मालवणातही त्यांचं नाव कोणाला फारसं माहिती असण्याचा प्रश्नच नाही..

विजयदान देथांच्या ‘डायलेमा ऍण्ड अदर स्टोरीज्’ इंग्लिशमधून वाचल्यानंतर ‘द्वंद्व’ या नावाने त्या कथांचा अप्रतीम अनुवाद करणार्या वनिता सावंत… आणि त्या एकाच लेखनाने अनुवादिका म्हणून मनात घर करुन राहीलेल्या वनिता सावंत… इतका अस्सल आणि ओघवत्या शैलीतला अनुवाद फार कमी वेळा वाचायला मिळतो. पुरुष असूनही स्त्री मनाच्या संवेदना, त्यांच्या जाणिवा आणि त्यांचं – अगदी वेगवेगळ्या पातळ्यांवरलं विश्व अत्यंत तरलपणे आणि तेवढ्याच भेदक पध्दतीने मांडणारा लेखक म्हणून विजयदान देथा मला नेहमीच आवडत आले आहेत. या श्रेणीतलं दुसरं नाव म्हणजे राजन खान… या दोघांनी, माझ्या मते, स्त्री मनाचे आणि त्यांच्या भावविश्वाचे कंगोरे अलीकडल्या स्त्रीवादी लेखिकांपेक्षाही फार वेगळ्या आणि चांगल्या पध्दतीने मांडले आहेत. असो, हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. तर, मला मुळातच आवडलेल्या लेखकाच्या कथांचा तेवढाच अप्रतीम अनुवाद वाचनात आल्यानंतर तेव्हापासून वनिता सावंतांना भेटण्याची इच्छा होती.

फारशी आवराआवर नसलेलं आणि त्यामुळेच खर्या अर्थाने घरपण असलेलं घर, मध्यम आकाराच्या जुन्या डायनिंग टेबलवर कागद-पुस्तकं पसरलेली, एका बाजूला भिंतीलगत कपाट, खुर्ची, काही सामान उभारुन ठेवलेलं… एका कोपर्यात जुना टेबलफॅन… मंगलोरी कौलांमध्ये काचांच्या कौलांमधून त्या मध्यम आकाराच्या खोलीत पसरुन राहीलेला उजेड, दारातून घरात शिरु पहात असलेली उतरत्या सूर्याची किरणं… तो आसपास एवढा मस्त वाटत होता…

मोजकंच, पण खूप छान लिहूनही प्रसिध्दीपासून दूर राहू पाहणार्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे.. अशा माणसांशी बोलताना, वागताना मी खूप लहान असतो.. मला फक्त त्यांना कानात साठवून घ्यायचं असतं.. मनात भरुन ठेवायचं असतं.. आणि त्या तासाभरात मी ते करत होतो.. वनिता सावंतांनी खूप लिहायला हवं… खूप उत्तम अनुवाद करायला हवेत… स्वत:चंही खूप लिहायला हवं… आणि मुख्य म्हणजे ते लेखन ख्‌ूप खूप समोर यायला हवं… त्या गेली अनेक वर्षं कथा लिहीतायेत… अनेक मासिकं, दिवाळी अंक, अंतरकरांच्या नवलसारख्या अंकांतून प्रसिध्द होतायेत. तरीही वनिता सावंत हे नाव मोजक्या साहित्यिक व वाचक वर्गात माहिती आहेत. मलासुध्दा ते फार उशिरा समजलं… ते आणखीही सगळ्यांना समजायला हवं… वेळीच…

विजयदान देथांचं ‘द्वंद्व’, उदयप्रकाशांचं ‘मोहनदास’ आणि मृदुला गर्गांचं ‘कठगुलाब’ हे त्यांनी केलेले अनुवाद… सध्याही त्यांचं एका हिंदी कथासंग्रहाच्या अनुवादाचं काम सुरु आहे. बरेच महिने सुरु आहे.. या अनुवादाची आता प्रतिक्षा आहेच. आणि आता प्रतिक्षा असेल त्यांच्या कथांची… त्यांच्या कोणत्याही नव्या लेखनाची… तासाभरापुरती त्यांच्याशी झालेली ही भेट, त्यांच्याशी झालेल्या गप्पा आणि त्यांचा अंगीभूत नम्रपणा माझ्या मनात रुजला गेलाय आता… फार कमी जणांच्या बाबतीत होतं असं माझ्या बाबतीत… जे ग्रेसांच्या भेटीनंतर झालं… जे राजन खानांच्या भेटीनंतर झालं… काही माणसं काही क्षणांपुरती औपचारीक किंवा अनौपचारीकरित्या आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्य समृध्द करुन जातात… वनिता सावंत माझ्यासाठी हे असं आयुष्य समृध्द करणारं नाव आहे…

 

– श्रीनिवास नार्वेकर ©

प्रतिक्रिया व्यक्त करा