आचरा :
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचे मानकरी, देवसेवक, महालदार, निशाण, बावट्या, ढोल-ताशा, मृदुंग आदी सरंजामासह रविवारी दुपारी कानविंदे यांच्या वाड्यातून पट्टाभिषिक्त श्री रघुपतीची मुर्ती मोठ्या उत्साहात इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात आणण्यात आली. ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशी ललकारी आसमंतात दुमदुमली. संस्थानी थाटात साजरा होणाऱ्या रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला रविवार पासून मोठ्या दिमाखात सुरूवात झाली. रामनवमी उत्सवासाठी रामेश्वर मंदिर व आजुबाजूचा परिसर तसेच आजूबाजुला असणारी मंदिरे विद्युत रोषणाईने सजविला असून रामेश्वर मंदिरासमोर रविवारी सकाळी शाही गुढी उभारण्यात आली. त्यानंतर दुपारी रामेश्वर मंदिरात रघुपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर समस्त रयतेसाठी हेमंत वाखणकरजोशीनिलेश सरजोशी यांनी नूतन पंचांगाचे वाचन केले. दुपारी रघुपतीची आरती झाल्यावर भक्तगणांसाठी प्रसाद वितरीत करण्यात आला. हरीहरांचा आगळा वेगळा संगम असलेल्या आणि प्रत्यक्ष भोळ्या सांब सदाशिवाने त्याच्या आराध्य दैवाचा मोठ्या कौतुकाने केलेला सुख सोहळा म्हणून इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या संस्थानी थाटात साजरा होणारा उत्सव म्हणून रामनवमी उत्सवाकडे पाहिले जाते. सायंकाळी शाही थाटात ‘श्री’ च्या पाषाणाला न्हावन, त्यानंतर पुराण वाचन, नंतर श्री च्या दरबारात हजेरी लावणारे कलाकरांची गायन सेवा, तसेच तसेच रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह पारंपारीक थाटात श्री विष्णूची मूर्ती शृंगारलेली पालखीत विराजमान होऊन पालखी श्री रामेश्वर मंदिरा भोवती सोमसूञी प्रदक्षिणा करते. त्यानंतर सभामंडपात या वर्षी ह.भ.प.गंगाधर व्यास बुवा (डोंबिवली) हे असणार असून, त्यांना पेटीसाथ आनंद लिंगायत (बुरंबाड- संगमेश्वर) तर तबलासाथ अभिषेक भालेकर यांची लाभणार आहे. असा दिनक्रम रोज ललिता पंचमी पर्यंत चालणार आहे. या उत्सवात आपली कला सादर करण्यासाठी कराड ,सागली, सातारा, फलटन, कोल्हापुर, पुणे आदी भागातून बँडपथक दाखल होणार आहे.
सोमवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११.०० वा. जेष्ठ नागरिक सेवा संघ, आचरा (स्वरयात्रा), सायं. ६.०० वा. श्री.रवी पाटील सुरसंगम (मालवण) श्री.संजय वराडकर आणि सहकारी, मंगळवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा. गायिका सौ.विनया परब (रत्नागिरी) सायं.६.०० वा. गायिका सौ. विनया परब (रत्नागिरी) यांचे गायन, बुधवार दि. २ एप्रिल सायं.६.०० वा. गायक- कु. सुधांशू सोमण (मिठबांव), गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा. गायक श्री. दिलीप ठाकूर (मालवण) सायं ६.०० वा. गायक श्री. केशव गाडेकर (पुणे) यांचे गायन.शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी स. ११वा. गायक श्री. विनय वझे आणि सहकारी आचरा. सायं.६ वा. गायक- श्री. विशारद गुरव (रत्नागिरी) यांचे गायन.शनिवार दि ५ एप्रिल रोजी स. ११ वा. गायक- श्री. विशारद गुरव (रत्नागिरी) यांचे गायन., सायं ६ वा. गायक श्री. समीर अभ्यंकर (ठाणे- मुंबई)संवादिनी- श्री. प्रसाद शेवडे, तबला साथ- श्री. रामकृष्णा करंबेळकर यांचे गायन, रविवार दि. ०६ एप्रिल रोजी रामनवमी दिवशी रामजन्माचे कीर्तन – श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) (रा.सांगली) सायंकाळी ६ वा. गायक श्री. समीर अभ्यकर (ठाणे-मुंबई) संवादिनी- श्री. प्रसाद शेवडे,तबला साथ- श्री. रामकृष्ण करंबेळकर. यांचे गायन होणार आहे, सोमवार दि. ०७ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा. गायिका कु. स्वरांगी गोगटे (आचरा)सायं. ०६.०० वा. गायिका कु.संपदा दुखंडे (आचरा), शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव. शनिवार दि. १२ एप्रिल रोजी पहाटे पालखी नंतर श्री हनुमान जन्म. त्यानंतर हनुमान जन्माचे कीर्तन श्री.मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) (सांगली). तरी या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष प्रदीप प्रभूमिराशी व सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे.