डी. जी. बांदेकर ट्रस्टच्या वार्षिक ‘कसब’ २०२५’ कला प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद.!
तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन.!
सावंतवाडी :
डी. जी. बांदेकर ट्रस्टच्या वतीने आयोजित फाउंडेशन कोर्स इन आर्ट चे ‘कसब’ या वार्षिक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन आज सावंतवाडी येथे आर पी डी हायस्कूल मधे मोठ्या उत्साहात पार पडले. या २१ विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात आपली उत्कृष्ट कला सादर केली. ट्रस्टच्या या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, यंदाही प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटनसावंतवाडीचे तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रमेश भाट (चेअरमन, एफएचईसीए, बांदा), तसेच बांदेकर कॉलेजचे प्राचार्य श्री. उदय वेले उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी श्रीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे विशेष कौतुक केले. तसेच, करिअर निवडताना आणि त्यात पुढे जाताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आणि कामाची प्रशंसा करीत आपणाकडूनही अशा कामाच्या संधी विद्यार्थ्याना उपलब्ध करून देण्यात येतील याची खात्री दिली. प्राचार्य उदय वेले यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गौरव करत भविष्यातील संधी आणि योग्य दिशेने होत असलेल्या या क्षेत्रातील मुलांच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर डी. जी. बांदेकर ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद बांदेकर, सचिव अनुराधा बांदेकर, खजिनदार गीता बांदेकर, कोर्स प्रमुख तुकाराम मोरजकर आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी केले. तर बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला. शेवटी प्रा. प्राजक्ता वेंगुर्लेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रदर्शनात विविध कलाकृती सादर करण्यात आल्या असून, कलाक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरली आहे. प्रदर्शनाला कला प्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सदर प्रदर्शन आज दिनांक ३० मार्च २०२५ पर्यंत सकाळी १० ते रात्रो ८ पर्यंत रसिकांसाठी खुले आहे.