*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*
*शोभायात्रा…कशी असावी..?*
चैत्र शुद्ध प्रतिपदा…म्हणजेच मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा गुढीपाडवा…!
चैत्र महिन्याच्या प्रारंभी शिशिरात पानगळ झालेल्या वृक्षांना नवे अंकुर फुटतात…हळूच सृष्टीला डोकावून पाहणारी तांबूस, गुलाबी, पोपटी कोवळी पालवी सूर्याच्या सोनसळी किरणांमध्ये न्हाऊन घेतात…लाल सफेद चाफा मान उचवून डौलाने फुलून येतो… चांदणं सांडाव तसा भूवरी सांडतो…पसारा करतो…आग ओकत उन्हाच्या उष्ण झळा अंगावर झेलत प्रसन्नचित्ताने रानोमाळ फुललेला पळस अन्…लाल पिवळा गुलमोहर जणू नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नटून थटून सजून उभे असतात…
*वसंत येतो*
*लेवुनी बहर फुलांचा*
*सण मांगल्याचा*
*गुढीपाडवा*
वसंताच्या आगमनाबरोबरच मराठी नवं वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते…आणि मांगल्याचं, आनंद, उत्साहाचं प्रतीक असलेली गुढी प्रत्येक हिंदूच्या दारात उभी केली जाते. दारी पाटाच्या भोवती रांगोळी काढून बांबूच्या काठीला आंबा, कडुनिंबाची पाने, रेशमी वस्त्र, सजवलेला कलश, चाफ्याच्या फुलांची माळा आदीं बांधून गुढी उभारून, पारंपारिक वेशभूषा, गोडधोड जेवण करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
*ब्रम्हध्वज चैतन्याचा*
*चला उभारू घरोघरी*
*तोरण दारी*
*मांगल्याचे..!*
आजकाल मोठमोठ्या शहरांमध्ये एक नवा ट्रेण्ड आला आहे तो म्हणजे शोभायात्रा…! आपण वेगवेगळ्या समाजामध्ये एखाद्या विशिष्ठ दिवशी मिरवणुका निघालेल्या पाहतो. एखाद्या खास दिवसाची, सणाची महती, आपली संस्कृती, संस्कार सर्वांना ज्ञात व्हावे या हेतूने काढलेली मिरवणूक म्हणजेच शोभायात्रा..! परंतु तरुणाईचा विशेष भरणा असलेल्या शोभायात्रा पाहिल्या की गुढीपाडव्याची म्हणा किंवा इतर कुठल्याही खास दिवसासाठी काढलेली शोभायात्रा ही संस्कृती, वैशिष्ट्यांची शोभा न होता उत्साह आणि धांगडधिंगाडाच जास्त असतो. वेशभूषा जरूर गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास केलेली असेल परंतु पारंपारिक वाद्ये, सनई चौघडा आदींचा अभाव अन् कर्णकर्कश डिजेचा समावेश कित्येकदा शोभायात्रेचीच शोभा घालवतात.
शोभायात्रा म्हटली की मूळ गाभा येतो तो म्हणजे आपली संस्कृती…आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करताना आपल्या वावरातील आपल्यावर झालेले संस्कार…! कारण त्यातूनच आपण जपतो ती पारंपरिक वेशभूषा, धार्मिक, सामाजिक मूल्ये…! शोभायात्रेच्या माध्यमातून जतन केले जातात ते धार्मिक, सामाजिक संदेश देणारे देखावे, महाराष्ट्र संस्कृती दर्शन, दहशतवाद, राष्ट्रभक्ती चित्ररथ आदी. ढोलताशांचा आवाज असतोच परंतु तो सुद्धा दणकेबाज दणदणाट… अंगात चैतन्य निर्माण करणारा…लेझिम, झांज पथक…विविधांगी वेशभूषेतील नृत्ये सादरीकरण… इत्यादी मधून मनाला आनंद मिळतो. अंगावरील पारंपरिक पेहराव, डोक्यावरील भगवे फेटे…भारताच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देतात…सदरा पायजमा भाळी अबीर अन् डोक्यावर गांधी टोपी…हाती टाळ वारकरी सांप्रदायाची आठवण करून देतात…नऊवारी साडी, डोईवर पदर अन् भाळावर कुंकवाचा टिळा लावलेल्या स्त्रिया आदी वेशभूषा मधून हिंदू संस्कृतीची जोपासना करतात.
अलीकडे राजकीय स्वार्थासाठी होणारा शोभायात्रेचा वापर ही एक चिंतेची बाब आहे. एखाद्या समाजाला समूहाला खुश करण्यासाठी अशाप्रकारचे आयोजन केले जाते, त्याला धार्मिक रंग दिला जातो ज्याने राजकीय फायदा होतो परंतु समाजाचे नुकसान होते, एकीला फाटे फुटतात. अशा प्रकारच्या राजकीय स्वार्थाला शोभायात्रा दरम्यान थारा देऊ नये. तर आपली शतकांची परंपरा असलेली मराठी संस्कृती शोभायात्रेतून दिमाखात मिरवली पाहिजे. शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन तरुणाईने आपली नाळ परंपरा आणि संस्कृतीशी घट्ट रोवली पाहिजे…तरच आपण म्हणू शकतो …
*”महाराष्ट्र धर्माची सर्वोच्च गुढी उभारुया”*
मनमनावर तरुणांच्या मराठी संस्कृती बिंबवून ज्ञानशास्त्राने आपली प्रकृती देखील जपली पाहिजे…
*मनावर बिंबवुया*
*प्राचीन मराठी संस्कृती…*
*जपुया प्रकृती*
*ज्ञानशास्त्राने…!*
© दीपी [दीपक पटेकर]
सावंतवाडी
८४४६७४३१९६