*के.रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा. प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*
*महाकुंभ अनुभवताना*
144 वर्षांनी झालेला महाकुंभ हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरला. यावर्षी या कुंभाचे सर्व व्यवस्थापन उत्तर प्रदेश सरकारकडे होते. दिनांक 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या 45 दिवसांच्या कालखंडामध्ये साधारणतः 60 कोटीहून अधिक नागरिक यात सहभागी झाले होते. खरं तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या महाकुंभा वरून अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. 144 वर्षांनी महा कुंभ होतो. 144 वर्ष कसे हा सुद्धा एक प्रश्नच आहे? परंपरा असं सांगते की असे अकरा कुंभ झाल्यावर महाकुंभाचे आयोजन होते. कुंभाचे आयोजन हे बारा वर्षांनी केले जाते. असे अकरा कुंभ झाले म्हणजे बाराव्या वेळेस 144 वर्षे पूर्ण होतात.
महाकुंभ चे आयोजन पृथ्वीवर चार ठिकाणी होते ही चार ठिकाणी कशी ठरली? तर संदर्भात पौराणिक कथा आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये समुद्रमंथनातून अमृत कलश निघाल्यानंतर तो दानवांच्या हाती लागू नये म्हणून इंद्राचा मुलगा जयंत कलश घेऊन निघाला त्यासाठी त्याला ब्रहस्पती व शनी यांनी मदत केली. पळताना त्यातील चार थेंब पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. त्यातील पहिले ठिकाण म्हणजे गंगा यमुना सरस्वती या नद्यांचा संगम ज्या ठिकाणी झाला ते तीर्थराज प्रयाग, दुसरे गंगा नदीवरील हरिद्वार, तिसरे क्षिप्रा नदीवरील उज्जैन, चौथे गोदावरी नदीवरील नासिक त्रंबकेश्वर.
थोडक्यात कुंभमेळा म्हणजे ठराविक काळात पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळाच. अर्थात सर्वात मोठा पवित्र धार्मिक मेळा.
खगोलशास्त्रानुसार सूर्य व गुरु ग्रहांच्या विशिष्ट स्थितीवरून महाकुंभाचे आयोजन होते. गुरु ग्रह जेव्हा कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशि मध्ये असतो तेव्हा कुंभाचे आयोजन होते.
महाकुंभ ला का जायचे असते? ग्रहताऱ्यांच्या काही विशिष्ट स्थितीत त्रिवेणी संगमावर स्नान केले तर येणारी अनुभूती ही विलक्षण असते. अर्थात ही अनुभूती ज्याची त्याची स्वतंत्र असते. पण परंपरा असे मानते की आपली पापे नष्ट होतात, दुःखाचा नाश होतो, पुण्यप्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते, असं परंपरा मानते. विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्री नदीवर स्नान करणे व सूर्याला अर्ध्य देणे नदीची पूजा, आधी आखाड्यातील किंवा साधूंचे स्नान झाल्यानंतर इतर नागरिक स्नान करतात. त्यानंतर शोभायात्रा निघते.
इथे चिकित्सात्मक प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की पाप नष्ट करण्यासाठी कुंभाला जाणे म्हणजे आपण पाप केली आहेत हे कबूल करण्यासारखेच आहे. मुळात पाप करायचेच कशाला? हा सुद्धा एक प्रश्न मनात आल्या वाचून राहत नाही.
जगातील 80% पेक्षा जास्त देशातील नागरिक, विविध धर्मांचे व पंथाचे लोक या महा कुंभामध्ये येऊन गेलेत. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी एकत्र येणे ही सुद्धा एक मोठी फलश्रुती आहे. हा संपूर्ण कालखंड केवळ दीड महिन्याचाच आहे म्हणजे 45 दिवसांचा आहे. हा सुद्धा एक अद्भुत चमत्कार आहे असं म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही. आलेली सर्वच माणसे ही स्वतःहून आलेली असतात. त्यांना कोणतेही निमंत्रण दिलेले नसते. जातांना ते समाधान घेऊन जातात. जात, धर्म, पंथ, भोजन व भजन यात विविधता असूनही असा कोणताही भेदभाव त्या ठिकाणी दिसून येत नाही. देशाच्या विविध भागातून विविध भाषा बोलणारे, देशी, विदेशी विविध वस्त्र प्रावरणे वापरणारे, विविध भाषा बोलणारे, प्रत्येकाची शैली वेगळी, प्रचंड विविधता त्यात भरलेली दिसते. प्रत्येकाच्या प्रथा आणि परंपरा या वेगवेगळ्या असतात. ही सर्व माणसे आपल्या घरचं कार्य आहे असे समजून त्या ठिकाणी एकत्र येतात. हा एक समरसतेचाच भाग असल्यासारखे वाटते. यात कुठेही यज्ञ-याग, पूजा-पाठ, मंत्र-तंत्र या गोष्टी दिसून येत नाहीत किंवा यांचे प्राबल्य नसते. यातील मोठ्या प्रमाणात नागरिक श्रद्धेय भावनेपोटी येतात तर अनेक अभ्यासक विचारवंत संशोधक महाकुंभ हे नेमकं काय हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ही आलेली असतात. म्हणूनच युनेस्कोने सुद्धा याला जागतिक सांस्कृतिक वारसा संबोधले आहे. कोट्यावधी माणसे मैलोन मैल चालत येतात कोणालाही थकवा येत नाही किंवा त्याचा त्रास वाटत नाही. येणाऱ्या लोकांमध्ये अनेक डॉक्टर, वैज्ञानिक, राजकीय नेते, उद्योगपती, करोडपती, अब्जोपती, यासह सर्वसामान्य दिन-दुबळा, गरीब, मोलमजुरी करणारे, शेतमजूर, कामगार, यासोबत आखाड्यातील साधू-संत, प्रवचनकार, कीर्तनकार सुद्धा येतात. येथे आखाड्याचे साधू सदस्य असतात. आखाड्यांचेही अनेक प्रकार आहेत. सर्व माणसे एकमेकांविषयी कोणत्याही प्रकारे उच्च-नीच किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद मानत नाहीत. कुंभच्या संपूर्ण कालखंडात लाखो लोक त्या ठिकाणी अनेकाविध उद्देशाने तिथेच राहतात. त्या सर्वांना परंपरेनुसार कल्पवासी म्हटले जाते. ही संख्या दहा लाखाच्या जवळपास असल्याकारणाने त्याला एखाद्या महानगराचे रूप प्राप्त होते. महानगराप्रमाणेच त्याची रचना केली जाते व व्यवस्थापन सुद्धा केले जाते. येणाऱ्या सर्वांना शिधा दिला जातो. सुख सुविधा उपलब्ध करून देताना सुद्धा कोणत्याही प्रकारे जात, धर्म, पंथ याचा विचार केला जात नाही. या सर्वांच्या राहण्या, खाण्याची, स्वच्छतागृहांची सोय हे सुद्धा एक मोठे आव्हान असते.
या महाकुंभाने नेमके काय साध्य होते? आपल्या धर्मात काळाच्या ओघात परिस्थितीनुसार आलेल्या अनेक उणिवा, त्रुटी, दोष या संदर्भात या ठिकाणी चर्चासत्र होतात. हिंदू धर्म हा प्रवाही आहे. अगदी नदीच्या प्रवाहासारखा म्हणजेच तो एक जिवंत धर्म आहे. असं म्हणण्याचं कारण असं की काळाच्या ओघात धर्मातील चुकीच्या वाटणाऱ्या प्रथा परंपरांना तिलांजली देण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा होते. बदलत्या काळानुसार आपल्या धर्मात कोणते बदल केले पाहिजे यावर चर्चासत्र होतात. विशेष म्हणजे यावेळी सर्व संतांनी एक मुखाने समरसतेचा अंगीकार केला. सर्व प्रकारच्या भेदभावांना तिलांजली देण्याचे वचन दिले. आता या संत वचनाची पूर्तता करण्याची जबाबदारी तुम्हां आम्हां सर्व नागरिकांना पार पाडावयाची आहे. गंगा यमुनेच्या पवित्र जलाच्या अभिषेकाने पवित्र झालेला हा विचार आपण उचलून धरायला हवा आपण सर्व भारत मातेचे सुपुत्र असून बंधुभावाने राहिले पाहिजे ही भावना वाढविणे आपले आद्य कर्तव्य आहे.
आलेल्या सर्व नागरिकांना महा कुंभाचे दोन्ही वेळचे जेवण चहा नाश्ता जगन्नाथाकडून दिला जातो. तेथे असलेले अनेक आखाड्यांचे सदस्य या सर्वांना आग्रहाने जेवण देतात.
महाकुंभाचे मला जाणवणारे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या नागरिकांपैकी मोठ्या प्रमाणात नागरिक महाकुंभात आपला स्वतःचा खर्च स्वतः करतात या सर्व लोकांचा प्रवास, रहाणे, खाने या सुविधातून जी आर्थिक उलाढाल होते ती देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी ठरते. प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेल्या विदेशी नागरिकांमुळे सुद्धा देशाच्या गंगाजळीत मोठी वाढ होण्यास मदत होते. लाखो लोकांच्या हाताला काम मिळते. स्थानिक लघु व कुटीर उद्योगांची भरभराट होते.
देशाच्या ग्रामीण किंवा शहरी भागात लहानशा यात्रेने तेथील पंचक्रोशीत चैतन्याची, आनंदाची उधळण होते. तेथील अर्थव्यवस्था गतिमान होते. तेव्हा या जगरूपी खेड्यात सुमारे 60 कोटी लोकांपेक्षा जास्त लोक ज्या महाकुंभात सहभागी होतात ती किती परिवर्तन करणारी असेल याची आपण कल्पना करू शकतो. या कुंभमेळ्यात किती अब्जांची उलाढाल झाली हे निश्चित सांगणे फार जोखमीच होईल. जगभरात विविध धर्मांमध्ये होणारे मोठे धार्मिक उत्सव हे तेथील आर्थिक उलाढालीचे कारण ठरते. थोडक्यात या ठिकाणी अध्यात्मिक शक्ती सोबतच आर्थिक शक्ती वाढते हे ही आपण विसरता कामा नये.
असो तरीही भारतासारख्या लोकशाही प्राधान्य असलेल्या देशात महाकुंभ सारख्या उपक्रमांचा स्वीकार करणे न करणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे यात शंका नाही.
धन्यवाद.
लेखक.
श्री प्रशांत पुंडलिक शिरुडे
के.रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली
9967817876
prashantshirude1674@gmail.com