मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ ग्रंथांमध्ये बंदिस्त नाहीत, तर ते जनमानसाच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या शब्दांत क्रांती होती, त्यांच्या कृतीत परिवर्तन होते, आणि त्यांच्या अस्तित्वाने संपूर्ण देश नव्या उजेडाने उजळून निघाला. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला नमन करत, लोकशाहीर नंदेश उमप आपल्या सर्जनशीलतेच्या नवनवीन वाटांनी बाबासाहेबांना अभिवादन करित आहेत—एका जोशपूर्ण पंजाबी गीताच्या आणि एक भावस्पर्शी सुफी कव्वालीच्या माध्यमातून!
*पहिलं पंजाबी गीत – क्रांतीचा नवा सूर!*
पंजाबी संगीत म्हणजे धडाडी, जोश, आणि जिगर! लोकशाहीर नंदेश उमप यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित पहिलेवहिले पंजाबी गीत साकारले आहे. ही रचना प्रसिद्ध गीतकार आइशा ढिल्लों यांनी लिहिली असून, विश्वास नाटेकर यांनी दिग्दर्शित आणि नृत्यदिग्दर्शित केले असून स्वतः नंदेश उमप यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतात बाबासाहेबांचा संघर्ष, आत्मसन्मान आणि लोकशाहीचा मंत्र धगधगत आहे. हे गाणं केवळ एक ध्वनीमुद्रण नाही, तर समानतेच्या रणसंग्रामातील नगारा आहे!
पंजाबच्या निर्भीड संगीतशैलीत बाबासाहेबांची क्रांती नव्या जोशाने धडकेल, त्यांच्या विचारांचे धगधगते सूर रसिकांच्या हृदयात ज्वाला पेटवतील. हे गीत म्हणजे शोषितांच्या हक्कांसाठीचा गजर—एक धगधगता मंत्र, जो अन्यायाच्या अंधाराला फाडून टाकणार आहे!
*सुफी कव्वाली – भक्तिरसात न्हाललेला परिवर्तनाचा जागर!*
दुसरी बाजू आहे सुफी कव्वाली—एक दिव्य, भावनांनी ओथंबलेला, अंतःकरणात उतरणारा सुरांचा प्रवाह! लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलेली ही कव्वाली, लोकशाहीर नंदेश उमप यांच्या आवाजातून प्रकट होत आहे.
सुफी संगीत म्हणजे परमसत्याचा शोध, आत्मज्ञानाचा प्रकाश, आणि भक्तिरसात न्हालेली अध्यात्मिक गूढता. बाबासाहेबांनीही आयुष्यभर सामाजिक मुक्तीसाठी लढा दिला. त्यांचा विचार म्हणजे एक अखंड प्रवास – आत्मज्ञानातून सत्याकडे, अंधश्रद्धेमधून विवेकाकडे, विषमतेतून समतेकडे!
ही कव्वाली म्हणजे समतेच्या मस्जिदीतील अजान, विचारांच्या गंगा-यमुना यांमध्ये मिसळलेला शुद्ध नाद! बाबासाहेबांचा लढा, त्यांचे समर्पण, त्यांचा त्याग, आणि त्यांच्या कार्याची भक्तिसूक्ती या कव्वालीतून रसिकांच्या हृदयात झंकारेल.
*संगीताचा महासंगम – क्रांती आणि भक्तिरसाचा सुरेल मिलाफ!*
लोकशाहीर नंदेश उमप यांच्या या अभूतपूर्व कलाकृती म्हणजे संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना दिलेली भावपूर्ण मानवंदना! जोश आणि धगधगत्या जिगरीने भारलेले पंजाबी गीत! शांती, समर्पण आणि परिवर्तनाचा दिव्य मंत्र असलेली सुफी कव्वाली!
ही दोन्ही गाणी आता पूर्णतः साकार झाली असून, त्यांचे ध्वनिचित्रमुद्रण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. २९ मार्च २०२५ रोजी या गीतांचे भव्य लोकार्पण “नंदेश उमप युट्युब वाहिनीवर” होणार असून, रसिकांसाठी हा एक संस्मरणीय क्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे, स्पॉटीफाय सारख्या लोकप्रिय संगीतवाहिन्यांवर या गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करणारं हे संगीतमय अभिवादन श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत आहे.
हे संगीत केवळ मनोरंजनासाठी नाही, तर एक प्रेरणा, एक लढा, एक जागर आहे! बाबासाहेबांचे विचार ग्रंथातून गाण्यांमध्ये उतरले आहेत, त्यांचे क्रांतीरूप सुरांच्या तालावर झंकारणार आहे, आणि त्यांच्या कार्याचा मंत्र रसिकांच्या अंतःकरणात स्फूर्ती निर्माण करणार आहे. लवकरच, स्वरांनी नटलेली क्रांती आणि भक्तिरसाचा उत्कट आविष्कार या दोन महामंत्रांचा अनुभव घ्या.