*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*माझ्या पुस्तकांशी माझे नाते*
पुस्तकं म्हणजे आयुष्याची समृद्धी…!
पुस्तकाचं आणि माझं नातं मला कळतंय तेव्हापासून निर्माण झालं. पुस्तकाशी मैत्री केली ती मी शाळेत असल्यापासून. मला गोष्टी प्रचंड
आवडायच्या..
शाळेत असताना आम्हाला गोष्टीची पुस्तके वाचावयास मिळायची.. कधी एकदा ती मी वाचते असे व्हायचे त्या पुस्तकातील गोष्टी वाचता येण्यासाठी मी लवकर लवकर अभ्यास करायची..
नंतर हळूहळू वाचत गेले आणि पुस्तकांशी माझी मैत्री झाली फक्त मैत्रीच झाली नाही तर चक्क माझ प्रेम जडलं. पुस्तकांचं आणि माझं हळुवार हळवं नातं एकमेकांत गुंफलं गेलं आहे ते आजतागायत…!
पुस्तक वाचताना पुस्तकाशी बोलताना जो आनंद होतो ना तो शब्दांच्या पलीकडला असतो. पुस्तकांनी ज्ञान दिलं, जगाची ओळख पुस्तकातून झाली.
आव्हानांना सामोरं जाताना, आपत्ती झेलताना मोठं कसं होत जायचं हे पुस्तकांनी शिकवलं. अन्यायाविरुद्ध स्वत:च्या कुवतीनुसार संघर्ष करण्याची निर्भय वृत्ती पुस्तकांनी दिली. सामाजिक जाणिवा व्यापक केल्या… पुस्तकांची सोबत अशी नेहमीच मार्गदर्शक ठरत गेली.. मित्र, मैत्रिणींसारखे पुस्तकंही मित्र बनून सोबत करायला लागले. पुस्तकांनी भरभरून आनंद दिला. शब्दांचे अर्थ विचारांना खाद्य देऊ लागले…!
माझ्या संग्रहातील ग्रंथांच्या सहवासात असलेली मी… मागे वळून पाहते तेव्हा आठवते की शाळेत असतानाच मला वाचनाची आवड निर्माण झाली होती.
ही आवड माझ्या जगण्याचाच एक अविभाज्य घटक बनून राहिली. मला वाटतं माझं संपूर्ण जीवनच पुस्तकांनी व्यापून टाकलं आहे. खरं तर माझं जीवनच एक पुस्तक झालं आहे त्याची काही पानं लिहिलेली तर काही कोरी आहेत काही पूर्वसंचिताने लिहिलेली तर काही माझ्या अनुभवाचे संचित मांडण्यासाठी.. जगण्यातील सुख-दुःखाचे अनेक धागे या पुस्तकामध्ये अडकलेली आहेत. ‘”मी आणि माझी पुस्तक’” जेव्हा याचा विचार करू लागले तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की पुस्तकानेच मला माझी ओळख निर्माण करून दिली..
खाऊसाठी मिळालेले पैसे साठवून मी पुस्तके घेत असे. चांदोबा मासिक, राजा-राणी-राजकन्याराक्षस-परी-देवदेवता-जादू-पशू-पक्षी यांच्या गोष्टी असलेली लहान लहान पुस्तके खरेदी केल्याचे मला आठवते. तो मला माझा मोठा खजिना वाटत असे सुट्टीत पुन्हा पुन्हा त्या पुस्तकांचे मी वाचन करीत असे… वाढत्या वयानुसार वाचनाचे विषय बदलू लागले. सामाजिक-
ऐतिहासिक आशयाशी संबंधित पुस्तकांची आवड निर्माण झाली. नव्या को-या पुस्तकाचा एक वेगळाच गंध असतो तो माझ्या मनाला नेहमीच उल्हसित करतो..!
ग्रंथालयामुळे ह.ना. आपटे, नाथमाधव, वि.स. खांडेकर, साने गुरुजी, कुसुमाग्रज,
वि.दा. करंदीकर सावरकर, ना.सं. इनामदार, विजया राजाध्यक्ष, योगिनी जोगळेकर, ग्रेस, शांताबाई शेळके, जयवंत दळवी, इंदिरा संत,भा. रा तांबे, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, बालकवी, ना. धो. महानोर, वसंत बापट इ. अशा अनेक लेखकांची असंख्य पुस्तके वाचता आली. काहीतरी वेगळं सांगणारी पुस्तके ही आकर्षून घेत होती. मन पुस्तकांत शांत होऊ लागले, रमू लागले. पुस्तकांनीच माझ्याशी संवाद साधला आणि समृद्ध जीवन कसे जगावे, माणूस म्हणून कसे मोठे व्हायचे ते पुस्तकांच्या सान्निध्यात मी शिकत गेले…!
माझ्या वयाच्या, आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर पुस्तकांनी मला साथ दिली…जेवढं वाचन प्रगल्भ तेवढेच आपले विचार आणि कृती योग्य मार्गावर राहते. विचारांच्या सीमा विस्तारण्यासाठी नी आपल्या कल्पकतेला नवी उमेद देण्यासाठी
प्रत्येक पुस्तक मला काही ना काही शिकवते, सांगू पाहते आणि आता मलाही त्यांची भाषा ही समजू लागली आहे.
अफाट जग अनुभवताना आपला ही दर्जेदार पुस्तकांचा एक छोटासा तरी संग्रह असावा अशी इच्छा निर्माण झाली आणि पुस्तके खरेदी करू लागले..
आयुष्याच्या एका टप्प्यावर जवळजवळ अनेक पुस्तकांचा माझा ग्रंथसंग्रह झाला आणि हा पुस्तकांचा संग्रह आजही माझ्याजवळ आहे. “माझ्या घरी माझी पुस्तके'” ही सवय आजतागायत टिकून आहे.
कविता-कादंबरी-
कथा-चरित्र–आरोग्य
आत्मचरित्र– ललित-
वैचारिक- लेख- आध्यात्मिक-आरोग्य-पर्यावरण-संगीत-
अशा विविध प्रकारांत मोडणारी, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित,
गतकाळाच्या अनुभवाने वर्तमानाला शहाणे बनविण्याचा प्रयत्न करणारी, सकारात्मक विचारांना प्रवृत्त करणारी, निखळ आनंद देत हसविणारी-
शिकविणारी पुस्तके माझ्या ग्रंथालयाला समृद्ध करीत आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्वांनी पुस्तक रूपाने माझ्या घरात वास्तव्य केलेय. जुन्या-नव्या कवी-कवयित्रींच्या काव्यसंग्रहाचा संग्रह केला.
मराठी साहित्यात वेगळ्या पण वास्तव जगाची भर घालणारी अशी पुस्तकेही आहेत
अशा प्रकारे स्वत:साठी ग्रंथसंग्रह केला पण ग्रंथांना कपाटात बंदिस्त करून ठेवले नाही. वाचनाची आवड असणाऱ्याला माझ्या संग्रहातील पुस्तक वाचावयास मिळते.
पुस्तक खरेदी माझ्यापुरतीच केंद्रीत न ठेवता इतरांना भेटी दाखल नेहमीच पुस्तके दिली. एखाद्या संस्थेलाही माझ्याकडून पुस्तक भेट दिली जाते आणि ती मी माझी सामाजिक बांधिलकी मानते.
माझं समग्र जीवन पुस्तकांनी व्यापलं त्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं अधिक अर्थपूर्ण झालं. आयुष्याच्या टप्प्यावर हाती लागलेल्या पुस्तकांनी संस्कृती आणि ज्ञान यांची जोपासना ही केली.
पुस्तकांची मैत्री ही सर्वश्रेष्ठ मैत्री आहे असं मला तरी वाटतं
माझे खरे साथीदार हे पुस्तकंच आहेत हे मी मनापासून नमूद करते
पुस्तकाच्या
पानापानांवर प्रेम
जडले
वाचनात सदा मन
गुंतले
पुस्तकाच्या सोबतीने
आयुष्य उज्ज्वल झाले
संगीता कुलकर्णी–
ठाणे@
9870451020