You are currently viewing झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे दोन दुचाकींमध्ये धडक : चारजण गंभीर

झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे दोन दुचाकींमध्ये धडक : चारजण गंभीर

झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे दोन दुचाकींमध्ये धडक : चारजण गंभीर

सावंतवाडी

मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभार्ली रस्तावाडी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये तिरोडा ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश कळंगुटकर (५४, रा. उभादांडा वेंगुर्ले ) यांच्यासह युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी अंजली सागर आडारकर (३२, रा. तिरोडा ), प्रथमेश प्रमोद कदम (३०, रा. पेंडूर मालवण ) व समीर सदानंद मयेकर (३९, रा. काळसे, सुतारवाडी मालवण ) यांचा समावेश आहे. या चौघांनाही अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी व उपस्थित नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने व रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ४.१५ च्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामसेवक ज्ञानेश कळंगुटकर हे त्यांची सहकारी कर्मचारी मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी अंजली आडारकर यांच्यासह आपल्या ताब्यातील दुचाकीने ओरोस सिंधुदुर्ग येथून आपले शासकीय कामकाज आटोपून मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासने मळगावच्या दिशेने वळत होते. तर दुसऱ्या दुचाकीवरील प्रथमेश कदम हे त्यांचे सहकारी समीर मयेकर यांच्यासह दुचाकिने मळगाव येथून बायपासच्या सर्व्हिस रोडवरून मालवणच्या दिशेने जात होते. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात चौघांनाही गंभीर दुखापत झाली. यात ग्रामसेवक ज्ञानेश कळंगुटकर यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली तर अंजली आडारकर यांच्याही डोक्याला गंभीररित्या दुखापत झाली.

अपघातानंतर मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यासह सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते तथा आरपीडीचे निवृत्त क्रीडाशिक्षक शैलेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते निलेश चव्हाण, प्रसाद रेडकर, संजय जोशी यांच्यासह अन्य उपस्थित ग्रामस्थ व वाहनधारक घटनास्थळी दाखल झाले. १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करूनही बराच वेळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होत नसल्याने अखेर निलेश चव्हाण यांनी आपल्या स्वतःच्या खाजगी गाडीने गंभीर जखमी असलेल्या अंजली आडारकर यांना प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर वेगवेगळ्या खाजगी रुग्णवाहिकांमधून ज्ञानेश कळंगुटकर, समीर मयेकर व प्रथमेश कदम यांनाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव, सतीश बागवे, शैलेश नाईक, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे यांच्यासह राजू धारपवार, निवृत्त पोलीस कर्मचारी ड्युमिंग डिसोजा, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, समीर पालव, घनःश्याम वालावलकर, सुर्यकांत आडारकर, सुरज बाईत, तुषार वालावलकर यांच्यासह नागरिकांनी मदत कार्यात सहभाग घेतला.

उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर चौघांची ही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, लक्ष्मण काळे, वाहतूक पोलीस आबा पिळणकर व सुनील नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत रुग्णांच्या तब्येतीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा