“आज ग्रेसचा स्मृतीदिन त्यानिमित्ताने….
*मितवा, ग्रेस आणि आम्ही…*
अवकाश थंड हाताशी, दु:खाचा जैसा व्याप,
काळाच्या करुणेमधूनी, सुख गळते आपोआप….
आपले अवघे आयुष्य सुखाळून टाकणारे काही प्रसंग अचानक घडतात आपल्या आयुष्यात… अचानक काही माणसे समोर येतात, अनपेक्षितपणे भरभरुन बोलतात आणि आपले आयुष्य सुंदर बनवून जातात. दु:खाचा महाकवी समजल्या जाणार्या प्रतिभावंत कवी ग्रेस यांच्या साहित्यावरील ‘मितवा’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम करीत असतानाची गोष्ट… राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत हा अभिवाचनाविष्कार सर्वोत्कृष्ट ठरला आणि हेच निमित्त झाले, ग्रेसांच्या भेटीचे महत्भाग्य लाभण्याचे…
एके दिवशी अचानक ग्रेसांची भेट ठरली आणि आपले दैवत भेटल्याचा परमानंद झाला आम्हाला… या भेटीमध्ये त्यांच्याबद्दलचे अनेक वाद-प्रवाद, समज-गैरसमज आपोआप गळून पडले. ग्रेस जवळजवळ साडे तीन तास आमच्याशी बोलत होते. अनेक वेळा काही गोष्टींना काही एक निमित्त लागते. साहित्याच्या क्षेत्रात वळणा-आडवळणाने प्रवेश करीत असताना ‘ग्रेस’ या नावाबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल फारच ऐकून होतो. मग अचानक एका अनाहूत क्षणी ‘मितवा’ वाचनात आला आणि एका क्षणात आमच्यापुरते सगळेच बदलून गेले. वाटले, हे सगळे मिळण्या-वाटण्यापलीकडचे काहीतरी आहे. जीवनानुभूतीमध्ये प्रतिभापूरीत हातांच्या लेखणीचा गंध मिसळला गेला की अवघे विश्वच गंधाळून जाते. ‘मी महाकवी दु:खाचा’ असे ग्रेस म्हणतात खरे, पण त्यातही एका वेगळ्या सौंदर्याची जाणीव मनाला होते. किंबहुना त्या सौंदर्याच्या जाणीवेमुळेच या दु;खाचे गहिरेपण आम्हाला अधिक भिडले असावे.
– आणि या ‘भिडण्यातून’ आणि ‘जाणवण्यातून’च ‘मितवा’ मंचांकित करण्याची प्रेरणा मिळाली. मग मात्र काहीतरी करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देईना. राजपुत्र आणि डार्लींग, चंद्रमाधवीचे प्रदेश, संध्याकाळच्या कविता, चर्चबेल अशी वाचने झाली. त्यानंतरही ‘वार्याने हलते रान’ आणि ‘चंद्रउदयिनी वेळा’ यांच्याशी सामना झाला. ग्रेसांच्या साहित्यातील दुर्बोधतेची बेसरबिंदी शोधणे भल्याभल्यांना साध्य झाले नाही, ते आम्हाला काय होणार ? तरीही त्यातील सौंदर्य टिपण्याच्या हव्यासातून या साहित्यावर काहीतरी करावेसे वाटले. त्यात वावगे काहीच नाही. नाहीतरी, ज्याच्या दु:खाची तिरीपही भरजरी आहे, त्याला वेगळे सौदर्याख्यान मांडण्याची मुळी गरजच नाही. ते ज्याचे त्याने समजून घ्यावे. नाजूक पण ऐटदार सौंदर्याचे प्रतीक असलेल्या हरिणाच्या, अवघ्या विश्वाची जननी समजल्या जाणार्या गाईच्या आणि सतत भीतिच्या तणावाखाली भिरभिरती नजर असलेल्या शेळीच्या डोळ्यांत सदासर्वदा कारुण्याचेच प्रतिबिंब दडलेले असते. तरीही त्या डोळ्यांवर आम्ही प्रेम करतो. गझलेच्या डोळ्यांनी गझलेचा वेध घेऊ पाहण्याची असोशी असलेल्यांपैकी आम्ही एक फिरस्ते…
या फिरस्त्याला कधीतरी ‘ग्रेस’ सापडला, तो भावला आणि त्याच दु:खाची भरजरी तिरीप परावर्तीत करण्याच्या सद्हेतूने त्या फिरस्त्याने अभिवाचनाच्या निमित्ताने ‘मितवा’ मंचावर साकारला. ग्रेसांशी घनिष्ट संबंध असलेल्या सतिश सोळांकुरकरांना तो प्रयत्न आवडला, त्यांनी लगोलग हा प्रयत्न थेट ग्रेसांपर्यंत पोहोचवला आणि खुद्द ग्रेसांनीही या प्रयत्नांना कौतुकाची थाप दिली, हे आमच्यासाठी खरोखरच भाग्याचे आणि स्फूर्तीदायकही आहे.
‘ग्रेस’ असे कसे लिहू शकतात, असा प्रश्न आम्हला पडायचा. अजूनही त्या प्रश्नाच्या पीळातून आमची सुटका झालेली नाही. त्यांच्या लेखनाला कर्णाच्या कवचकुंडलांसारखी जडलेली दुर्बेधतेची बेसरबिंदी ही जणू त्यांच्या व्यक्तित्वाचाच भाग बनून गेलेली असावी. लिहीताना जे काही ‘आतून’ येणे असते, त्यातच या बिंदीचे रंग मिसळलेले आहेत, जे कागदावर उतरताना स्वत:च्या व्यक्तित्त्वाची छटा घेऊन येतात. त्यात कृत्रिमपणे रंग भरण्याची गरजच भासत नाही मग… हे असेच असावे बहुधा…
हे लिहीताना आम्हाला अचानक मंटो आठवला – तो म्हणतो, ‘मैं अफसाना तो अव्वल तो इसलिए लिखता हूं कि मुझे अफसाना लिखने की शराब की तरह आदत पडी हुयी है| मैं अफसाना नही लिखता, हकिकत यह है कि अफसाना मुझे लिखता है| अफसाना मेरे दिमाग में नही, जेब में होता है, जिस की मुझे कोई खबर तक नही होती|’
आमच्यासारखे कलमदाने मात्र हातात पेन्सिल किंवा पेन घेऊन कागदच्या कागद खरडीत बसतात. तरीही ‘गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे’ किंवा ‘उठा दयाघना, लावा निरांजने, देहातले सोने, काळे झाले’ असे काहीही कागदावर उतरत नाही. मग अनेक वेळा कुबड्या घेत दुबळेपणाने शब्दांचा मार्ग पार करण्याची नौबत येते. ते टाळता आले पाहीजे, हे खरेच… त्या प्रयत्नांच्या मार्गावरीलच हा एक टप्पा… असे अनेक टप्पे आहेत भविष्यात… ते पार करायचे आहेतच… ग्रेसांच्या भेटीच्या निमित्ताने असे टप्पे पार करण्यासाठी स्फूर्ती मिळाली, हे काय कमी आहे ?
– श्रीनिवास नार्वेकर©
(ग्रेसना मी लिहिलेलं पहिलं पत्र. त्यानंतर मग आमची भेट झाली. अखेरपर्यंत राहीला तो सहवास. हेच पत्र मग मी दैनिक लोकमत’मध्ये लिहित असलेल्या “सलाम नमस्ते” या साप्ताहिक सदरातील एक स्तंभ म्हणून प्रकाशित झाले.)
– प्रकाशन दिनांक : ३० सप्टेंबर २००८
हे छायाचित्र मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या एका कार्यक्रमामध्ये आमच्या सुनील देवळेकरने टिपलेले..