नोंदणीकृत न्यासांच्या विश्वस्तांसाठी कार्यशाळेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व श्री दत्त मंदीर माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत न्यासांचे विश्वस्तांसाठी दि. 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्री दत्त मंदीर माणगाव ता. कुडाळ येथे विश्वस्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणीकृत न्यासांच्या सर्व विश्वस्तांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त ए.जी. कुलकर्णी यांनी केले आहे.
या कार्यशाळेस कोल्हापूरचे धर्मादाय सह आयुक्त निवेदीता पवार, सहायक धर्मादाय आयुक्त अवंतीका कुलकर्णी, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराम नाईकवाडे, कोल्हापूरचे विधिज्ञ प्रविण कदम, सनदी लेखापाल जयंती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होणार आहे, असे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दीप्रकाव्दारे कळविले आहे.
००००००
उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना
सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये तापमानात वाढ झाल्यांने उष्माघात संभावतो. अशावेळी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.
अतिजोखमीचे घटक :-
1) 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती. 2) 1 वर्षाखालील व 1 ते 5 वयोगटातील मुले. 3) गरोदर माता. 4) मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती. 5) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती.
उष्माघात होण्याची कारणे :-
1) उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे. 2) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे. 3) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. 4) घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे :-
१) थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे. २) भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे. ३) रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.
प्रतिबंधात्मक उपाय :-
१) वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे. २) कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत . 3) उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. ४) जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे. ५) सरबत प्यावे. ६) अधुनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी. ७) वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. ८) उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा.
उपचार :-
१) रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, २) रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. ३) रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. ४) रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत. ५) आवश्यकतेनुसार सलाईन देणे.
आरोग्य विभागामार्फत केलेल्या उपाययोजना :-
- सर्व प्राथमि आरोग्य केंद्र परिसरात उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी माहिती फलक लावण्यांत आलेले आहेत. 2. उष्माघाताच्या रुग्णांच्या उपचारासाठी जलद प्रतिसाद टिम तयार करण्यांत आलेली आहे.
- प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरही उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. 4. सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा अद्याप एकही रुग्ण सापडलेला नसून जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये याबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे. 5. या करीता जिल्ह्यातील सर्वच आरोग्य संस्थांमध्येORS, normal salineइ. अत्यावश्यक औषधांचा पुरेसा औषधसाठा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार इतर साहित्याचा पुरवठा जिल्हास्तरावरुन सर्वच आरोग्य संस्थांना करण्यात येतो. 6. सर्वच आरोग्य संस्थांकडील रुग्णवाहिका सुस्थितीत कार्यरत असून 108 सेवेच्या रुग्णवाहिका देखिल उपलब्ध आहेत. 7. उष्माघातासंबंधी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावरुन अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचा नियमितपणे आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
वरीलप्रमाणे उष्माघाताची लक्षणे आढळल्यास नागरीकांनी घाबरुन न जाता नजिकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधवा.