*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सदस्या ज्येष्ठ कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*होऊ कशी उतराई…*
बाबांची आठवण काढायला
विसरलेच होते कधी
सामावले आहेत माझे बाबा
माझ्या प्रत्येक श्वासामधी
त्यांचेच तर बोट धरून
शिकले मी चालायला
हात धरून शिकविले
त्यांनीच तर लिहायला
माझी माय माझी माय
असेच सतत म्हणायचे
कडेवर घ्या म्हटले की
लगेच उचलून घ्यायचे
धावता धावता धपकन
कधी अंगणात पडायचे
उगी उगी बाळा म्हणून
हलकेच डोळे पुसायचे
आई कधी रागावली तर
समजूत बाबा घालायचे
लेक सासरी गेल्यावर
कसे गं माझे व्हायचे
आज नाहीत आई बाबा
याद पुसली जात नाही
काय लिहू किती लिहू
मन तिथेच गुंतून राही
मोठे झाले किती जरी
आठवतात बाबा आई
त्यांच्या मुळेच मी आहे
होऊ कशी मी उतराई
@अरुणा गर्जे
नांदेड