You are currently viewing चेंबूर (तुर्भे) शिक्षणसंस्था संचलित कलारंग आणि नाद संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने थाटात पार पडले महिला संमेलन

चेंबूर (तुर्भे) शिक्षणसंस्था संचलित कलारंग आणि नाद संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने थाटात पार पडले महिला संमेलन

मुंबई :

चेंबूर तुर्भे शिक्षणसंस्था संचलित कलारंग आणि नाद संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १९/०३/२०२५ रोजी, ना.ग.आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर येथे आयोजित महिला संमेलन संपन्न झाले. संमेलनाची प्रेरक कल्पना आणि त्या आनुषंगाने योग्य नियोजन आणि कार्यवाही वाखाखण्याजोगीच. लक्षणीय उपस्थितीत संमेलन उत्साहात पार पडले. सगळ्या महिला नटूनथटून आलेल्या ..छानच दिसत होत्या.

 

प्रवेशद्वारातून सभागृहात प्रवेशतानाच आलेल्या पाहुणे व रसिक अभ्यागत मंडळीस, औक्षण करून, अत्तर लावून, सोनचाफा, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

 

आ. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन होऊन, महाराष्ट्र गीताने संमेलनाची सुरुवात झाली. मधुरा शास्री यांनी गायिलेले ‘स्वागतम् शुभ स्वागतम् ‘ श्रवणीय व अगदी साजेसेच.

 

शुभांगीताई जोशी यांनी प्रास्ताविकातून संमेलन घेण्यामागील पूर्वपिठिका, कलारंग, आचार्य 90 एफ्. एम्.,चें तु. शि सं. ची संमेलनाविषयी, प्रेरक भूमिका स्पष्ट केली.

 

माननीय प्राचार्य डॉ.कॅप्टन सुनील कदम यांनी संस्थेच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन संमेलनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

महिला संमेलनाला साजेसे असे स्रीशक्तीचा पुरस्कार करणारे, महिषासुर मर्दिनी, दुर्गा, भवानी, ते शिवमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई या महाशक्तींचे मूर्तिमंत दर्शन घडवत अभिनित, चापल्यपूर्ण असे शेरोन जयवंत यांचे नृत्य-नाट्य अतिशय भावले.

 

सन्माननीय सत्कारमूर्ती मा. न्यायाधीशा डॉ. चंदा नाथानीजी, चॅरिटी कमिशन पदाधिकारी सुवर्णा जोशीजी खंडेलवाल, साहित्य आणि कलाक्षेत्र गाजवणाऱ्या मंजिरी मराठेजी, संगीत क्षेत्रातील नामवंत गायिका संगीता गोगटेजी, उद्योजिका जान्हवी सप्रेजी या पंचकन्या आपापल्या क्षेत्रात गौरवास्पद लक्षणीय कामगिरी करत आहेत. त्यांचा यथोचित सत्कार झाला. त्या सर्वांचे मनोगत सर्व महिलांसाठी सकारात्मक व प्रेरक ऊर्जादायी होते.

 

महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेलेजी, व नाद संगीत विद्यालयाच्या संस्थापिका शुभांगीताई जोशी यांचा घरचा, आपुलकीचा, हृद्य असा विशेष सत्कार झाला. संस्थेच्या विविध पदाधिकारी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

 

सर्व सत्कारमूर्तींचे हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छाही!

 

प्रा. मृदुला वाघमारे यांच्या *लोकाविष्कार: नाथांच्या भारुडांचा *या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे सदर संमेलनाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखनकार्यास्तव हार्दिक शुभेच्छाही!

 

ऋषितुल्य व्यक्तिमत्व आ. म्हापणकरसरांची उपस्थिती उत्साहवर्धक असते. सरांचा आशीर्वादरूपी वरदहस्त, शाबासकीची थाप नेहमीच प्रेरणादायी बळ देणारेच.

 

संमेलनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित मंडळी, संस्थाप्रमुख उपस्थित होते. त्यांना कृतज्ञतापूर्वक विष्णुप्रिया तुळशीचं वृंदावन देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

 

संमेलनाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे ऋतुजा फडके यांचं *पङ्गुम् लङ्घयते गिरिम्l* हे एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली दिव्यांग महिला अरुणिमा सिन्हा हिच्यावरील कीर्तन. नकाराला पळवून, मनाला सकारात्मकतेचं बळ देणारं.. मला आवडलं.

 

कलारंग सदस्या रंजना आंबेकर व सुवर्णा नलावडे यांनी निवेदनाची धुरा सांभाळली.

आचार्य 90 एफ् एम्. च्या रेडिओसखी कोमल, , तंत्रसाहाय्यिका सारिका यांचे खूपच मोलाचे सहकार्य लाभले.

आर् जे. तेजस्विनीने आभारप्रदर्शन केले.

 

आयोजन-नियोजन व प्रेरणा, सहकार्य चेंतुशिसं सचिव श्री. सुबोधजी आचार्य, सदस्य आ. शैलेशजी आचार्य, हर्षवर्धनजी पांडे रेणुकाजी आचार्य, नाद संगीत विद्यालय प्रमुख शुभांगीताई जोशी प्रा. डॉ. कॅप्टन सुनीलजी कदम, नम्रताताई मंजिरे, प्रा. मृदुला वाघमारे यांची. महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांच्या सहकार्यामुळेच , टेबल सोफा खुर्च्यांची उपलब्धता, मांडणी, माईक व्यवस्था, फोटोग्राफी , स्वच्छता, सजावट संमेलन चहापान-जेवणव्यवस्था‌.‌इ यशस्वीपणे संपन्न होऊ शकले. सर्वांना धन्यवाद.

 

कलारंगच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे रंजना आंबेकर, स्वाती वैद्य, विशाखा कुलकर्णी, विनिता गर्गे, जयश्री भिसे, उषा हर्डीकर, दीपा अध्ये, पूनम राणे, आर्या आपटे इत्यादींनी वेळ देऊन, मनापासून सहकार्य केले.

 

संंमेलनानंतर सर्वांनी वेज पुलाव, बटाटा भाजी, पोळ्या,कोशिंबीर, मोदक अशा स्वादिष्ट सहभोजनाचा आनंद घेतला.

 

अशाप्रकारे सर्वांच्या सहकार्याने अल्पावधीतही हे संमेलन नियोजनबरहुकूम, यशस्वीपणे संपन्न झाले.

 

मला सदर संमेलनाचा एक अल्पसा भाग होता आले याचा आनंद जरूर आहे.

मन:पूर्वक धन्यवाद.

 

–पुष्पा कोल्हे

प्रतिक्रिया व्यक्त करा