कोलगावचे संगीत विशारद कृष्णा राऊळ
सावंतवाडी :
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी कोलगावचे सुपुत्र तथा ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा संगीत विशारद कृष्णा राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम शेलार, सेक्रेटरी जगदीश मरामगे यांनी ही निवड केली आहे.
कोलगाववासीयांच्या आवाजाची शान असलेले बुवा कृष्णा राऊळ विद्यार्थीदशेपासूनच भजन कलेत कार्यरत आहेत. वडील कै विठू राऊळ यांच्याकडून त्यांना भजन कलेचे प्रारंभिक ज्ञान मिळाले. त्यानंतर त्यांनी प्रख्यात भजन सम्राट कै. कृष्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भजन कला आत्मसात केली. त्यानंतर या कलेचे शास्त्रीय शिक्षण गुरुदास मुंड्ये, चंद्रकांत बोर्डेकर, निलेश मेस्त्री यांच्याकडून घेतले. तर कोकण भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांच्याकडून ते आजही या कलेचे शिक्षण घेत आहेत.
त्यांनी भजन कलेची जोपासना करतानाच भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत या कलेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या भजन मंडळाने आतापर्यंत अनेक भजन स्पर्धांमध्ये तालुका ते राज्यस्तरापर्यंत प्रथम तीन क्रमाकांची तसेच त्यांनी वैयक्तिक उत्कृष्ट गायक तसेच हार्मोनियम वादकाची अनेक पारितोषिके पटकाविली आहेत. तसेच सिंधुदुर्गात अनेक संगीत क्लासच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक हार्मोनियम वादन व गायन क्षेत्रात कलाकार घडवित आहेत. त्यांचे अनेक शिष्य आज भजन क्षेत्रात नावलौकिक मिळवून आहेत. अनेक भजन स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही ते जबाबदारी पार पडत आहेत.
भजन क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांची शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी कृष्णा राऊळ यांनी आपल्या या जडणघडणीत गुरुंसह या क्षेत्रांतील सहकारी तसेच तमाम संगीत व भजन रसिकांच्या प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख केला.