*सुंदरवाडीत रंगलेले कोकण मराठी साहित्य संमेलन -२०२५:- एक चिरंतर आठवण*
*…आणि तुतारी फुंकली…*
कविवर्य कृष्णाजी केशव दामले..अर्थात “केशवसुत” यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केशवसुत कट्ट्यावर बालगोपालांसह साहित्य रसिकांच्या जमलेल्या गर्दीने पुष्पमाला अर्पण करत केशवसुतांची “तुतारी” फुंकली अन् नकळत मोती तलावाच्या शांत जलाशयावर नव्या क्रांतीचे स्वर निनादू लागले.. श्रीमंत शिवरामराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करून साहित्यिकांचा मेळा पुढे निघताच..सुंदरवाडीच्या मोती तलावाच्या शीतल जलाची हलचल क्षणभर वाढली. अनेकांनी विस्फारलेल्या नजरांनी हा अभूतपूर्व सोहळा “याची देही याची डोळा” पाहत साहित्य रसिकांचा मेळा पालखीतील ग्रंथांच्या आपल्या खांदावर घेऊन अभिजात मराठी भाषेच्या गौरवपर घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज नगरीकडे चालू लागला.. ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोर सारे पालखीचे भोई बनले..अन् आगत स्वागत होत पालखी सन्मानाने साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर स्थानापन्न झाली.. महात्मा गांधींनी राम राज्य म्हणून गौरविलेल्या पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचे नाव साहित्य नगरीला दिल्याने पुन्हा एकदा रामराजाच्या आठवणींचा जागर झाला..
*…ग्रंथोत्सवाचे उद्घाटन.. अन् कौतुकाचे हार..*
कोकण मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष वस्त्रहरणकार श्री.गंगाराम गवाणकर यांच्या शुभहस्ते कोकणच्या लाल मातीतील रक्ताला चेतना देणारा अन् कोकणच्या लाल मातीच्या सौंदर्यावर काव्य रचणारे कवी डॉ.वसंत सावंत ग्रंथदालनाचे फित कापून उद्घाटन झाले.. ग्रंथोत्सवात उपस्थित मळगाव वाचनालय, श्री समर्थ वाचनालय दाणोली, श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी वाचनालयाच्या कार्याचे अन् पुस्तकं जपण्याचे कौतुक झाले.
*…संमेलनास मधुभाई येणार ही आस चैतन्यदायी पण..,*
या संमेलनास वयाच्या ९४ व्या वर्षी सुद्धा मराठी साहित्याची सेवा करण्याची आस मनी बाळगून साहित्याचे महामेरू कोकण मराठी साहित्य परिषदचे तीर्थक्षेत्र पद्मश्री मधू मंगेश कर्णिक येणार याची आतुरता ताणली असतानाच मधुभाईंची प्रकृती ठीक नसल्याने येऊ शकत नाहीत असा संदेश धडकला अन् कितीतरी मने दुखावली गेली.. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ साहित्यिक मंदाकिनी गोडसे देवगड वरून केवळ मधुभाईंना त्यांचे स्वहस्ते रेखाटलेले चित्र देऊन भेट घेण्यासाठी आलेल्या…
पण…,तरीही ज्येष्ठ नाटककार, “वस्त्रहरणकार” अशी ओळख लाभलेले अन् “माडबन ते लंडन व्हाया वस्त्रहरण ” असा कल्पनेतील सुखांना पुलकित करणारा प्रवास केलेले लेखक श्री गंगाराम गवाणकर यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती अनेकांची मने आनंदित करून गेली.. “नानांचा सहवास लाभणे हे ही नसे थोडके” अशी भावना अनेकांच्या सुप्त मनात जागृत झाली आणि सोहळ्याचा खराखुरा आनंद लुटला गेला…
*…उद्घाटक नाम.नितेश राणेंची चाहूल धडधड वाढविणारी…*
सिंधुदुर्गचे तरुण तडफदार नेतृत्व तथा नवनिर्वाचित पालकमंत्री नाम.नितेश राणे यांचे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज नगरीत झालेले आगमन अनेकांना उत्साहित करणारे तर काहींची धडधड वाढविणारे ठरले.. मी आमदार, मंत्री असलो तरी हिंदू आहे त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका देश आणि राज्यात मांडतच राहणार..कितीही अंगावर आले तरी फरक पडणार नाही, राणेंनी आजवर संघर्षच केला आहे…असे सडेतोड बोल सुनावले.
सिंधुदुर्गातील ग्रंथालयांच्या स्थितीवर भाष्य करत, जर नवी पिढी ग्रंथालयांकडे वळली पाहिजे तर ग्रंथालये सुद्धा आकर्षक असली पाहिजेत. आगामी काळात लंडन येथे जशी ग्रंथालये असतात त्या धर्तीवर सर्व ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करणार.. मोबाईल आणि इंटरनेट मुळे वाचनापासून दूर गेलेली पिढी ग्रंथालयांकडे वळविण्यासाठी डिजिटल ग्रंथालय संकल्पना मांडली. कित्येक वर्षे पिढ्यानपिढ्याची पुस्तके जतन करणे फार अवघड असते परंतु अशी पुस्तके जतन करणाऱ्या श्रीराम वाचन मंदिरचे त्यांनी कौतुक केले. मालवणी भाषा ही आपल्या मातीशी जोडलेली आहे, तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे..असे सांगून मुंबईत जसे मराठी भाषा भवन झाले तसे कोकणात मालवणी भाषा भवन उभारण्याचा मनोदय व्यक्त केला.
या साहित्य क्षेत्रातील कोणतेही काम असेल तर आग्रहाने सांगा आणि माझ्याकडून करून घ्या अशी आग्रहाची सूचना मांडून साहित्याला आशेचा नवा किरण दाखवला. कोकणात कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन करून मधुभाईंनी अनेक हातांना लिहिते केले त्यासाठी मधुभाईंचे भरभरून कौतुक केले.
…*संमेलनाध्यक्ष श्री गंगाराम गवाणकर यांच्या माडबन ते लंडन प्रवास….*
संमेलनाध्यक्ष श्री गंगाराम गवाणकर यांनी वस्त्रहरण नाटकाच्या निमित्ताने विमानातून केलेला लंडनचा प्रवास सांगताना “टी आणि ती”..असे घडलेले किस्से शब्दांकित केल्यावर रसिक प्रेक्षक हास्याच्या दुनियेत स्वतःला हरवून बसले.. पाच हजारी मनसबदार लाभलेले वस्त्रहरण नाटकाने श्री.गंगाराम गवाणकर यांना ओळख दिली एवढेच नव्हे तर मच्छिंद्र कांबळींसारखा मालवणी नटसम्राट जन्मास घातला होता.
*….मुलाखतीत उलगडले अंतरंग*
दुपारच्या सत्राची सुरुवात झाली ती कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांच्या मुलाखतीने.. डॉ.प्रदीप ढवळ कोण होते..? कोमसाप मध्ये कधी आले..? कोमसापचे कार्याध्यक्ष कसे झाले..? असे प्रश्न अनेकांना पडतात.. याची उत्तरे केवळ डॉ.ढवळ यांच्या मुलाखतीतून मिळाली असे नव्हे तर बालपण ते कार्याध्यक्ष हा कठीण प्रवास अनेकांना ज्ञात झाला.. डॉ.ढवळ यांनी आपल्या मुलाखतीतून छत्रपती शिवाजी महाराज..जीवा महाल ही व्यक्तिमत्व अक्षरशः डोळ्यासमोर उभी करून बसल्या जागेवरून प्रतापगडावर घेऊन गेले..
*परिसंवादातून कळून आले..जयवंत दळवी उर्फ जया काका…*
आरवली येथील ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार जयवंत दळवी यांच्यावर आयोजित केलेल्या परिसंवादात रसिक श्रोते गुंग झाले होते. प्रा.रुपेश पाटील यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने परिसंवादास आनंदाची झालर लावली. ॲड.नकुल पार्सेकर यांनी त्यांना ज्ञात असलेले जयवंत दळवी आपल्या शैलीत उभे केले.. ॲड.अरुण पणदूरकर यांनी कादंबरी, नाटकातील वेगवेगळ्या भूमिकेतील पात्रे जिवंत केली..साहित्यिका वृंदा कांबळी यांनी गोष्टींचा आधार घेत जयवंत दळवी यांचे विविध पैलू उलगडून दाखवले. पण…, जयाकाकांचे पुतणे सचिन दळवी यांनी मात्र जयवंत दळवी यांची अनेकांना अज्ञात असलेली दुसरी बाजू अतिशय खुमासदार शैलीत रसिकांसमोर मांडली.. घरातील दळवी आणि घराबाहेरचे दळवी यांचे सचिन दळवींनी दर्शन घडवून देताना जया काकांना आवडणारे जर काय असेल तर ते मासे..असे सांगत तोलभाव न करता, आणि माशांना बोटही न लावता नजरेने ओळखून जया काका ताजे मासे घ्यायचे.. अशा अनेक आठवणीना उजाळा देत जयवंत दळवी यांच्या लेखन अन् स्वभावातील अनेक पैलू उलगडले..
*…तुतारी कवी संमेलनाने भरले साहित्य संमेलनात रंग…*
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कवी संमेलनास सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली आदी शाखांमधून निवडक कवींना संधी देण्यात आली होती. ज्येष्ठ मालवणी कवी रुजारियो पिंटो यांची “गाव बदलता”, कोकणची बहिणाबाई सुनंदा कांबळे यांच्या “बाराच्या भावात” या मालवणी कवितांनी कवी संमेलनात रंगत वाढली.. नव कवयित्री कु.अक्षदा गावडे हिची “नक्की काय हवे..?” कु.तन्वी परबची “सुरंगीचा वळेसार” वातावरण चैतन्यमय करून गेल्या. ॲड.नकुल पार्सेकर यांची “राजे जमल्यास माफ करा” प्रा.रुपेश पाटील यांची “आई..”, विजयकुमार शिंदेंची “ती गेल्यावर”..या कविता मनाला भावल्या.. ऋतुजा सावंत भोसले, सौ.मंगल नाईक जोशी, कल्पना मलये, डॉ.दर्शना कोलते, भेरा या मालवणी चित्रपटाचे लेखक प्रसाद खानोलकर यांच्या कवितांनी संमेलन उत्तरोत्तर बहरत गेले.. प्रा.रिमा भोसले, दीपाली काजरेकर, सिद्धेश खटावकर, राजेश रेगे, स्वप्नील वेंगुर्लेकर, आदींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून रसिकांची दाद घेतली.. त्यात एकनाथ गायकवाड यांची राधा वृत्तातील “ठेचाळतो आहे” आणि कवी संमेलनाचा समारोप करणारी कवी गझलकार दीपक पटेकर (दीपी) यांची तरन्नुम मध्ये सादर केलेली स्त्रग्विनी वृत्तातील “मैत्री” या गझल रचना कवी संमेलनात वेगळेपण दाखवून गेल्या..
कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचलन कोमसाप सावंतवाडीचे कार्यकारिणी सदस्य कवी दीपक पटेकर (दीपी) यांनी केले.
*….कोमसापचे पुरस्कार वितरण…*
कोमसापचे स्व.प्रा.मिलिंद भोसले आणि ॲड.दीपक नेवगी स्मृती पुरस्कार राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नाम.नितेश राणे यांच्या हस्ते अनुक्रमे शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस आणि शिक्षण महर्षी म्हणून ज्यांचा सिंधुदुर्गात उल्लेख केला जातो ते म्हणजे श्री.अच्युत सावंत भोसले यांना देऊन पुरस्कारांचा गौरव केला गेला..
*….संमेलनास अपशकुन करण्याचा प्रयत्न करणारे पडले तोंडघशी..*
सोशल मीडियाच्या माध्यमातून सावंतवाडीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी साहित्य संमेलनाचे उद्घाटक नाम.नितेश राणे असल्याने राजकीय टीका करून त्याबद्दलची पोष्ट फेसबुक, व्हॉट्सॲप आदींच्या माध्यमातून व्हायरल केल्याने संमेलन यशस्वी होणार नाही अशी अटकळ बांधून गाजरे खाणाऱ्यांना संमेलनाच्या यशस्वी नियोजनामुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली. त्यांनी विरोध दर्शविलेले जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने निमंत्रित उद्घाटक असलेले नाम.नितेश राणे खास संमेलनासाठी सावंतवाडीत वेळेवर हजर झाले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. नाम.राणेंनी देखील शेलक्या शब्दात त्यांचा समाचार घेत पालकमंत्री म्हणून मी जिल्ह्यातील साहित्य संमेलनाला उपस्थित राहून जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पाठीशी कायम राहणार असे सांगून साहित्यात राजकारण येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आणि साहित्याचे रोपटे लावणाऱ्या मधुभाईंचे आभारही मानले. परंतु *प्रवीण बांदेकर यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज नगरी, सावंतवाडीत होत असलेले जिल्हा साहित्य संमेलन – २०२५ राज्यात पोचवले हे नक्की..!*
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांनी कोमसाप हे रोपटे लावले आणि त्याच्या सावलीत आज कोकणात शेकडो लिहिते हात तयार झाले, अनेक महान साहित्यिक जन्मास आले.. आजही कोकणच्या भूमीत नवनवीन साहित्यिक रुजत आहेत. त्यामुळेच आजचे हे भव्य दिव्य असे साहित्य संमेलन साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर पार पडले..याचे श्रेय मधुभाईंना आणि त्यांच्या शिलेदारांना..!