वेंगुर्ले :
उभादांडा-सुखटनवाडी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची १६५ पिल्ले उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते सागरी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली.
उभादांडा-सुखटनवाडी समुद्र किनारी राहणारे मच्छीमार बस्त्याव ब्रिटो यांनी वनविभागाच्या सुचनेनुसार या किनारी अंडी लावणाऱ्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी संरक्षित केली. त्यांनी संरक्षित केलेल्या ९७ कासव अंड्यापैकी ९५ कासव पिल्ले रविवारी बाहेर पडली. तसेच जॅक्शन सिमाव ब्रिटो यांनी संरक्षित केलेल्या ८७ कासव अंड्यांपैकी ७० कासव पिल्ले रविवारी बाहेर निघाली. या दोन्ही कासव घरट्यातील एकूण १६५ कासव पिल्ले उभादांडा सरपंच नीलेश चमणकर व माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते सागरी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. यावेळी कासव मित्र बस्त्याव ब्रिटो, जॅक्शन सिमाव ब्रिटो, तनीश चमणकर उपस्थित होते.