You are currently viewing शब्द एक अर्थ अनेक:पाणी

शब्द एक अर्थ अनेक:पाणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्द एक अर्थ अनेक : पाणी*

 

*पाणी पाणी* आक्रोशता

डोळा दाटे *पाणी*

कशी गायची आनंदाने

आता जीवन गाणी।।

 

*पाणी* माझ्या पाणी(पाणि) घेता

घडते द्वैताचे अद्वैत

दोघे मिळुनी आपण

करुया संकटावरी मात।।

 

दाखवू *पाणी* मराठीचे

साहित्य कथा कविता

भाषेची अनमोल झळाळी

दाखवू सगळ्या जगता।।

 

विश्वास दांडगा काढतो

लाथ मारू तिथे *पाणी*

मनात आशा आकांक्षा

घालू गगनाला गवसणी।।

 

*पाणी* जाते वळणावरती

मनावरचे संस्कार

*पाण्यात* कुणी पाहत नाही

असे आदर्श विचार।।

 

मेघांनी थेंबात ओवले

*पाणी* सुंदर दिसते

धरा लाजते बघूनी मेघ

लाजून *पाणी* होते।।

 

दव क्षणैक ते पानावरती

*पाणी* क्षणैक असते

चमकून आनंदाने

धरणीवर ठिबकते।।

 

निर्मळ *पाणी* खळाळणारे

सहज मिसळता रंग

ह्रदयी *पाणी* भक्ती रसाचे

मनडोहात तरंग।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️🪶

*अरुणा दुद्दलवार@✒️*

प्रतिक्रिया व्यक्त करा