You are currently viewing ठेचाळतो आहे

ठेचाळतो आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोमसाप मालवणचे सदस्य कवी/गझलकार एकनाथ गायकवाड लिखित अप्रतिम गझल*

 

*ठेचाळतो आहे*

(वृत्त -राधा)

 

चालताना मी असा ठेचाळतो आहे

ओळखीच्या चेहऱ्यांना टाळतो आहे

 

ऐतखाऊ रोज खातो तूप वाट्याचे

मी उपाशी पोट माझे जाळतो आहे

 

पावसाळा ओततो माझ्यावरी धारा

अंतरातूनी तरी मी वाळतो आहे

 

आपल्या कोत्या मनाचा जाब तू घ्यावा

भेटण्याच्या कोण वेळा पाळतो आहे?

 

वेदनांचे दाटलेले डोह डोळ्यांशी

पापण्यांतूनी तयांना गाळतो आहे

 

ठोकरावे ते सुखाने नेमक्या वेळी

का कळेना मी तरीही भाळतो आहे

 

जे मृगाचे थेंब आता सांडले खाली

गंध मातीचा परी गंधाळतो आहे

 

पेटतो वाडा तरी माझा उभ्या जागी

मी तयाची राख भाळी माळतो आहे

 

थांबले गाणे दिवाने ज्या समेठायी

चार आसू त्या ठिकाणी ढाळतो आहे

 

श्री. एकनाथ गायकवाड

त्रिंबक

प्रतिक्रिया व्यक्त करा