आणखी नविन एसटी बसेस व २० मिनी बसेस उपलब्ध होणार
*पालकमंत्री नीतेश राणे यांची माहिती
*कणकवलीत नविन बसेसचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ
कणकवली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्ययावत एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील काही बसेस आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात देवगड व अन्य तालुक्यात बसेस पुरवल्या जातील. ज्या एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ज्याप्रमाणे सरकारची आहे तशीच प्रत्येक प्रवाशांची आहे. त्यामुळे आपण एकत्र मिळून जबाबदारी घेतल्यास प्रवास सुखकर होईल, असे सांगताच बस स्थानकांवर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले.
राज्य परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागात एसटीच्या कणकवली डेपो मध्ये BS6च्या पाच बस गाड्या दाखल झाल्या आहेत. या बस गाड्यांचे लोकार्पण राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा हस्ते करण्यात आले.यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, अशोक राणे, कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड, एएमई विभागाचे पाडुरंग पाटील, डीई. श्री. केंकरे, डीपीआे श्री. कलकुटली, बसस्थानक प्रमुख प्रदीप परब, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ए. सी. कदम, शिवाजी राठोड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष कानडे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, वागदेचे सरपंच संदीप सावंत यांच्यासह एसटीचे कर्मचारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री ना.नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ जिल्हा आहे. या भागात एसटीच्या मिनी बस गाड्यांची सेवा सुरु करावी, अशी प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी शासन व परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरवठा केलेला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिना भरात आणखीन २० मिनी बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात अद्ययावत BS6 बस दाखल होत आहेत. या बसेसमुळे एसटीच्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व आरामदायी होणार आहे, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. नवीन बस गाड्यांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी BS6 अद्ययावत अशा बसेस मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील बसेस आलेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील बसेस लवकरच येणार आहेत.
एसटीच्या प्रवाशांसह प्रशासनाच्या ज्या-ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी महायुती सरकार म्हणून आमच्यावर असणार आहे. एसटी प्रशासनाच्या ज्या-ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी महायुती सरकार असणार आहे, असेही ना. नितेश राणे म्हणाले. तर पुणे येथे बस स्थानकावर घडलेल्या त्या घटनेनंतर तसे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकावरील बंद असलेले पोलीस नियंत्रण कक्ष पुन्हा सुरू करून त्या ठिकाणी आवश्यक कर्मचारी तैनात करण्याची सूचना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून देणार असल्याचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी सांगितले.