सिंधुकन्या अक्सा शिरगांवकरने पटकावली ‘नॅशनल आर्चरी’ स्पर्धेत ‘तब्बल दोन सुवर्णपदके…
कणकवली
राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेत ‘सिल्व्हर मेडल’ प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अक्सा मुदस्सर शिरगांवकर या १२ वर्षीय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कन्येने गुंटूर (राज्य मध्यप्रदेश) येथे सुरू असलेल्या एनटीपीसी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशीप २०२४ – २५ या स्पर्धेत तब्बल दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली. अक्सा हिने १३ वर्षांखालील ‘कंपाऊंड आर्चरी’मधील स्कोरींग राऊंड’ आणि ‘इलिमिनेशन राऊंड’ अशा दोन प्रकारांमध्ये सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. साहजिकच अक्सा आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. अर्थातच अक्सा हीची कामगिरी केवळ सिंधुदुर्गसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी दमदार, अभिमानास्पद ठरली आहे.
स्कोरींग राऊंड’ स्पर्धा शुक्रवार, २१ मार्चला तर ‘इलिमिनेशन राऊंड’ स्पर्धा शनिवार, २२ मार्चला पार पडली. विशेष म्हणजे ‘कंपाऊंड आर्चरी’मधील सांघिक प्रकारातही अक्सा हिचा महाराष्ट्राच्या संघात समावेश होता. या संघाने देखील ‘सिल्व्हर मेडल’ प्राप्त केले असून त्यातही अक्सा हिची कामगिरी लक्षणीय आहे.
विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षांची ‘आर्चरी जर्नी’ असलेली अक्सा ही सलग दोन वर्षे सदरच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्यातर्फे गतवर्षी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अक्सा हिने १३ वर्षांखालील गटात ‘गोल्ड मेडल’ प्राप्त करून नादियाड (राज्य गुजरात) येथील राष्ट्रीय स्पर्धेत निवड पक्की केली होती. त्या स्पर्धेत अक्सा हिने पाचवी ‘रँक’ प्राप्त केली होती. तर यावर्षी डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अक्सा हिने १३ व १५ वर्षांखालील गटात तब्बल तीन’सिल्व्हर मेडल’ प्राप्त करून गुंटूर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड पक्की केली व त्यात दुहेरी सुवर्णवेधही घेतला आहे.
गुंटूर (राज्य मध्यप्रदेश) येथील एनटीपीसी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशीप २०२४ – २५ स्पर्धेत १३ वर्षांखालील ‘कंपाऊंड आर्चरी’ प्रकारात देशभरातील सर्वच राज्यांतून ‘सिलेक्टेड’ १०० खेळाडू सहभागी झाले होते. गतवर्षी ‘गोल्ड मेडल’ प्राप्त झालेल्या स्पर्धकाचाही या स्पर्धेत सहभाग होता. अक्सा हिच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्या स्पर्धकाला यावर्षी ‘सिल्व्हर मेडल’वर समाधान मानावे लागले. ‘इलिमिनेशन राऊंड’मधील ‘टाय’ झालेल्या अंतिम लढतीत ‘वन ऍरो शुट’मध्ये अखेर अक्सा हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
लहानपणापासूनच नेमबाजीची आवड लागलेल्या अक्सा हिने दोन वर्षांपूर्वी सातारा येथील प्रविण सावंत यांच्या दृष्टी ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षांमध्येच तिने विविध स्पर्धांमध्ये पदकांना गवसणी घातली. यात वरील सर्व स्पर्धांसह इतरही अनेक स्पर्धांचा समावेश आहे. यामध्ये सीबीएसई बोर्डातर्फे पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पाचवी ‘रँक’ प्राप्त करुन तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली होती. तीच राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली, तेथेही अक्सा हिने सहावी ‘रँक’ प्राप्त केली. नादियाड (राज्य गुजरात) येथे झालेल्या ‘नॅशनल स्कुल गेम्स ऑफ आर्चरी २०२४ – २५’मध्ये अक्सा हिने ‘कंपाऊंड’ प्रकारात महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाने स्पर्धेत ‘सिल्व्हर मेडल’ प्राप्त केले होते.
गुंटूर येथे आता सुरू असलेल्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत अक्सा ही १५ वर्षांखालील ‘कंपाऊंड आर्चरी’ स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे. ही स्पर्धा २७ ते २९ मार्च या कालावधीत होणार आहे. १५ वर्षांखालील स्पर्धेत देशभरातील मातब्बर खेळाडूंचा सहभाग असला तरीही आपण ‘मेडल’ मिळवूच, असा विश्वास अक्सा हिने व्यक्त केला आहे.
या महत्वपूर्ण कामगिरीमुळे अक्सा हिला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीची ‘इंटरनॅशनल ट्रायल’ येत्या मे महिन्यात होणार असून त्याचे ठिकाण लवकरच जाहीर होणार आहे. पण, भविष्यात जगभरात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरणे व ‘सुवर्णपदक’ मिळवणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याची प्रतिक्रिया अक्सा हिने विजयानंतर दिली आहे.
कणकवलीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची सातवीतील विद्यार्थिनी असलेली अक्सा गेल्या दोन वर्षांपासून सातारा येथेच राहून प्रविण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तिच्या यशाबद्दल वडील तथा प्रतिथयश शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर आणि आई तथा बचतगटाच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करणाऱ्या, अनेक महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या सौ. तन्वीर शिरगांवकर यांनीही समाधान व्यक्त केले आहे. अ