सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना द्वारे हॉस्पिटलच्या गंभीर प्रश्नांवर सोमवारी 24 मार्चला होणार तीव्र आंदोलन.
“एकच आवाज न्यूरो सर्जन व हृदयरोग तज्ञ हवाच”आज नाही तर कधीच नाही” या साठी प्रत्येक नागरिकांनी उपस्थित राहावे – रवी जाधव.
रुग्णालयाचे ‘ह्रदय’ म्हणजे फिजिशियन आणि जर गेली बरीच वर्षे फिजिशियन नसेल तर रुग्णालय बंद पडणार – देव्या सुर्याजी
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे हृदयरोगतज्ञ तथा न्यूरोलॉजीस्ट ही पदे कित्येक वर्षापासून रिक्त असल्याकारणाने येथील नागरिकांना तसेच युवकांना आपला जीव गमवावा लागत आहे या गंभीर विषया संदर्भात काल मा.जिल्हाधिकारी व मा.जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना निवेदन सादर करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.प्रकाश आबिटकर ,मा.नितेशजी राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माजी शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना हि सदर विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले.
सावंतवाडी शहर व त्याला लागून असलेली अनेक गावे यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आहे या रुग्णालयात भरपूर प्रमाणात रुग्ण येतात त्यामुळे रुग्णालयात प्रचंड गर्दी होते परंतु सदर रुग्णालयामध्ये हृदयरोग तज्ञ तथा न्यूरोलॉजीस्ट,फिजिशियन नसल्यामुळे लांबून आलेल्या गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांचे हाल होतात व त्यांना नाईलाजस्तव खाजगी दवाखान्यामध्ये किंवा गोवा बांबुळी येथे जाऊन उपचार घ्यावा लागतो.
तसेच सिस्टरस्टाफ, वार्ड बॉय, साफसफाई कर्मचारी,सिक्युरिटी गार्ड व (पोस्टमार्टम)कटर यांची कमतरता असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.या रुग्णालयावर प्रभारी अधिक्षक यांचा पुर्णपणे दुर्लक्ष झालेला असून अनेक तक्रारी या दिवसेंदिवस वाढत आहेत.यासाठी कायमस्वरुपी चांगला वैद्यकीय अधीक्षक मिळावा जो सर्वसामान्य जनतेला रुग्णांना सहकार्य करणारा असावा.
हे सर्व विषय गृहीत धरून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे व युवा रक्तदाता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी आरोग्य मंत्री महाराष्ट्र व प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने पदे भरण्यासाठी येत्या सोमवारी दिनांक 24 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सावंतवाडी तालुक्यातील शहरातील असंख्य नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन उभारण्याचा यलगार केला आहे.जोपर्यंत डॉक्टर यांची पदे भरली जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन न थांबता अजून तीव्र केले जाईल.
सावंतवाडी शहरातील नागरिक तसेच सावंतवाडी तालुक्यातील लगतच्या गावातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग दर्शवण्यासाठी मोठ्या ताकतीने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडायचे आहेत हे आंदोलन केवळ कुठच्या एका संस्थेचे एक-दोन व्यक्तीचे नसून प्रत्येकाच्या हक्कासाठी हक्कासाठीच आहे हा भाव मनात धरून प्रत्येक जणांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करून पुढची दिशा ठरवायची आहे यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.जोपर्यंत स्वतः वर प्रसंग येत नाही तोपर्यंत या समस्या व यातील भिषणतः आपल्याला समजणार नाही यासाठी मोठ्या संख्येने या आंदोलनात जनतेने सहभागी होऊन सर्वसामान्य लोकांचा आवाज उठवण्यासाठी उपस्थित दर्शवावी असे आवाहन सामाजिक बांधिलकी चे रवी जाधव व यूवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.