*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शृंगार शब्दांचा….*
शब्दांचा शृंगार असतो, जळता अंगार असतो
तिला कविता म्हणतात
कळीचे फूल होतांना बहरते तिला कविता म्हणतात…
शब्दांना मिठीत घेतांना शहारते ती असते कविता
लाजून डोळे मिटून घेते जमिन उकरते कविता…
तिरपा कटाक्ष नजरेचा मिष्किल हसते कविता
मानवेळावून पाहते, हासत जाते कविता…
छुनछुन नाद करत येते मोहवते मन कविता
बोल जणू सतारीचे किणकिण करते कविता
नंदादीप देवळातला गाभारा उजळते कविता
टाळ मृदुंग टाळावरती ताल धरते कविता…
नादब्रह्म उभे करते विसरायला लावते कविता
भव सारा वाहून जातो ब्रह्मस्वरूप होते कविता
मीच ब्रह्म, मीच ब्रह्म अंतर्नाद बनते कविता
विलिन होते हृदयात तेथून उगम पावते कविता…
कोण कवी कोण कविता यातच लय पावते कविता
पुन्हा नव्याने जन्म घेते फोफावते ती कविता…
अद्वैत आहे, कवी कविता ब्रह्म सारे
हृदयाच्या पटलावरती आता कविता लिहा रे…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)