*नवीन HSRP नंबरप्लेटचे दर माफक व प्रकिया सुलभ करावी*.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मुख्यमंत्री
यांच्याकडे मागणी.
वैभववाडी
नवीन HSRP नंबर प्लेटचे दर माफक करून नंबर प्लेटची प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. सदर मागणीच्या मेलची प्रत महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त मा.विवेक भीमनवार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मा.अनिल पाटील व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. दि.०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे आणि मुदत वाढीचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने स्वागत केले आहे.
शासनाने नवीन नंबरप्लेट दि.३१/०३/२०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश दिले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी दिनांक ३०/०६/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
परंतु शासनाने जाहीर केलेले नवीन नंबरप्लेटचे दर अवाजवी आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटसाठी तिप्पट रक्कम आकारण्यात येत आहे. उदा. टू व्हीलर नंबरप्लेटसाठी आंध्र प्रदेशमध्ये 245 रुपये, गुजरात 160 रुपये, झारखंड 300 रुपये, गोवा 155 रुपये तर महाराष्ट्रात 450 रुपये आहे. तसेच थ्री व्हीलर, फोर व्हीलर व अवजड वाहने यांचे दर इतर राज्यापेक्षा तिपटीने जास्त आहेत. तसेच नंबरप्लेटची आँनलाईन नोंदणी करण्यासाठी १५० ते २०० रुपये घेतले जात आहेत.
HSRP नंबरप्लेटचे दर माफक करुन आँनलाईन नोंदणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत मोफत करावी अशी मागणी सर्वसामान्य वाहनधारक ग्राहकांकडून होत आहे. वरील विनंतीवजा मागणीवर सकारात्मक विचार होऊन योग्य कार्यवाही व्हावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने प्रशासनाकडे केली आहे.