You are currently viewing पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा

सिंधुदुर्गनगरी

केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (ULLAS Navbharat Saksharata Karykram) सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते सायं.५ वाजेर्यंत असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी चे  (FLNAT) आयोजन करण्यात येत, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) निलिमा भिकाजी नाईक यांनी दिली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत, “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करावयाची आहेत.  या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण इ. बाबींचा समावेश आहे.  स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नव-साक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करता येतील.  त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालये / विभागांच्या सहाय्याने केली जात आहे.   राज्याने शासन निर्णयाद्वारे ही योजना स्वीकारली आहे. त्यानुसार शासन निर्णयानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

      राज्य नियामक परिषदेचे अध्यक्ष शिक्षणमंत्री आहेत, तर राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव, शालेय शिक्षण हे आहेत.  यामध्ये जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आहेत.  शिवाय तालुकास्तरावर तहसीलदार व गट विकास अधिकारी हे अनुक्रमे तालुका नियामक आणि तालुका कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत.  शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांच्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी आहे. या योजनेत शाळा हे एकक आहे.

या कार्यक्रमात उल्लास APP वर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार, दि.२३ मार्च २०२५ रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्रशासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत ज्या शाळेतून उल्लास अॅपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे व दि. १७ मार्च, २०२४ रोजी झालेल्या FLNAT परीक्षेत NEED IMPROVEMENT असणारे असाक्षर अशा सर्वांनी रविवार दि.२३/०३/२०२५ रोजी त्या शाळेमध्ये सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी.  तसेच सदर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रांवर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून करण्यात येत आहे.

    परीक्षेस जाताना शक्य असल्यास असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा. (फोटोबाबतची सक्ती करु नये.) तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र / आधारकार्ड / पॅनकार्ड / बँक पासबुक इ.पैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे, जेणेकरुन उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे तसेच असाक्षर व्यक्तींचा परीक्षा नोंदणी अर्ज भरणे शक्य होईल.

  प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित खालील तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण 150 गुणांची आहे.  अनुक्रमे भाग क (वाचन) 50 गुण, भाग ख (लेखन) 50 गुण, भाग ग (संख्याज्ञान) 50 गुण.  परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी  प्रत्येक भागासाठी 33 टक्के (17 गुण) अनिवार्य आहेत व एकूण 150 गुणांपैकी 33 टक्के (51 गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे 33 टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त 5 वाढीव गुण देता येतील. परंतु तीनही भागाचे मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत.

          परीक्षेची वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत असेल.  प्रत्यक्ष पेपरचा कालावधी 3 तासांचा असेल. (दिव्यांग व्यक्तींसाठी 30 मिनिटे जादा वेळ) परीक्षार्थी सदर परीक्षेसाठी वरील कालावधीत कधीही येऊ शकेल.

  उपस्थित परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असलेला पेपर मिळेल.

 परीक्षेचे माध्यम – मराठी माध्यमातून परीक्षा आयोजित करणेत येईल.  अपवादात्मक परीक्षा केंद्रांवर इतर माध्यमांचे परीक्षार्थी आल्यास त्याबाबतची कार्यवाही जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) यांचेकडून करण्यात येत आहे.

उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी  फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरु नये.

  यु-डायस क्रमांकानुसार असाक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल.

  परीक्षेसाठी उल्लास अॅपवरील नोंदणीकृत असाक्षर व्यक्तीच परीक्षा देण्यास पात्र असेल. उल्लास अॅप वर ऑनलाईन नोंदणी केलेली नसल्यास परीक्षा देता येणार नाही.

FLN परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या असाक्षर व्यक्ती परीक्षेपूर्वी उल्लास app वर नोंदणी करू शकतात.

सदरची परीक्षा ही प्रौढांची असल्याने तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि इतर महत्वाच्या बाबींसाठी पूरक असल्याने परीक्षा केंद्रावरील वातावरण या परीक्षार्थींसाठी आनंदाचे व उत्साहाचे ठेवण्याची जबाबदारी क्षेत्रीय यंत्रणेतील प्रत्येक घटकाची आहे.  परीक्षा केंद्रावरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा असाक्षरतेबद्दलचा दृष्टीकोन सहानुभूतीचा व मदतीचा असावा.  म्हणजे परीक्षा शिस्तबध्द पध्दतीने घेण्यात येत असली तरी परीक्षार्थीसाठी वातावरण खेळकर असावे, जेणेकरुन परीक्षार्थीवर कसल्याही प्रकारचा ताण येणार नाही, अशा सूचना सर्व क्षेत्रीय अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

             पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्रक/गुणपत्रक देण्यात येईल. या परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होतील. तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच दैनंदिन जीवन जगत असताना स्वतःच्या कुटुंबात/पाहुणे/नातेवाईक यांच्यामध्ये आपले कौतुक होईल. वेगवेगळ्या दुकानांमध्ये वस्तुची खरेदी करणेसाठी गेले असता फसवणूक होणार नाही. बँक/पोस्ट ऑफिस इ. ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होणार नाही.

राज्यात सद्य:स्थितीत दि.२३ मार्च २०२५ रोजी ५,२७,००० इतक्या असाक्षरांची नोंद उल्लास अॅपवर ऑनलाईन पध्दतीने झालेली आहे. उल्लास अॅपवर नोंदणीकृत सर्व असाक्षरांची परीक्षा घेण्याबाबत जिल्ह्यांना सूचना शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदर परीक्षेसाठी 6424 असाक्षरांची नोंद उल्लास ॲपवर ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे.

असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत स्वतःचे ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा