कोरोना नंतर राज्यातील मान्यताप्राप्त पहिलीच खुली कबड्डी स्पर्धा कणकवलीत
अभय राणे मित्रमंडळाचे आयोजन
कणकवलीत ३० – ३१ जानेवारीला रंगणार कबड्डीचा महासंग्राम
कणकवली
कोरोना साथरोगानंतर कबड्डी फेडरेशन ची मान्यता असलेली अवघ्या महाराष्ट्रातील पहिलीच खुल्या मैदानावरील कबड्डी स्पर्धा आयोजनाचा मान अभय राणे मित्रमंडळ टेंबवाडी कणकवली मित्रमंडळाला मिळाला आहे. येत्या ३० आणि ३१ जानेवारी रोजी प्रकाशझोतात कणकवली टेंबवाडी येथील भव्य मैदानात प्रो कबड्डीच्या धर्तीवर सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या मान्यतेने कणकवली प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा संपन्न होणार असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
अभय राणे मित्रमंडळ टेंबवाडी कणकवली च्या वतीने आयोजित भव्य कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा कणकवली शहर मर्यादित असून शहरातील ७ संघमालक आपले संघ या स्पर्धेत उतरवणार आहेत. प्रो कबड्डी लीग च्या धर्तीवर ही स्पर्धा प्रकाशझोतात ३० आणि ३१ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्ताने कोरोना साथरोगानंतर प्रथमच सिंधुदुर्गसह राज्यभरातील कबड्डी रसिकांना हा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत एकूण ७ संघमालक आपले संघ उतरवणार आहेत. न्यू समर्थ संघाचे मालक रुपेश केळुसकर, अक्षय स्पोर्ट्स चे अक्षय चव्हाण, मयूर स्पोर्ट्स चे मयूर मेस्त्री, बिडीएम स्पोर्ट्स चे अनंत सरंगले, मधलीवाडी चे जोगी राणे, भालचंद्र स्पोर्ट्स चे साहिल परब, अवधुत स्पोर्ट्स चे अवधूत तळगावकर आपले दिग्गज खेळाडू या स्पर्धेदरम्यान मैदानात उतरवणार आहेत. या सातही संघातील दिग्गज आणि मातब्बर खेळाडुंची चपळाई आणि क्रीडाकौशल्य पाहण्याची संधी कबड्डीरसिकांना उपलब्ध होणार आहे. प्रतिदिन १३ सामने होणार असून अंतिम सामना ३१ जानेवारी रोजी कबड्डीरसिकांच्या भरगच्च गर्दीत होणार आहे. प्रथम विजेत्या संघाला रोख रु २० हजार आणि आकर्षक एआरएम चषक २०२१ देऊन गौरविण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला रोख १५ हजार आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे.तृतीय आणि चतुर्थ क्रमांक विजेत्या संघाला प्रत्येकी रोख रु. ५ हजार आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर वैयक्तिक बक्षिसांचीही लयलूट स्पर्धेत केली जाणार आहे.अष्टपैलू खेळाडूला रोख रु २ हजारसह चषक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड साठी प्रत्येकी रोख रु १ हजार व चषक देऊन खेळाडूला गौरविण्यात येणार आहे.
कोरोनानंतर राज्यात प्रथमच खुल्या मैदानावर प्रकाशझोतात होणाऱ्या या स्पर्धेची उत्कंठा कबड्डीरसिकांना लागून राहिली आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मैदानस्थळी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे, माजी नगरसेवक अभय राणे, व्यंकटेश सावंत , सागर राणे, यश उर्फ भाई पालव, अमोल पेडणेकर, आत्माराम राणे, दिलीप राणे आदी उपस्थित होते..