फायबर बोटी वापरामुळे चालक व मालक यांची आर्थिक उन्नती – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई
राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर लाकडी बोटी वापरल्या जातात. त्यांचा वेग कमी असतो. त्यामुळे फेऱ्याही कमी होतात. त्याऐवजी फायबरच्या हलक्या बोटी वापरल्यास फेऱ्या वाढून बोट चालक आणि मालक यांचे उत्पन्न वाढेल व त्याची आर्थिक प्रगती होईल, अशी माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्य व्यवसाय मंत्री राणे बोलत होते. यावेळी सदस्य भाई जगताप, शशिकांत शिंदे, सचिन अहिर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
मत्स्य व्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, राज्यात वर्षानुवर्ष लाकडी बोटी वापरली जात आहेत. त्याऐवजी फायबरची बोट वापरण्याचे शासनाचे धोरण आहे. बोट मालकांना नव्या फायबरच्या बोटी खरेदी करता याव्यात यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याचेही शासनाचे नियोजन आहे. मुंबई बँकेच्या सहकाऱ्याने हे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. बोटधारकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी सहकारी बँकांसोबतच खासगी आणि राष्ट्रीय बँकांचेही सहकार्य घेण्यात येईल. बोट धारक आर्थिक सक्षम होतीलच त्याशिवाय पर्यटन वाढीच्या दृष्टीनेही त्याचा फायदा होणार आहे. तसेच नीलकमल बोट अपघात प्रकरणी नौदल, पोलीस आणि बंदरे विभाग या तिन्ही विभागांकडून चौकशी सुरू आहे. चौकशी अंती दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही राणे यांनी सभागृहात सांगितले.