पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण बाबू सावंत यांची मागणी
सावंतवाडी
तिराली प्रकल्पाचे जलवाहिनीद्वारे वेंगुर्ला येथे नेण्यात येणारे पाणी सोनुर्ली, वेत्ये, माजगाव, चराठे व मळगाव गावासाठी देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थातुन होत असुन याबाबत आपण शासनाच्या जीवन प्राधिकरण विभागाचे लक्ष वेधणार आहे, असे पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून तिलारी धरणातील पाणी शुद्धीकरण करून ते सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील गावांना पुरवण्याची योजना २०१० मध्ये अमलात आली. यासाठी २१६ कोटी ९० लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सद्यस्थितीत बंद असलेले हे काम कोरोना काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सासोली येथून तिलारीच्या उजव्या कालव्यातून पाईपलाईनद्वारे हे पाणी डेगवे- बांदामार्गे सावंतवाडी व वेंगुर्ले येथील सतरा गावांना फायदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये खाजगी उद्योगधंद्यानाही हे पाणी पुरवले जाणार आहे. मात्र वेंगुर्ला येथे देण्यात येणारे हे पाणी सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, वेत्ये, चराठे, माजगाव व मळगाव या गावांनाही मिळावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी प्रयत्न सुरू केले असून जीवन प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून आवश्यक असलेले ठराव येत्या काही दिवसात उपलब्ध करून संबंधित विभागाकडे मागणी करणार असल्याचे बाबू सावंत म्हणाले. माजगाव, सोनुर्ली तसेच अन्य गावामध्ये एप्रिल-मे मध्ये होणारी पाणी टंचाई लक्षात घेता गग्रामस्थांनी जोरदार मागणी केली आहे. ग्रामस्थांची मागणी रास्त असून तालुक्यातील पडवे माजगाव, डेगवे बांदा, शेर्ले, कास मडूरा, पडलोस, आरोस, कोंडूरा, सातोसे या गावांना मिळत असेल तर आम्हाला का नाही असा प्रश्नही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे..त्यासाठी आपण संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देऊन तशा प्रकारचे ठराव द्या अशी मागणी करणार आहे व या ठरावाद्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे मागणी केली जाणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.