*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अशीही वारी*
सावळ्या विठ्ठला,तुझ्या दारी
येण्यासाठी आतुरले मन,
कशी सांगू व्यथा माझी वारी
करण्यासाठी धडपडे तन.
थकल्या या देहा,जरा नसे त्राण,
रुप तुझे नयनी वसे, येई
प्रेमाचे भरते,वाटे येतीनयनी प्राण
कधी जीव माझा भेट घेई.
सांग बा विठुराया आस लावुनि
जीवा,कां रे तू राहसी दुरी,
कासावीस होई मन,वेदना लेऊनि
देह नाही उठत,कशी करु वारी.
पंचप्राण आले डोळा तुलापाहण्या
मनानेच सुंदर ते ध्यान केले,
नजरेसमोरी,वाटे हृदयी तू वसता
तव भक्तीने मन बहरुन आले.
लीला तुझी अगाध,मन भक्तांचे
तुला कळते,जगन्नाथा,
कष्टल्या जीवा,तुझाच विसावा
तुझ्याविना कोण अनाथा.
दर्शन झाले अंतर्मनी,झालो तृप्त
आता नाही आस जगण्याची,
पैलतीरी जाताना तूच हो सोबती
भीती नाहीआता जन्ममृत्यूची
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई, विरार