*कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित जिल्हा साहित्य संमेलन २०२५ : एक साहित्य मेजवानी*
साहित्य म्हणजे मानवाच्या कल्पनेने कागदावर चितारलेली प्रस्तुती..! साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून समाजात जे काही घडते त्याची इत्यंभूत माहिती देणारी ती तंत्रणा असते. साहित्य हा सर्जनशील अभिव्यक्तीचा, कलेचा एक प्रकार आहे ज्याचा उपयोग कल्पना, भावना आणि अनुभव, अर्थ व्यक्त करण्यासाठी केला जातो. यात कथाकथन, कविता आणि लिखित कार्याच्या इतर प्रकारांद्वारे सौंदर्याचा अनुभव तयार करण्यासाठी भाषेचा वापर करून कादंबरी, लघुकथा, निबंध आणि नाटके यांसह अनेक रूपे घेऊ शकतात. सर्वतोपरी विचार करता ‘साहित्य’ हा शब्द एकच एक असा विशिष्ट अर्थ सांगतो आणि तो म्हणजे ‘लेखन’ हा होय.
साहित्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी साहित्य संमेलन ही एक पर्वणी असते, त्यात गर्दी पेक्षा दर्दी श्रोत्यांची, साहित्य रसिकांची नितांत आवश्यकता असते. असाच साहित्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज नगरी म्हणजेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठावर अन् सुंदरवाडीवर शीतल छाया धरणाऱ्या नरेंद्र डोंगराच्या कुशीत पुन्हा एकदा साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध लेखक आणि “वस्त्रहरण” या मालवणी नाटकाचे ५००० हून अधिक प्रयोग करणारे नाटककार मान.गंगाराम गवाणकर भूषविणार असून कोकण मराठी साहित्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष, विश्व मराठी साहित्य संमेलन पुरस्कार प्राप्त साहित्यिक, आमचे सर्वांचे प्रेरणास्थान, साहित्य तीर्थक्षेत्र, ऋषितुल्य, पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांची खास उपस्थिती लाभणार हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी भाग्याचे..!
संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्राचे मत्स्योद्यक व बंदरे मंत्री नाम.नितेशजी राणे तर स्वागताध्यक्ष मान.आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठीच्या कार्यप्रणालीत आमदार दिपक केसरकर यांचे विशेष योगदान लाभले होते. या साहित्य संमेलनात कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा सौ.नमिता कीर, विश्वस्त श्री.रमेश कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ अशा दिग्गजांसह जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित तसेच नव साहित्यिकांची मांदियाळी असेल एवढे मात्र नक्कीच…!
सावंतवाडीत जवळपास २८ वर्षांपूर्वी म्हणजेच १३ ते १५ डिसेंबर १९९६ रोजी चौथे कोंकण मराठी साहित्य संमेलन संत सोहिरोबानाथ साहित्य नगरी, सावंतवाडी येथे पार पडले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक कविश्रेष्ठ विंदा करंदीकर तर उद्घाटक म्हणून मराठी नवकथेचे प्रवर्तक आणि ज्येष्ठ समीक्षक, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटक इत्यादी वाङ्मय प्रकारात विपुल प्रमाणात लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांच्यासारखी रत्ने लाभली होती हे विशेष आनंददायी..! संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार कै.जयानंदजी मठकर हे होते. सन्मा.मधुभाई को.म.सा.प.चे अध्यक्ष आणि सावंतवाडीचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कै.विद्याधर भागवत हे कार्याध्यक्ष होते. श्री.हरिहर आठलेकर, उषाताई भागवत, प्रभाकर भागवत नाटककार श्रीनिवास नार्वेकर आणि *”तुझी अक्षरे मी लिहावी जळाने… तिथे रंग येवोत रक्तातले…”* अशी ईश्वराला विनवणी करत अक्षरांना आयुष्य वाटणारे कविवर्य डॉ.वसंत सावंत आदी अनेकांनी या संमेलनात सर्वार्थाने भाग घेतला होता. २०२५ च्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले आमदार दिपक केसरकर हे १९९६ च्या संमेलनाच्या मंडप, बैठक समितीचे प्रमुख व कार्यकारिणीचा भाग होते. प्रा.डॉ.जी. ए. बुवा, प्रा.अरुण पणदूरकर, श्री.सतीश पाटणकर, ॲड.नकुल पार्सेकर, प्रा.सुभाष गोवेकर हे आजही कोंकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचा भाग आहेत आणि त्यावेळच्या संमेलन समितीचे अविभाज्य अंग होते. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या भव्य दिव्य प्रांगणात तीन दिवसीय संमेलन पार पडले होते आणि इंटरनेट, फोन यासारख्या इतर सुविधा नसल्याने साहित्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रोतेगणांनी या संमेलनातील साहित्याचा आनंद घेतला होता. या चौथ्या कोंकण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “लावण्यसिंधु” ही वाङ्मयीनदृष्ट्या दर्जेदार व साहित्याने सजलेली धजलेली सुरेख अशी संग्राह्य स्मरणिका प्रकाशित करण्यात आली होती.
शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी होणारे कोकण मराठी साहित्य संमेलन देखील दैदिप्यमान असेच होईल अशी ग्वाही कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांनी दिली आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या वातानुकूलित असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात संमेलन होत असल्याने वातावरण देखील प्रसन्न असणार यात शंकाच नाही. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आणि साहित्यिकांचे तीर्थक्षेत्र समजले जाणारे पद्मशी मधुभाई यांची वयाच्या ९४ व्या वर्षी संमेलनास लाभणारी उपस्थिती नव साहित्यिकांमध्ये चैतन्य आणणारी असेल. वस्त्रहरणकार श्री.गंगाराम गवाणकर हे संमेलनाध्यक्ष म्हणजे मालवणी माणसांची मान ताठ अन् छाती गर्वाने फुलून येणार.. राजापूर जवळील माडबन या समुद्रकिनाऱ्यावरील गावातून चाकरमानी म्हणून मुंबईत गेलेले नाटककार गंगाराम गवाणकर उर्फ नानांचा मुंबईच्या फुटपाथ पासून सुरू झालेला प्रवास व्हाया वस्त्रहरण लंडन वारी करून आला तो नक्कीच आपणां सर्वांसाठी दीपस्तंभासारखाच..!
कोकण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता मराठीचे आद्यकवी केशवसुत कट्टा, श्रीमंत शिवरामराजे पुतळ्यापासून गांधी चौक, जयप्रकाश चौक ते पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज नगरी असा शाळकरी मुलांच्या ग्रंथदिंडीने होईल. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर १०.३० वा. ज्येष्ठ कवी डॉ.वसंत सावंत ग्रंथदालन येथे ग्रंथप्रदर्शन उद्घाटन, व साहित्य संमेलन उद्घाटन, ग्रंथ प्रकाशन असा स्वागत सोहळा होणार आहे. यानंतर ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांची थेट मुलाखत होईल. १.३० वाजता संमेलनासाठी उपस्थित साहित्यिक व रसिक श्रोत्यांसाठी येथेच्छ भोजनाची व्यवस्था केली आहे. दुपारी २.३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी सांस्कृतिक मंचावर “परिसंवाद” हा कार्यक्रम होणार आहे. जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी यात भाग घेतील हे त्याचे वैशिष्ट्य..! दुपारी ३.३० वा. निमंत्रित कवी कवयित्रींचे “तुतारी” कवी संमेलन होणार असून त्यानंतर सन्मान व समारोप अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग साहित्य संमेलनाचे आयोजक असून को.म.सा.प. सावंतवाडी शाखा संमेलनाचे संयोजक असून संमेलनाच्या यशस्वितेसाठी कठोर मेहनत घेत आहेत. आजकाल एका क्लिकने मोबाईल वर सर्वकाही उपलब्ध होतं परंतु स्वतःच्या नजरेने संमेलनाचा रसिक श्रोते म्हणून आनंद घेणे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांचा सहवास लाभणे म्हणजे साहित्य रसिकांचे भाग्यच..! आपण साहित्य लिहितो, निर्मित करतो म्हणजे आपण साहित्यिक झालो असा त्याचा अर्थ होत नाही तर..जेव्हा आपण आपले साहित्य इतरांसमोर ठेवतो अन् इतरांचे साहित्य ऐकतो, श्रवण करतो, दाद देतो तेव्हाच आपण साहित्यिक म्हणण्यास योग्य ठरतो..
आपणही सर्वांनी “याची डोळा याची देही” कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित संमेलनाचा आस्वाद घ्या आणि अभिजात मराठी भाषेचे अभिजातत्व टिकवण्यात आपला खारीचा वाटा उचला… हेच आवाहन अन् आग्रह..!